“आता वाटतं की माझे अब्बा खोटं सांगायचे. ते म्हणायचे की समुद्रात राहणाऱ्यांना मृत्यूची भीती वाटत नाही. मी वयाच्या १७ व्या वर्षी खलाशी म्हणून पहिली नोकरी पत्करली तेव्हा ते मला असं सांगायचे,” आपल्या हातांकडे बघत ४३ वर्षांचे नजीर जुनास बाया बोलत होते. हे तेच हात होते ज्यांनी ‘एमएसव्ही अल फैज नूर ई सुलेमानी’ हे जहाज ओमानच्या आखातात बुडण्यापूर्वी सहा महिने चालवले होते. कॅप्टनच्या सांगण्यावरून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज नेताना क्षेपणास्त्र धडकल्याचा तो भयानक क्षण त्यांना आठवतो.
“अब्बा खोटं बोलत होते,” ते पुन्हा म्हणतात, “जहाजात पाणी शिरताना पाहून मी तर प्रचंड घाबरलो होतो. ८ मे २०२६ ची मध्यरात्र होती. एका क्षेपणास्त्राला जणू आमचा जीवच घ्यायचा होता. आम्हाला तेव्हा इराणने होर्मुझ ओलांडण्यास मनाई केली नव्हती. त्यामुळे हल्ला त्यांनी केला असण्याची शक्यता कमीच आहे. आम्ही एक प्रचंड मोठा स्फोट ऐकला आणि क्षणार्धात मोठी आग लागली.” हे सांगताना नजीर थोडं थांबतात. आपल्या लोकांशी बोलताना वापरल्या जाणाऱ्या कच्छी सिंधीऐवजी हिंदी आणि गुजरातीच्या मिश्रणात ते बोलतात. आम्ही गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील बंदर असलेल्या सलाया शहरात आहोत. इथंच त्यांचं एक मजली घरात असून आम्ही तिथे बसलो होतो.
























