“मला ओव्यांच्या अनुवादाचं काम अजून चालू ठेवायचं आहे.”
आशाताईंनी हे सांगितलं तेव्हा त्यांचं वय ऐंशीपार होतं. त्या दुखापतीतून बऱ्या होत होत्या आणि त्यांना लॅपटॉप वापरणं अवघड जात होतं. म्हणून आम्ही हस्तलिखित अनुवादांवर चर्चा करायला सुरुवात केली. त्या ८० ते १०० ओव्या असलेल्या प्रिंटआउटवर अनुवाद लिहून ठेवत असत. त्याचं काम एकदा पूर्ण झालं की, त्या पुढचं काम हाती घेत.
जितेंद्र मैड यांनी या अनुवादांवर त्यांच्यासोबत खूप काम केलं आणि त्या कामाचा डेटाबेस अपडेट केला.
“मी कॉलेजमध्ये असताना माझा असा समज होता की, ग्रंथपाल ही विचारशील व्यक्ती असते जी पुस्तकांची काळजी घेते. पण १९९६ मध्ये जेव्हा मी आशा ताई ओगलेंना हेमा ताई राईरकर यांच्या घरी भेटलो तेव्हा माझा समज दूर झाला,” जितेंद्र मैड म्हणतात. त्यांनी आशाताईंसोबत जवळपास तीन दशकं म्हणजे १९९६ पासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जात्यावरच्या ओव्यांच्या अनुवादाचं काम केलं.






