हिरा लाल रास्पा दररोज सकाळी लिंडूरमधल्या आपल्या शेताकडे जायला निघतात, तेव्हा भीतीने त्यांचं मन काहुरलेलं असतं. “एकच विचार फिरून फिरून मनात येत असतो माझ्या- आज शेतातला आणखी एखादा भाग धसला तर नसेल? मग उद्याचं काय?” ते म्हणतात.
रास्पा हे एक आदिवासी शेतकरी. हिमाचल प्रदेशातल्या लाहौल स्पिती भागामधल्या लिंडूर गावचे. यांचं वय ५५ वर्षं. २०२५ सालच्या एप्रिल महिन्यात त्यांनी आपल्या २.५ बिघे (अंदाजे ०.२ एकर) शेतजमिनीवर बटाट्याची लागवड केली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांची अर्धीअधिक शेतजमीन धसली आणि रुंदीकरण होत असलेल्या एका नाल्याला जाऊन मिळाली.
उरलंसुरलं पीक अजूनही शेतात धडधाकट उभं दिसतंय, पण ते कितपत टिकेल याबद्दल रास्पांना फारशी खात्री नाही.
एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून ऑक्टोबरपर्यंत इथे उन्हाळ्याचा मौसम असतो. दरवर्षी सहा महिने इथे बर्फ पडतं आणि सारंकाही ठप्प होऊन जातं. म्हणूनच या लाहौल स्पिती खोऱ्यातल्या रहिवाशांसाठी हा उन्हाळ्याचा मौसम महत्त्वाचा ठरतो. फक्त याच मौसमात स्थानिक लोक इथे अन्नधान्य पिकवू शकतात आणि नगदी पिकं घेऊ शकतात.
तसा इथला जून महिना कठोर परिश्रमांचा; पण सहसा आशादायी! यावर्षी मात्र हा महिना झाकोळल्यागत गेला. लोक शरीराने आपापल्या शेतात राब राब राबले, पण मनभर चिंताच होती त्यांच्या!
“रोजच्या रोज दर आठवड्याला माझ्या शेतजमिनीचा थोडा थोडा भाग गायब होतोय,” रास्पा सांगत असतात, “बटाटे कापणीला येईपर्यंत माझं सगळं शेतच गायब होऊन जाईल कदाचित!”
अत्यंत हताशेतून ते म्हणतात, “आमची घरं, आमची जमीन, आमची शेतं - सारंच निसटत चाललंय. परमेश्वर आम्हाला कशाची शिक्षा देतोय, काही कळत नाहीये. नरकापेक्षा कमी नाहीये या लिंडूरमधलं जगणं!”
भूस्खलन म्हणजे जमिनीखालच्या मातीच्या संरचनांमधे झालेल्या बदलांमुळे जमीन धसणं किंवा वाहून जाणं. इथे सातत्याने होत असलेलं भूस्खलन हा इथल्या स्थानिकांच्या दृष्टीने नरकच!














