पाच-सहा खेकडे तुमच्या तळहातावर सहज मावतात. थोडं तिखट आणि मीठ घालून वाटले की एकदम चविष्ट लागतात. म्हणून रामप्रसाद आणि त्याचे मित्र खेकडे (स्कायला सेरेटा) एका प्लॅस्टिकच्या बाटलीत पकडून ठेवतात आणि मेजवानीसाठी तयार होतात.
मुलं झाडाच्या गर्द सावलीत बसतात. सूर्याच्या तलखीपासून तितकीच जरा सुटका. आंध्र प्रदेशाच्या श्री सत्य साई जिल्हयातल्या मालकावरीपल्ली थांडा म्हणजे इथला बंजारा लोकांचा तांडा. त्यांचं आवडतं खाणं म्हणजे हे खेकडे. त्यांना हिरवे खेकडे किंवा खारफुटीतले खेकडेसुद्धा म्हटलं जातं. हे खेकडे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर सापडतात.
ही शांत जागा अमादागुर मंडलच्या दरीत वसलेली आहे – इथल्या टेकड्यांच्या पायथ्याशी भातशेती, टोमॅटो आणि मिरचीची शेतं दिसतात. इतकं सुंदर हिरवंकंच दृश्य समोर असतं. पण इथे बोअरवेल मात्र ८०० ते १२०० फूट खोल गेल्या आहेत. एवढंच नाही तर पिकाला सिंचनासाठी दिवसातले फक्त आठ तास पाणी मिळतं.






