मालोजी चव्हाणला त्याच्या द्राक्षबागेत जाताना कुणाच्या आधाराची गरज भासत नाही. एक एकर शेतीत त्यानं ही द्राक्ष लागवड केली. त्याचा मित्र संतोष हिंगमिरेपासून काही अंतरावर तो उभा असतो. त्याच्या हालचाली दृष्टीवर नव्हे तर अंतःप्रेरणेवर अवलंबून होत्या. ३१ वर्षीय मालोजीला त्याच्या जमिनीची पुरेपूर माहिती आहे.
द्राक्षाच्या वेलीला आधार देणाऱ्या लोखंडी खांबाकडे बोट दाखवत तो म्हणाला, “तुम्हाला ती फांदी दिसती का?”
आम्ही फांदीचा शोध घेत “नेमकी कोणती?” असा प्रतिप्रश्न केला.
विसंगतीवर हसत हसत तो खाली झुकला आणि एक कोवळी फांदी उपटली. त्या वेलीच्या टोकावर पाच कोवळी पानं होती. त्यावरून बोटं फिरवत तो हळूच बोलला, “हे काही चांगलं वाढणार नाही, त्याला कंदही फुटणार नाही. याची मुळं खराब झालीयेत, खूप दिवस झाले त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाहीये.”
ती एक कोवळी वेल एक एकर द्राक्षबागेची व्यथा दर्शवत होती. ही शेती मालोजीच्या आईवडिलांची म्हणजेच धनाजी आणि पुष्पाबाई ह्यांची आहे. त्यांच्या पाच एकर शेतीत एक एकरावर त्यांनी द्राक्ष लागवड केली. पण यंदा द्राक्षाचं पीक हाती येणार नाही. या कुटुंबाचं अंदाजे दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय. ज्यानं ते आर्थिकृष्ट्या दहा वर्ष मागे गेले.
२०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनं पीकांची मोठी नासाडी झाली. पाऊस थांबायलाच तयार नव्हता. फक्त जामगावच नाही. अख्खा सोलापूर जिल्हा, शेजारच्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यापासून ते सबंध मराठवाड्यात धो-धो पाऊस बरसला. नोव्हेंबर २०२५ च्या सुरुवातीपर्यंत सोयाबीनची शेतं आणि द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. या दुष्काळग्रस्त पट्ट्यातील कोरडे असणारे ओढे-नाले यंदा दुथडी भरून वाहिले.
२०२५ च्या मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत बरसतच राहिला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कधी नव्हे इतका पाऊस पडला. १९ आणि २५ सप्टेंबरला परिस्थिती हाताबाहेर गेली, अनेक ठिकाणी झालेली ढगफुटी अन् अचानक आलेला पूर यानं हाताशी आलेली पिकं, फळबागा, माती, गुरं आणि मनुष्यहानी झाली. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ४७००० हेक्टरवरील शेतीचं आतोनात नुकसान झालं.













