अनेक प्रकारे ही एक दैवी सभा आहे.
बस्तर प्रदेशातील अनेक देवता नारायणपूरच्या मावली उत्सवात वर्षातून एकदा एकत्र येतात (याच नावाने जिल्ह्याचे मुख्यालय आहे.) दरवर्षी हा मडई (देवतांचा मेळावा) कापणीनंतर आयोजित केला जातो. ही परंपरा ७०० वर्षांहून जुनी असल्याचं म्हटलं जातं.
छत्तीसगडचा बस्तर प्रदेश आणि आसपासच्या भागातली, अबूझमाड (याला अबूझमार्ह, अबूझमद असेही म्हणतात) पासून ते कांकेरसारख्या दुर्गम भागातली आदिवासी कुटुंबं आणि समुदाय आपापल्या देवी-देवतांना घेऊन येतात. त्यांचा हा चैतन्यदायी प्रवास आणि आगमन संगीत आणि नृत्याच्या सोबतीनं पूर्ण होतं.
लोक या मडाईत त्यांच्या कौटुंबिक देव-देवतांना घेऊन येतात. इथले आदिवासी त्यांच्या पूर्वजांनाही त्यांची देवता मानतात. मावली उत्सवात एका कुटुंबातील देवतांची दुसऱ्या कुटुंबातील देवतांशी भेट होते. आदिवासी देवता माणसांसारख्या वागतात आणि त्यांचे नातेवाईकही असतात. त्या देवता एकमेकांना भेटतात, गळाभेटी घेतात आणि मिळून-मिसळून उत्सव साजरा करतात.
नारायणपूरचे रहिवासी असलेले म्हातारबाबा विश्वनाथ देवांगन सांगतात, की “हा एक आठवडाभर चालणारा उत्सव आहे.” विश्वनाथ देवांगन आदिवासी नाहीत, पण त्यांच्यासारखे अनेक जण हा उत्सव पाहायला येतात.
उत्सवाची सुरुवात मावली मातेच्या जत्रेनं होते आणि मग आसपासच्या इतर देवतांचं आगमन होतं. हे देखील वाचा: गांगरेलमध्ये विस्थापित देवीचं नृत्य
मी फेब्रुवारीच्या एका उबदार सकाळी इथं पोहोचलो होतो. नारायणपूरमधलं मोठं सार्वजनिक मैदान बाजाराजवळ आहे आणि ते झपाट्याने भरत होतं. हजारो माणसं बसेस, टॅक्सींनी येत होती आणि बरीच माणसं कालपासून आपापल्या गावांमधून पायी आली होती. अनेकांच्या पायांत चपलाही नव्हत्या.
























