“तुम्ही प्रकाशात जन्माला आलायत आणि आम्ही अंधारात,” नंदराम जामुनकर म्हणतात. अमरावती जिल्ह्यातल्या खडीमाळ गावात आपल्या मातीच्या घराबाहेर ते बसलेले होते. २६ एप्रिल रोजी इथे लोकसभेचं मतदान होणार होतं. आणि ते बोलतायत तो अंधार खराखुरा आहे. महाराष्ट्राच्या या गावात आजवर कधीही वीजच आलेली नाही.
“दर पाच वर्षांनी कुणी तरी येतं आणि वीज येईल असा शब्द देऊन जातं. अहो विजेचं सोडा, सांगणारी माणसं सुद्धा परत येत नाहीत,” ४८ वर्षीय नंदराम म्हणतात. इथल्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत त्या अमरावती मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत.
चिखलदरा तालुक्यातल्या १९८ उंबरा असलेल्या या गावात पोटापाण्यासाठी बहुतेकांची भिस्त मनरेगावर आहे. काही जणांची थोडी फार शेती आहे तीही कोरडवाहू. त्यात मका घेतली जाते. खडीमाळचे बहुतेक रहिवासी आदिवासी असून इथे नळाला पाणी आणि वीज काय असते हे फारसं कुणाला माहितही नाही. नंदराम कोरकू आहेत आणि ते कोरकू भाषा बोलतात. २०१९ साली आदिवासी विभागाने लुप्त होणाऱ्या भाषांमध्ये तिचा समावेश केला आहे.








