मुख्य मंचाच्या समोर बसलेला जनसागर निःशब्द झाला. उरली ती धडधड, इथल्या आणि आपापल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या हृदयाची. नेते मंडळी आदराने माना खाली झुकवून शांत उभे होते. त्यांचा निर्धार मात्र उंचावत होता. अतिशय भावुक अशा या क्षणी आपल्या शिरावर मातीचे घडे घेऊन आठ तरुण सिंघु सीमेवरच्या संयुक्त किसान मोर्चाच्या मंचावर चढले.

या प्रत्येक घड्यामध्ये अतिशय पवित्र अशी माती होती. २३ मार्च २०२१ रोजी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी चढवलं गेलं, त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करून ही माती संघर्षरत शेतकऱ्यांपर्यंत पोचली होती.

“पंजाबातून आलेल्या या तरुणांनी आठ ऐतिहासिक स्थळांवरून ही माती आणलीये. या अशा जागा आहेत ज्या आपणा सर्वांसाठी खास आहेत – आपल्या मनात गोंदलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करुया,” मंचावरून शेतकरी नेते जतिंदर सिंग चीमा छिना यांनी आवाहन केलं.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात मातीला सांस्कृतिक आणि ऐहिक दृष्ट्या मोल आहे. या शहीद दिवसाला त्याला नवे राजकीय, ऐतिहासिक अर्थ प्राप्त झाले. शेतकऱ्यांसाठी पवित्र असलेली आणि त्यांच्या मनाच्या अगदी गाभ्यात जपलेली या शहिदांच्या गावातली ही माती इथे आणली गेली ते शेतकऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी, त्यांच्या संघर्षात आत्मा फुंकण्यासाठी. ही कल्पना पुढे आली जिल्ह्याच्या स्तरावर होणाऱ्या शेतकरी संघटनांच्या बैठकांमधून.

Young farmers carrying the pots on their heads as they walk to towards the stage at Singhu. Left: Supporters stand by
PHOTO • Harpreet Sukhewalia
Young farmers carrying the pots on their heads as they walk to towards the stage at Singhu. Left: Supporters stand by
PHOTO • Harpreet Sukhewalia

सिंघुमध्ये मंचाच्या दिशेने आपल्या माथ्यावर मातीचे घडे घेऊन जाणारे तरूण. डावीकडेः बाजूला उभे असलेले समर्थक

“आता, या क्षणी, मला भरून आलंय. आम्हा सगळ्यांनाच. हे शहीद कुठल्या हाडामासाने बनलेले होते, कुणास ठाऊक?” पंजाबच्या संगरूरचा ३५ वर्षीय शेतकरी भुपेंदर सिंग लोंगोवाल म्हणतो. ही माती आणणाऱ्यांपैकी तोही एक. “आम्ही ही माती गोळा केली कारण ती आम्हाला जुलुम करणाऱ्यांच्या विरोधात लढण्याचं बळ देते, आमचा निर्धार पक्का करते.”

२३ मार्च रोजी साजरा झालेला शहीद दिवस म्हणजे दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या ऐतिहासिक आणि आजवर झालेल्या सर्वात मोठ्या, अहिंसक शेतकरी आंदोलनाचा ११७ वा दिवस.

शेतकरी या नव्या कायदेशीर ‘सुधारणां’चा विरोध करत आहेत. शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०.

शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या कायद्यांमध्ये शेती करणाऱ्यासाठी आधारभूत असणाऱ्या इतर घटकांनाही दुय्यम ठरवलं गेलं आहे, जसं की किमान आधारभूत किंमत (हमीभाव), कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि शासनाकडून होणारी खरेदी, इत्यादी.

शेती कॉर्पोरेट क्षेत्राच्या घशात गेली तर शेतकरी-उत्पादकांच्या गरजा भागणं तर सोडाच, त्यांच्या हक्कांच कसलंच रक्षण होणार नाही आणि त्यांचा संघर्ष या विरोधात आहे असं शेतकरी मानतात. त्यांच्यासाठी आपली जमीन आणि अधिकारांसाठी सुरू असलेली ही लढाई न्याय आणि लोकशाहीसाठी देखील आहे. हा लढा स्वातंत्र्यासाठी आहे. फक्त यावेळी जुलमी राजवट परकीयांची नाही.

'Right now, I am emotional. We all are. I do not know what blood and bones these martyrs were made of', said Bhupender Singh Longowal. Left: Portraits of Sukhdev, Bhagat Singh and Rajguru at the Shahid Diwas event
PHOTO • Amir Malik
'Right now, I am emotional. We all are. I do not know what blood and bones these martyrs were made of', said Bhupender Singh Longowal. Left: Portraits of Sukhdev, Bhagat Singh and Rajguru at the Shahid Diwas event
PHOTO • Amir Malik

‘आता, या क्षणी, मला भरून आलंय. आम्हा सगळ्यांनाच. हे शहीद कुठल्या हाडामासाने बनलेले होते, कुणास ठाऊक?’, भुपेंदर सिंग लोंगोवाल म्हणतो. डावीकडेः शहीद दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सुखदेव, भगत सिंह आणि राजगुरूंच्या तसबिरी

“हे क्रांतीकारक इंग्रजांच्या विरोधात लढले,” पंजाबच्या फरीदकोट कोट कपुरा तालुक्याच्या औलख गावतला २३ वर्षांचा मोहन सिंह औलख सांगतो. “ती राजवट दमनकारी आणि जुलमी होती. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंग्रज गेले. पण जुलमी सत्ता आजही तशीच आहे.” त्यामुळे त्याच्यासाठी आणि त्या दिवशी तिथे जमलेल्या प्रत्येकासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या रक्ताघामाने भिजलेली माती पुन्हा स्वतःच्या मुठीत घेणं हे आपल्या घटनादत्त अधिकारांचाच उद्घोष करण्यासारखं होतं.

२३ मार्च रोजी सकाळी ते सगळे सिंघुमध्ये आले. ते म्हणजे देशभरातले २००० शेतकरी. मंचावर, जिथे मातीने भरलेले घडे ठेवलेले होते, तिथे भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांच्या तसबिरी लक्ष वेधून घेत होत्या.

२३ मार्च १९३१ रोजी इंग्रजांनी त्यांना लाहोर मध्यवर्ती कारागृहामध्ये फासावर चढवलं तेव्हा हे तिघं केवळ विशीत होते. हुसैनीवाला गावात रात्रीच्या कभिन्न अंधारात त्यांचे मृतदेह गपचूप आणले गेले आणि दहन केले गेले. १९६८ साली याच गावात, पंजाबच्या फिरोझपूर जिल्ह्यात, सतलज नदीच्या तीरावर हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारक बांधण्यात आलं. याच ठिकाणी त्यांचे क्रांतीकारी सहकारी बटुकेश्वर दत्त यांचं दहन करण्यात आलं होतं आणि भगतसिंगांच्या आई, विद्यावती यांचंही. सिंघुच्या मंचावर आलेल्या पहिल्या घड्यामध्ये इथली माती होती.

भगतसिंगांना फासावर चढवलं तेव्हा त्यांच्या खिशात कर्तार सिंग सराभांचा फोटो होता. हेही असेच एक शूर स्वातंत्र्यसैनिक. १९१५ साली वयाच्या १९ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फाशी दिलं. दुसऱ्या घड्यातली माती त्यांच्या गावातून, पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातल्या सराभाहून आणली होती. गदर पार्टीचे सदस्य असणारे, तरुण भारतीय क्रांतीकारक सराभा यांच्याबद्दल विद्यावती सांगायच्या की ते भगतसिंगांचे “नायक, मित्र आणि सहकारी” होते.

भगतसिंगांची गोष्ट मात्र ते वयाच्या १२ व्या वर्षी पंजाबातल्या अमृतसरमधल्या जालियाँवाला बागेत गेले तिथे सुरू झाली. इंग्रज सैन्याचा ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याच्या आदेशावरून १३ एप्रिल १९१९ रोजी याच स्थळी १,००० हून अधिक निहत्त्या माणसांची कत्तल करण्यात आली होती. भगत सिंगाने त्या रक्त माखलेल्या  मातीचे गोळे उचलले आणि आपल्या गावी आणले. ही माती त्याने आपल्या आज्याच्या बागेत मिसळली आणि त्या भूमीतून फुलं उगवत असलेली पाहिली. सिंघुमध्ये पोचलेल्या तिसऱ्या घड्यातली माती या जालियाँवाला बागेतली.

Left: The pot with mitti from Khatkar Kalan, ancestral village of Bhagat Singh just outside Banga town in Punjab's Shahid Bhagat Singh Nagar district. Right: Soil from Jallianwala Bagh, which Gen Dyer turned into a graveyard of innocent people in 1919
PHOTO • Amir Malik
Left: The pot with mitti from Khatkar Kalan, ancestral village of Bhagat Singh just outside Banga town in Punjab's Shahid Bhagat Singh Nagar district. Right: Soil from Jallianwala Bagh, which Gen Dyer turned into a graveyard of innocent people in 1919
PHOTO • Amir Malik

डावीकडेः खटकार कालन गावातल्या मातीने भरलेला घडा. पंजाबच्या शहीद भगत सिंग नगर जिल्ह्याच्या बांगा शहराला अगदी लागूनच असलेलं हे भगत सिंगांच्या पूर्वजांचं गाव. उजवीकडेः १९१९ साली जनरल डायरने ज्या ठिकाणी निष्पाप लोकांची कत्तल केली त्या जालियाँवाला बागेतली माती

चौथा घडा आला पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातल्या सुनाम गावाहून. हे उधम सिंगांचं गाव. १३ मार्च १९४० रोजी लंडनमध्ये मायकेल फ्रान्सिस ओड्वायरला गोळी घालून ठार केल्याबद्दल इंग्रजांच्या न्यायालयात खटला चालू असताना त्यांनी आपलं नाव बदलून मोहम्मद सिंग आझाद असं केलं होतं. त्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला आणि ३१ जुलै १९४० रोजी त्यांना लंडनच्या पेन्टॉनव्हिल तुरुंगात फाशी चढवण्यात आलं होतं. १९७४ साली त्यांच्या अस्थी भारतात परत आणण्यात आल्या आणि सुनाममध्ये त्यांचं दहन करण्यात आलं.

“भगत सिंग, कर्तार सिंग सराभा, चाचा अजित सिंग, उधम सिंग आणि आपले गुरू जसे जुलमी राजवटींच्या विरोधात लढले, तसं आम्हीही आमच्या नेत्यांच्या मार्गाने चालत राहण्याचा निर्धार केला आहे,” भुपेंदर लोंगोवाल सांगतो. सिंघुमधले अनेक शेतकरी अशाच भावना व्यक्त करतात.

“जेव्हा जेव्हा बलवान लोक दुर्बलांवर त्यांची सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात, आम्ही ती कायम उलथून टाकली आहे,” ६४ वर्षीय अभय सिंग म्हणतात. कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात आपला जीव गमावलेल्या ३०० हून अधिक शेतकऱ्यांची स्मृती जागवत ते सांगतात.

पाचवा घडा आला फतेहगढ साहिब इथून. पंजाबातल्या याच नावाच्या गावातून. याच गावात २६ डिसेंबर १७०४ रोजी गुरु गोबिंद सिंग यांच्या दोघा लहानग्या मुलांना, पाच वर्षांचा बाबा फतेह सिंग आणि सात वर्षांचा बाबा झोरावर सिंग यांना सिरहिंदचं मुघल राज्य चालवणाऱ्या वझीर खान याच्या आदेशावरून जिवंतपणी विटांनी चिणून टाकलं गेलं होतं.

सहावा घड्यातली माती होती गुरुद्वारा कातलगढ साहिब इथली. पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातल्या चमकौर गावात याच ठिकाणी गुरु गोबिंद सिंग यांची थोरली मुलं मुघलांशी लढताना धारातीर्थी पडली – १७ वर्षांचा अजित सिंग आणि १४ वर्षांचा जुझर सिंग. रुपनगर जिल्ह्यातल्या नुरपूर बेदी तालुक्यातल्या रणबीर सिंगने हा घडा इथे आणला होता. कृषी कायद्यांविरोधात इथे असलेल्या आंदोलकांच्या मनावर या चार भावांचं शौर्य आणि शहादत यांच्या कहाण्या खोलवर कोरल्या गेलेल्या आहेत.

All eyes watched in anticipation as eight young men climbed onto the stage of the Samyukta Kisan Morcha at Singhu carrying the earthen pots on their heads
PHOTO • Harpreet Sukhewalia
All eyes watched in anticipation as eight young men climbed onto the stage of the Samyukta Kisan Morcha at Singhu carrying the earthen pots on their heads
PHOTO • Harpreet Sukhewalia

आपल्या माथ्यावर हे घडे घेऊन हे आठही तरूण जेव्हा सिंघुमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या मंचावर चढले तेव्हा सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते

सातवा घडा होता आनंदपूर साहिबचा. पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातल्या खालसाचं हे जन्मस्थान. खालसा म्हणजे ‘शुद्ध’. १६९९ साली गुरु गोबिंद सिंगांनी निष्पापांचं शोषण आणि हत्येपासून रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या योद्ध्यांचा शीख धर्म स्थापन केला. खालसा या धर्माचा हा एक पंथ आहे. “खालसा स्थापन केल्यानंतर आम्हाला जुलमाला प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य मिळालं. आणि कृषी कायद्यांच्या विरोधातलं आंदोलन देखील पंजाबातच सुरू झालं. आपला देश शहिदांचा आदर ठेवणारा, त्यांना मानणारा देश आहे,” रणबीर सिंग म्हणतो.

वेगवेगळ्या ठिकाणाहून ही माती घेऊन येणारे हे तीन युवक, भुपेंदर, मोहन आणि रणबीर सांगतात की दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारे शेतकरी जरी या ठिकाणांना भेटी देऊ शकत नसले तरी तिथली माती “आपला लढा जोरकसपणे लढण्याचा त्यांचा निर्धार बळकट करेल, त्यांचं मनोधैर्य वाढवेल, त्यांना बळ देईल.”

या आठ घड्यांच्या रांगेतला शेवटचा घडा. पंजाबच्या शहीद भगत सिंग नगर जिल्ह्यातल्या बांगा शहराला लागूनच असलेल्या खटकर कालन या भगत सिंगांच्या मूळ गावातून आलेला. त्यांचे पुतणे अभय सिंग सांगतात, “भगत सिंगांच्या विचारांचा गाभा म्हणजे माणसांकडून होणारं माणसाचं आणि देशांकडून देशांचं होणारं शोषण संपवणं. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेली ही लढाई याच आदर्शांच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे.”

“भगत सिंगांना शहीद-इ-आझम म्हणतात ते त्यांच्या विचार-कल्पनांमुळे. आणि हा विचार काय, तर तुमचा इतिहास तुम्ही स्वतःच लिहायला पाहिजे. आम्ही स्त्रिया, शेतकरी, शोषित आज आमचा इतिहास स्वतः लिहितोय,” ३८ वर्षांच्या शेतकरी आणि कार्यकर्त्या सविता म्हणतात. हरयाणाच्या हिसार जिल्ह्यात हन्सी-१ तहसिलातल्या सोरखी गावात त्यांच्या मालकीची पाच एकर जमीन आहे.

“हे सरकार नवे कायदे घेऊन येतंय कारण त्यांना मोठ्या कंपन्यांना सहजी आमची जमीन मिळवून द्यायचीये. आणि केंद्राचा हुकुम जे मानत नाहीत त्यांना शासन तुरुंगात टाकतंय. आमचा लढा फक्त तीन कृषी कायद्यांच्या विरोधात नाही. या बड्या कंपन्यांच्या विरोधात देखील आहे. पूर्वी आम्ही इंग्रजांच्या विरोधात लढलोय. आणि आता आम्ही त्यांच्या कुशीत बसलेल्यांच्या विरोधात संघर्ष करू.”

अनुवादः मेधा काळे

Amir Malik

Amir Malik is an independent journalist, and a 2022 PARI Fellow.

Other stories by Amir Malik
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale