१९८४ सालची गोष्ट. फ्रंटलाइन मासिकाची सुरुवात झाली त्या वर्षीच्या काही आठवणी. त्या काळी देशभरात कुठेही शेतकऱ्याच्या घरी गेल्यावर स्वागत कशाने व्हायचं तर पेलाभर ताज्या दुधाने. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांमध्ये तर निरोप घेताना देखील दुधाचा पेला तुमच्यासमोर ठेवला जायचा. आंध्र प्रदेशाच्या सीमाभागात दूध चांदीच्या पेल्यात दिलं जायचं. तुमच्याप्रती असलेली आदर आदरभावना तसंच त्या शेतकऱ्याची पत व्यक्त करणारी ती कृती असायची.
तमिळ नाडूतल्या शेतकऱ्यांच्या घरी शुद्ध पितळी पेले असायचे. कधी कधी दुधाऐवजी अप्रतिम चवीची फिल्टर कॉफी असायची. १९९० चं दशक उजाडलं आणि हळूहळू चांदीच्या पेल्यांची जागा स्टीलने घेतली. १९९१ नंतरही दूध दिलं जायचं मात्र ते कडा तुटलेल्या चिनीमातीच्या कपांमधून. निम्मं दशक उलटेपर्यंत दुधासाठी माझ्या हातात काचेचे ग्लास येऊ लागले होते.
२००० साल उजाडलं आणि दुधाची जागा चहाने घेतली. महाराष्ट्राच्या विदर्भात २००३-०४ मध्ये कोरा चहाच मिळायला लागला होता. प्रेमाचं आणि आदराचं प्रतिक असलेली त्या चहातली साखरसुद्धा हळूहळू कमी कमी होत गेलेली मला आठवते. आणखी पाच-सहा वर्षं गेली आणि मग काचेचे ग्लाससुद्धा दिसेनासे झाले. आता रेल्वे किंवा बस स्टँडवर मिळणारे प्लास्टिकचे कप सर्रास सगळीकडे दिसू लागले होते.
२०१८ साली मी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गणपती बाळा यादव यांना सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या घरी जाऊन भेटलो होतो. काही तासांच्या गप्पांनंतर त्यांनी माझ्यासमोर दूध आणून ठेवलं ॲल्युमिनियमच्या भांड्यात.

















