ही घटना २०२१ ची. महिना डिसेंबर. वेळ सकाळची. अमर थोरबोलेंनी गाडीला किक् मारली. त्यांच्या घरापासून सोलापूरचं जिल्हा पोलीस मुख्यालय ७० कि.मी. वर. रस्ता दाट धुक्यात हरवलेला. त्या गारथंड धुक्यातून वाट काढत निघालेल्या थोरबोलेंच्या खिशात होती माचिस नि सोबत होता डिझेलचा कॅन.
पोलिस हेडक्वार्टरजवळ येताच थोरबोलेंनी गाडी स्टँडवर लावली. कॅनचं झाकण उघडून ते चौकीच्या दिशेनं जाऊ लागले. चालता चालताच त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेतलं. क्षणात पेटवलेली काडी भुर्रकन विझली, नि पोलिसांनी थोरबोलेंना ताब्यात घेतलं.
या घटनेआधीचे दोन महिने ३८ वर्षीय थोरबोले हैराण झालेले. बँक, कर्जवसूली एजंट नि पोलिस सर्वांनीच त्यांची कोंडी केलेली. घेतलेलं प्रत्यक्ष कर्ज नि बँकेकडून दाखवली जाणारी रक्कम यातली तफावत पाहून थोरबोलेंची पाचावर धारण बसली. थोरबोलेंनी कर्ज घेतलेलं पाच लाखांचं, नि वसूली निघत होती त्याच्या पाचपट. ही शुद्ध फसवणूक होती. थोरबोलेंनी पोलिसांत धाव घेतली. पण पोलिसांनी चक्क तपास करायला नकार दिला. कारण, या प्रकरणात फसवणूक करणारांचे मजबूत राजकीय लागेबांधे.
थोरबोले हा कष्टाळू नि होतकरू गृहस्थ. ते एक साधसं हॉटेल चालवत. २०२० मध्ये आपल्या 'स्नॅक्स'च्या व्यवसायाला मसाला विक्री व साठवणूकीच्या धंद्याची जोड द्यायचं त्यांनी ठरवलं. मसाल्याचं गोदाम उभारण्यासाठी जागा हवी. म्हणून थोरबोलेंनी पै पै जमवलेली बचत खर्चून एक प्लॉट खरेदी केला. आता या प्लॉटवर पोहे, वडापाव सोबतच मसाले विकायचे, असा त्यांचा प्रामाणिक मनसुबा होता.
आपली योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी थोरबोलेंनी ५ लाखाचं कर्ज घ्यायचं ठरवलं. त्यासाठी 'शिवशक्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके'कडे अर्ज केला. थोरबोले पूर्वी एका हॉटेलात काम करत. या हॉटेलचे मालक युवराज बारंगुळे. हे युवराज व 'शिवशक्ती' बँकेचे ब्रांच मॅनेजर गणेश बारंगुळे ही दोघं व्यावसायिक भागीदार होते. ओळखीपाळखीनं कर्ज मिळणं सुलभ होईल, असा विचार थोरबोलेंनी केला.
या परिचयावर भरवसा होता, म्हणूनच ब्रँच मॅनेजर गणेश बारंगुळेंनी पुन्हा सह्या मागितल्या, तेव्हा थोरबोलेंना काहीच गैर वाटलं नाही. “आधीच्या अर्जात काहीतरी चूक झालीय” या सबबीवर मॅनेजरनं पुन्हा सह्या घेतल्या. थोरबोलेंची पत्नी सुजातालाही हा प्रकार शंकास्पद वाटला नाही.
जुलै २०२० मध्ये गणेश बारंगुळेंनी कर्ज मंजूर झाल्याचं कळवलं. शिवाय कर्ज परतफेडीची हमी म्हणून दहा कोरे धनादेश सह्या करून जमा करावेत, अशी सूचनाही दिली.
यावेळीही थोरबोले दाम्पत्यानं विश्वास ठेवला. सह्यांचे चेक जमा केले. ३४ वर्षीय सुजाता म्हणतात, “गणेश व युवराज बारंगुळेंना आम्ही वळखत होतो. त्यांच्यावर आमचा विश्वास होता.”
साधारण वर्षभरातच या विश्वासाच्या भ्रमाचा भोपळा फुटला. कर्जवसुली एजंट थोरबोलेंच्या घरी आले. नि त्यांनी सुजाताला धमकावलं, थोरबोलेंनी गृहकर्ज घेतलंय. २५ लाख रुपये. हप्ते भरले नाहीत, तर मालमत्तेवर जप्तीची कारवाई होईल. “हे ऐकून मी गोंधळून गेले. आधी तर काही कळलंच नाही,” सुजाता म्हणतात.











