‘‘त्यांनी दिल्लीची दारं आमच्यासाठी बंद केली,’’ बिट्टू मालन म्हणतात. बुट्टार सरीन नावाच्या छोट्याशा गावाच्या वेशीपाशी आम्ही उभे असतो. ‘‘आता पंजाबमधल्या प्रत्येक गावाची दारं त्यांच्यासाठी बंद आहेत.’’
बिट्टू मालन मुख्तसर साहिब जिल्ह्यातल्या मालन गावातले शेतकरी. त्यांची पाच एकर जमीन आहे. ‘त्यांनी’, ‘त्यांच्यासाठी’ हे शब्द ते भाजपसाठी वापरतायत. केंद्रातला हा सत्ताधारी पक्ष या निवडणुकीत पंजाबमध्ये एकटाच लढतोय. ‘आमच्यासाठी’ म्हणजे दिल्लीत प्रवेश करू न दिलेले हजारो शेतकरी, जे २०२० च्या नोव्हेंबरमध्ये कृषी कायद्यांविरोधात निदर्शनं करण्यासाठी दिल्लीत येऊ पाहात होते.
ते किसान आंदोलन आणि दिल्लीच्या सीमांवर त्यांनी उभारलेली तंबूंची गावं यांच्या आठवणींशी पंजाबचं एक वेगळंच नातं आहे. या राज्यातल्या दहा हजार शेतकर्यांनी तीन वर्षांपूर्वी एकीकडे विरोध आणि दुसरीकडे आशा यांची गाठोडी काखेला घेत लाँग मार्च काढला होता. ट्रॅक्टर्स आणि ट्रेलर्स यांच्या फौजफाट्यासह शेकडो मैल प्रवास करून हे शेतकरी दिल्लीमध्ये येत होते ते फक्त का मागणीसाठी : आमची उपजीविका धोक्यात आणणारे तीन कृषी कायदे रद्द करा.
दिल्लीच्या सीमांवर त्यांचं स्वागत करण्यासाठी होती एक भलीमोठी भिंत… त्यांच्या मागण्या ऐकूच न येणार्या, किंबहुना ऐकूनही न ऐकलंसं करणार्या सरकारने उभारलेली ही भिंत होती बेपर्वाईची! आंदोलनात सामील झालेल्या शेतकर्यांच्या मनात या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ते सांगतात की, त्यानंतर जवळजवळ वर्षभर एकटेपणाचा गारठा आणि अन्यायाची आग यांचा सामना ते सगळे दिवसरात्र करत होते, मग बाहेर तपमान काहीही असो… काकडवणारं २ अंश सेल्सिअस किंवा भाजून काढणारं ४५ अंश सेल्सिअस! शेतकर्यांनी आणलेले मोठमोठे लोखंडी ट्रेलर्स हेच त्यांचं घर झालं होतं.
आशा-निराशेच्या या खेळात ३५८ दिवस गेले, दिल्लीच्या सीमांवर उभारलेल्या कॅम्प्समध्ये ७०० शेतकरी मरण पावले आणि मग सगळ्यांनी पंजाबला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या लढ्याची किंमत चुकवत, तसा मूक करार करत सगळे परतले, पण आंदोलन शेवटाला गेलं नव्हतं. शेतकर्यांनी केलेला त्याग, त्यांनी दिलेला लढा यांची ताकद मोठी होती. तिने सरकारला गुडघे टेकायला लावले आणि १९ नोव्हेंबर, २०२१ या दिवशी कृषी कायदे मागे घेत असल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलं.
आता पंजाबमध्ये या सार्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आपल्याला दिल्लीत जी वागणूक मिळाली, ती परत करण्यासाठी बिट्टू मालन आणि त्याच्यासारखे अनेक शेतकरी तयार झाले आहेत. २३ एप्रिलला फरीदकोट लोकसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार हंस राज हंस बुट्टार सरीन गावात आले होते, तेव्हा निडरपणे बिट्टू त्यांना भिडले. या आंदोलनात बळी गेलेल्या प्रत्येक शेतकर्याचा हिशेब चुकता करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, असं ते मानतात.







