आता वयस्कर बायका विचारतील, “तुझी मुलगी आता वयात आलीये आणि तू अजून सुलवासाठी तिचे कान तयार केले नाहीयेत?”. लगेच पुढे त्या पोरीकडे बघून बोलतील, “बेन हवे तारा लगन माटे पण आवेशे, सासरा पक्षवालाई सगाईमा करेली बोलिनी मुदत पूरी थई गई छे (पोरी, तुझं लवकरच लग्न होईल. सासरकडच्यांनी दिलेली वेळ आता संपत आलीये)” लग्नापूर्वी एका तरुणीच्या आईला तिच्या मुलीच्या कानाचं छेदन तयार करायला भाग पाडणाऱ्या वृद्ध बायकांचे असे अवाज माझ्या भोपा रबारी समुदायात नेहमीच कानावर पडतात.
मला आठवतंय की, माझी चुलत बहीण नाथी बेन मोरी १७ वर्षांची असल्यापासून तिचे कान तयार करायला लागली होती. ती आता २४ वर्षांची आहे. ती नेहमी सुलवा घालते, सुलवा म्हणजे साधारण एक सेंटीमीटरपेक्षा जास्त रुंदीचा सोन्याच्या कड्यांचा मोठा सेट. ज्या घरात मुलगी लग्नाची असते तेव्हा तिच्या साखरपुड्याच्या वेळी जवळपास दोन तोळे (२२.३२ ग्रॅम) वजनाचे हे कानातले त्या नववधूला भेट म्हणून दिले जातात. ह्या कानातल्यांची किंमत दोन लाखांपर्यंत असते.
सुलवा ही आमची संपत्ती आहे जी कठीण काळात आमची काळजी घेईल. पण बऱ्याचदा घरच्यांना हे तयार करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. सोनं आता महागलंय आणि आमच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. आम्ही गुरं चारायचं काम करतो. आमच्या गावात समाजाचे ३,००० लोकं राहतात. त्यापैकी ६० टक्के लोक मजूरी करतात आणि उरलेले ४० लोक गुरं चारायचं काम करतात.





