इथली बहुतेक कुटुंबं आधी जनावर विकत घेतात आणि त्याच्या चाऱ्याचा विचार नंतर करतात. पण जसविंदर कौर आणि त्यांचे पती जगसीर सिंह यांची योजना नेमकी याच्या उलट आहे.
जी म्हैस त्यांना विकत घेणं अजून शक्य नाही, तिच्या चाऱ्यासाठी ते कुप्प आधीच बांधून घेत आहेत. कारण यावर्षी तुर्रीच्या (गव्हाच्या चिरलेल्या कांड्या म्हणजेच कोरडा चारा) किमती तब्बल ७५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. २०२४ मध्ये तुरीचा क्विन्टलचा भाव ८००–१,००० इतका होता; पण या हंगामात तोच भाव रुपये २००–२५० इतका खाली आला आहे.
म्हणूनच संगरूर जिल्ह्यातल्याचांगलिवाला गावात जनावर आणण्याआधीचचारा स्वस्तात घेऊन तो साठवून ठेवणं शहाणपणाचं आहे, असं या दोघांनाही वाटलं.
कुटुंबाला अतिरिक्त पोषणाची गरज आहे. त्याचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा २७ वर्षांचा तरुण मुलगा नव्या उमेदीचा कबड्डीपटू आहे आणि घरची म्हैस असेल तर एक ग्लास दूध त्याचं नक्कीच आवश्यक ते पोषण करेल. “आमचा मुलगा गावात कबड्डी खेळतो. तो एक उत्तम कबड्डीपटू आहे. आणि त्याला चांगला आहार मिळणं गरजेचं आहे,” असं ५० वर्षांच्या जसविंदर म्हणतात. या दाम्पत्याला दोन मुली सुद्धा आहेत. एकीचं लग्न झालं असून ती बाहेरगावी राहते; तर दुसरी आहे २५ वर्षांची गगन. हिने पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे पण, आई आजारी पडल्यापासून घरकामाची सगळीच जबाबदारी तिच्याकडे आहे.
कुटुंबाने जेव्हा कुप्प बांधायचं ठरवलं तेव्हा जगसीर यांनी आपल्या मामेभावाला, गुरमेल सिंगना बोलावून घेतलं. ६० वर्षांचे हे कुशल कारागीर गेल्या ४० वर्षांत तब्बल २,००० हून अधिक कुप्प बांधल्याचं आपल्याला सांगतात. “पूर्वी गहू कापणीनंतरच्या महिन्यांत आम्ही दिवसाला किमान दोन कुप्प बांधत असू,” ते सांगतात.
कुप्प हा चारा साठवण्यासाठीचाघुमटाकार, कमी खर्चाचा तात्पुरत्याबांधकामाचा एक प्रकार आहे. एकेकाळी पंजाबच्या ग्रामीण दृश्याचा अविभाज्य भाग असलेले कुप्प आता क्वचितच दिसतात. दिल्लीहून पंजाबमधील चांगलिवालाकडे जाताना, पारीला रेल्वे प्रवासात फारच थोडे कुप्प दिसले.



















