आठव्या दिवसाचा आठवा गुण
दिसू लागले शुभ शकुन
बाळाच्या चेहऱ्यावर दिसे शुभ चिन्ह
घटनाकार आणि भारत रत्न
जो बाळा जो जो

Pune, Maharashtra
|WED, APR 22, 2026
भिमाई पोटी जन्मला हिरा
दरवर्षी १४ एप्रिल रोजी – डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त – पुणे जिल्ह्यातील नांदगाव गावातील महिला धोंडूभाऊ शिंदे यांची कविता गातात आणि सर्व शोषित समुदायांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या दिवसाचा उत्सव साजरा करतात
Author
Translator
“कोरोनामुळे यावर्षी आंबेडकर जयंती साजरी होत नाहीये याचं मला खूप वाईट वाटतंय,” कुसुमताई सोनवणे म्हणतात. आम्ही पहिल्यांदा या प्रसिद्ध पाळण्याचं रेकॉर्डिंग त्यांच्या घरी केलं होतं. मार्च २०१८ मध्ये पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील नांदगाव गावात प्रमिला कांबळे आणि इतरांनी हा पाळणा गायला होता.
सत्तरी ओलांडलेल्या कुसुमताईंनी फोनवर सांगितलं की कोरोनाचे संकट आणि लॉकडाउन खूपच भीतीदायक आहे. “मी आयुष्यात असं काही कधीच पाहिलं नव्हतं. मला खूप काळजी वाटते. आमची रेशनची दुकानं उघडी आहेत, पण अजूनपर्यंत आम्हाला सरकारने जाहीर केलेलं मोफत रेशन मिळालेलं नाही.” मी जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा त्या सकाळी शेतात हरभऱ्याची काढणी करत होत्या.
नांदगावच्या महिला धोंडूभाऊ शिंदे यांच्या कवितेतील ओळी डॉ. भीमराव आंबेडकरांच्या जन्मावरील पाळणा म्हणून गातात. हे गाणे त्यांचे आई-वडील रामजी आणि भीमाबाई आंबेडकर यांच्या मनातील आनंद आणि आकांक्षांचे दर्शन घडवते. यात नवजात भीमाच्या आयुष्यातील पहिल्या १२ दिवसांतील उत्सवाचे वर्णन असून प्रत्येक दिवसासाठी एक स्वतंत्र ओळ आहे.
धोंडूभाऊ जवळच असलेल्या हडशी गावात राहायचे, जे त्यांचे वडील नामदेव यांचे गाव होते. पण त्यांची आई बागुबाई कांबळे या नांदगावच्या होत्या आणि त्यांना भावंड नसल्यामुळे आई-वडिलांचं घर त्यांना वारसाहक्काने मिळालंहोतं. त्यामुळे धोंडूभाऊ आणि त्यांचे दोन भाऊ हडशी आणि नांदगाव या दोन्ही गावांचे रहिवासी होते. साधारण दहा वर्षांपूर्वी वयाच्या पन्नाशीत धोंडूभाऊंचं निधन झालं.

Namita Waikar

Namita Waikar
“माझे काका खूप हुशारमाणूस होते,” कवी धोंडूभाऊंबद्दल त्यांचे पुतणे भाऊ शिंदे नांदगावहून फोनवर बोलताना सांगतात. “ते फक्त चौथीपर्यंत शिकले होते, पण त्यांनी अनेक कविता, गाणी, लोकगीते आणि वगनाट्ये लिहिली. नांदगावमध्ये आम्ही कधीकधी कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी घरगुती तमाशा सादर करतो. काका शेतकरी आणि कवी तर होतेच, पण गवंडीकाम आणि सुतारकामातही त्यांचा हातखंडा होता.”
“बाळाचा जन्म झाल्यानंतर १२ व्या दिवसापर्यंत बारसं झाल्याशिवाय त्याला पाळण्यात घातलं जात नाही,” कुसुमताई सांगतात. “त्या दिवशी पाळणा सजवला जातो आणि बाळाला पाळण्यात ठेवताना महिला हे पाळणा गीत गातात.” कधीकधी मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला ही हे गीत गायलं जातं.
(मार्च २०१८ मध्ये जेव्हा आम्ही त्यांना 'पारी'च्या 'जात्यावरच्या ओव्या' प्रकल्पांतर्गत भेटलो होतो, तेव्हा या महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा लढा, महाड सत्याग्रह आणि अस्पृश्यतेविरुद्धच्या लढाईवर आधारित ओव्याही गायल्या होत्या.)
दरवर्षी १४ एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये महिला हे आणि यासारखी इतर अनेक गाणी गातात. हा उत्सव मे महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत (गौतम बुद्धांची जयंती) गावोगावी सुरू असतो. दलित समाजातील शालेय मुलेही या काळात, तसेच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त गाणी गाण्यात आणि बाबासाहेबांवर भाषण देण्यात सहभागी होतात.
“आम्ही आमच्या घरातील मुलांना बाबासाहेबांच्या जीवनाची कथा सांगतो,” कुसुमताई म्हणतात. “त्यांचं बालपण आणि त्यांनी भेदभावाचा सामना कसा केला याबद्दल आम्ही त्यांना सांगतो. त्यांनी केवळ स्वतःसाठी नोकरी करून पैसे कमावले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी दिवसरात्र कष्ट केले आणि आपल्या लोकांना त्यांच्या हक्कांसाठी, समतेने वागवण्यासाठी एकत्र केलं.”

Namita Waikar

Namita Waikar
पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातील गरिबांसाठी काम करणाऱ्या 'गरीब डोंगरी संघटने' च्या कार्यकर्त्या असलेल्या कुसुमताई सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असतात. “आम्ही आमच्या मुलांना सगळं काही शिकवतो,” त्या म्हणतात, “जेणेकरून बाबासाहेब आमच्यासाठी आणि भारतासाठी किती महत्त्वाचे आहेत हे ते कधीही विसरणार नाहीत.”
धोंडूभाऊ शिंदे यांची बाबासाहेब आंबेडकरांवरील कविता आपल्याला १४ एप्रिल १८९१ रोजी महू (मध्य प्रांतातील लष्करी छावणी असलेले शहर, जे आता मध्य प्रदेशात आहे) येथे झालेल्या त्यांच्या जन्माचा प्रवास घडवते. यात त्यांचे वडील रामजी आंबेडकर, आई भीमाबाई आणि त्यांची जाऊ मीराताई यांच्या आनंदाचे क्षण आणि त्यांच्या जन्माच्या उत्सवात वाजवलेले बिगुल आणि कर्ण्यांचे वर्णन आहे.
ही आनंदवार्ता पोहोचवण्यासाठी शहर आणि गावोगावीच्या लोकांना तारा (टेलिग्राम) पाठवल्या जातात. या कवितेत, भीमरावांचे वडील रामजी स्वप्न पाहतात की त्यांचे हे १४ वे अपत्य देशासाठी मोठे कार्य करेल – भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतरत्न (सर्वोच्च नागरी सन्मान) म्हणून. नवजात भीमाची तुलना आंबडवे या सकपाळ कुटुंबाच्या मूळ गावातील 'हिऱ्याच्या खाणीतील' प्रकाशाशी केली आहे.
(कुटुंबाचे मूळ आडनाव सकपाळ होते. भीमरावांच्या वडिलांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या त्यांच्या गावावरून ते बदलून आंबडवेकर असं केलं. शाळेत असताना तरुण भीमाचे शिक्षक कृष्ण केशव आंबेडकर यांनी त्यांना स्वतःचे 'आंबेडकर' हे आडनाव लावून त्यांची नोंद केली.)
कवी सनातनी (जातीव्यवस्था मानणारा हिंदू समाज) यांना बहुजन समाजाचे शत्रू संबोधतात. बहुजन म्हणजे या उतरंडीतील वंचित किंवा मागास जाती, ज्यांच्यावर शतकानुशतके उच्चवर्णीयांनी अन्याय केला. अशा वागणुकीविरुद्ध आपल्या समुदायांना एकत्र करण्यासाठी भीमरावांचा झालेला उदय अन्याय करणाऱ्यांच्या मनात धडकी भरवेल आणि ते त्यांच्यापुढे निष्प्रभ होतील, असं कवी म्हणतात. हे डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाकडे आणि देशाच्या राजधानीत राजकीय नेत्यांच्या पंक्तीत त्यांना मिळालेल्या स्थानाकडे निर्देश करते. कवितेच्या शेवटच्या ओळीत धोंडूभाऊ शिंदे बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करतात.
व्हिडिओ पहा : भिमाई पोटी जन्मला हिरा
हे गाणे रामजी आणि भीमाबाई आंबेडकर यांच्या मनातील आनंद आणि आकांक्षा आणि नवजात भीमाच्या आयुष्यातील पहिल्या १२ दिवसांतील उत्सवाचे वर्णन करते.
येथे शीर्षक नसलेली धोंडूभाऊंची कविता आहे, जी नांदगावच्या महिलांनी गायली आहे :
आनंद झाला महू गावात,
जो बाळा जो जो
सन १८९१ साली तारीख चौदा एप्रिल त्या चैत्र महिन्यात
आनंद झाला महू गावात,
जो बाळा जो जो
रत्नं चौदावे आले जन्माला
आनंद झाला रामजी पित्याला
भीमाबाई आणि मीराताईला
सकपाळ घराण्याला उजाळ आला
जो बाळा जो जो
पहिल्या दिवसाची गडबड भारी
चावडीत जमल्या नार-नारी
वाद्य वाजती रणशिंग तुतारी
बातमी आनंदाची ती घरोघरी
जो बाळा जो जो
दुसऱ्या दिवसाचा थाट हा न्यारा
शहरात खेड्यात पोचल्या तारा
भिमाई पोटी जन्मला हीरा
सर्वगुण संपन्न चौअंगीचीरा
जो बाळा जो जो
तिसऱ्या दिवसाची ऐकाकी गत
बत्तीस लक्षणी जन्मला सूत
वर्णिले भविष्य करून गणित
शुभ वार्ता ज्याच्या त्याच्या मुखात
जो बाळा जो जो
चौथ्या दिवसाचा वेगळा थाट
भविष्य बाळाचे दिसे एकटे
कार्य देशात करणार मोठे
पाहून वैऱ्याचे काळीज फाटे
जो बाळा जो जो
पाचव्या दिवसाचा पाचवा वृत्तांत
रामजी म्हादोजीच्या तिसऱ्या पिढीत
सकपाळ घराणे कबीर पंथात
शुध्द आचार विचार तीत
जो बाळा जो जो
सहाव्या दिवसाचा सहावा प्रसंग
नर - नारी त्या होऊन दंग
बाळाच्या नावानी खेळती रंग
बहुजन समाजाचे फेडिलं पांग
जो बाळा जो जो
सातव्या दिवसाची सातवी सूत्र
भिमाई पोटी जन्माला पुत्र
सर्व समाजाला करणार एकत्र
देशहितासाठी झिजल्या दिनरात्र
जो बाळा जो जो
आठव्या दिवसाचा आठवा गुण
दिसू लागले शुभ शकुन
बाळाच्या चेहऱ्यावर दिसे शुभ चिन्ह
घटनाकार आणि भारत रत्न
जो बाळा जो जो
नवव्या दिवसाचा अनुभव नवा
रत्नागिरीचा अनमोल ठेवा
खाण हिऱ्याची अंबवडे गावा
भारत देशाचा जन्मला दिवा
जो बाळा जो जो
दहाव्या दिवशी दाही दिशात
आकाशवाणी ती आकाशात
पडला प्रकाश भारत देशात
जो बाळा जो जो
अकराव्या दिवसाला आला होकार
गुलामगिरीला बसली ठोकर
सनातन्यांचे दिसले एकार
स्वप्न रामजीचे झाले साकार
जो बाळा जो जो
बाराव्या दिवशी बाराखडीला
गेला तडाखा जुन्या रुढीला
दीन दीन त्या पिढ्यां पिढीला
लागले सनातनी देशोधडीला
जो बाळा जो जो
भीम भिमाईच्या जन्मला दिद्रा
सनातन्यांना बसला हादरा
पाहून दुष्मनाच्या दिपल्यात नजरा
कवी धोंडूभाऊचा त्रिवार मुजरा
जो बाळा जो जो
कवी धोंडूभाऊचा त्रिवार मुजरा
जो बाळा जो जो
अनुवाद : जयेश जोशी
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/ambedkar-the-diamond-that-lit-up-the-sky-mr

