पहाटेचे तीन वाजलेत आणि नंदिनी एका केसरी ताडपत्रीच्या तंबूबाहेर बसून; तिच्या मैत्रिणीने धरलेल्या मोबाइल टॉर्चच्या उजेडात ती मेकअप करतेय. अगदी साधी सुती साडी नेसलेल्या १८ वर्षांच्या नंदिनीचं पुढच्या काही तासांतच लग्नं होणारय.
काल संध्याकाळीच, ती आणि तिचा २१ वर्षीय नवरा जयराम, बंगालमेडू (चेरुक्कनूर इरुलर कॉलनी) इथून मामल्लपुरमला मित्र आणि कुटुंबासोबत आले आहेत. ही लोकं तमिळनाडूच्या तिरुवल्लुर जिल्ह्यातील, हजारो इरुलर कुटुंबांपैकीच एक आहेत जे चेन्नईच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर छोटे तंबू ठोकून राहतात.
दरवर्षी मार्च महिन्यात, जेव्हा तामिळनाडू किनारपट्टीवरील हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो, तेव्हा सोनेरी वाळूचा मामल्लपुरमचा (पूर्वी महाबलीपुरम) समुद्र किनारा विविध रंगांत न्हाऊन निघतो. पातळ साड्या आणि ताडपत्रीपासून बनलेल्या अनेक तंबू आणि निवाऱ्यांमुळे तो एका विशाल चक्रव्युहात रुपांतरित होतो; आणि ह्या तंबूना आधार म्हणून जवळच्याच झाडांच्या कापलेल्या फांद्या वापरल्या जातात.
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गर्दी असणाऱ्या या ह्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर सध्या राज्यभरातून ‘मासी मगम’ हा उत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या इरुलर लोकांची वर्दळ आहे. ‘इरुलर’ एक विशे असुरक्षित आदिवासी गट आहे. ज्यांची साधारण लोकसंख्या सुमारे २ लाख इतकी आहे (स्टॅटिस्टिकल प्रोफाइल ऑफ शेड्युल्ड ट्राइब्ज इन इंडिया, २०१३). हे लोक तमिळनाडूच्या काही जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या, लहान आणि एकाकी वस्त्यांमध्ये राहतात.


























