कोविड १९ ची महासाथ आली आणि विकासला आर्मीसाठीची आपली सगळी तयारी थांबवावी लागली. २०२२ साली त्याने पुन्हा एकदा आपला सराव सुरू केला. आराच्या विमानतळाच्या मैदानात ४०० मीटरच्या ४-५ फेऱ्या पळत रोज १.६ किलोमीटर पूर्ण करायचे. “५ मिनिट २० सेकंद किंवा ५ मिनिट २५ सेकंदात तेवढं अंतर मी पार करत होतो,” तो सांगतो.
त्यानंतर दिवसभरात ५-६ वेळा तरी तो इतकं अंतर पळायचा. दर वेळी सगळं लक्ष वेळावर असायचं. शिवाय ८-१० पुल-अप, अनेक बैठका, पुश-अप आणि इतर व्यायाम सुरू असायचा. “मला जर आर्मीची फिजिकल देता आली असती ना, माझ्या छातीवर ‘एक्सलंट’ हा शिक्का निश्चित पहायला मिळाला असता,” तो सांगतो. एखाद्या उमेदवाराने जर दिलेलं अंतर वेळेच्या बरंच आधी पळून पूर्ण केलं तर सैन्यदलाचे अधिकारी खरंच असा शिक्का त्या उमेदवाराच्या छातीवर मारतात.
ती शारीरिक चाचणी सर करण्याची सगळी तयारी विकासने केली होती.
जून २०२२ उजाडला. आणि मग जे काही घडलं त्याने कोविड-१९ पेक्षा मोठा धक्का या तरुणांना दिला. आणि कोणता नवा आजार नव्हता आला, एक नवं धोरणच जिवावर उठलं.
ते धोरण म्हणजे ‘अग्निपथ योजना.’ या योजनेची चाचणी पार केली तरी त्याच्या छातीवर उत्कृष्ट असा शिक्का काही यायचा नाही. फक्त त्याच्या गणवेशावर आणि इतर साहित्यावर अग्निवीर असं लिहिलं जाईल.
















