पुजारी अंजनेयुलु एका शेतातून चालत चाललेत. हाताच्या तळव्यावर नारळ. हाच नारळ गोल फिरणार, एका कडेला झुकणार आणि खाली पडणार. त्याच क्षणाची ते वाट पाहतायत. आणि जिथे हे घडेल त्या जागेवर फुलीची खूण करायची, ते आम्हाला खात्रीने सांगतात. “इथे पाणी लागणार तुम्हाला. इथेच बोअर पाडा आणि बघा तुम्हीच,” अनंतपूरमधल्या मुद्दलापुरम गावी आमचं हे संभाषण सुरू होतं.
शेजारच्याच एका गावात रायुलु
धोमथिम्मण्णा दुसऱ्या एका शेतात खाली वाकून काही तरी करतायत. रायलप्पादोड्डीमधल्या
या शेतात त्यांच्या हातातलं लाकडाची बेचकीच त्यांना पाण्यापाशी घेऊन जाणार आहे.
“ही फांदी वरती उडते, तिथेच पाणी लागणार,” ते सांगतात. आपला अंदाज “९० टक्के” खरा
निघत असल्याचंही ते अगदी साधेपणाने सांगून टाकतात.
अनंतपूरच्या दुसऱ्या एका तालुक्यात
चंद्रशेखर रेड्डींना वेगळाच प्रश्न सतावतोय. त्यांनाच नाही, अनेक
तत्त्ववेत्त्यांनी युगानुयुगे यावर खल केलाय. मृत्यूनंतर जीवन असतं? रेड्डींच्या
मते त्यांना याचं उत्तर सापडलंय. “पाणी म्हणजेच ते जीवन आहे,” ते म्हणतात. एका
मसणवट्यात त्यांनी चार बोअर पाडल्या आहेत. त्यांच्या शेतात ३२ बोअर आहेत, त्या
सोडून या चार. जंबुलदिने गावातल्या आपल्या या सगळ्या जलस्रोतांना जोडण्यासाठी
त्यांनी ८ किलोमीटरची पाइपलाइनसुद्धा केलीये.
अंधश्रद्धा,
दैवी शक्ती, देव, सरकार, तंत्रज्ञान किंवा चक्क नारळ. अनंतपूरमध्ये पाण्याच्या
शोधात वणवण फिरणाऱ्या लोकांनी मिळेल त्या गोष्टीचा आधार घेतलेला दिसतो. या
सगळ्यांचं एकत्रित यशही तसं फारसं काही नाही. पुजारी अंजनेयुलुंचा दावा मात्र
सगळ्यांपेक्षा वेगळा आहे.
या हसऱ्या, मृदू स्वभावाच्या
गृहस्थाचं म्हणणं आहे की त्यांची पद्धत हमखास यशस्वी ठरते कारण त्यांच्या हाताचं
कौशल्य थेट भगवंताकडून त्यांना मिळालेलं आहे. “लोकांनी मला चुकीच्या वेळी पाणी
शोधायला लावलं की सगळी गडबड होते आणि माझा अंदाज फक्त तेव्हाच चुकू शकतो,” ते
सांगतात.
शंका घेणारे नेहमीच असतात. एका शेतकऱ्याने हा उपाय करून पाहिला खरा. “पाणी लागलं ना, फक्त त्या भाxxxx नारळात तेवढं लागलं,” तो अगदी वैतागून म्हणतो.
आम्ही बोलत असतानाच रायुलुंच्या
हातातली फांदी अचानक हलते. त्यांना नक्की म्हणजे नक्की पाणी लागलंय. त्यांच्या एका
बाजूला तळं आहे आणि दुसऱ्या बाजूला एक चालू बोअरवेल. रायुलु म्हणतात की त्यांचा
देवावर विश्वास नाही. कायद्याचं सगळंच वेगळं असतं. “आता माझ्या या कौशल्यामुळे मला
कुणी फसवणूक केली म्हणून कोर्टात खेचणारे का?” त्यांना आमच्याकडून थोडा धीर हवा
असतो. आणि आम्ही त्यांना तो देतो. कसंय, पाण्याचं सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या
सरकारी कर्मचाऱ्यांना येणारं यश पाहिलं तर त्यापेक्षा तर त्यांचा अंदाज वाईट
नक्कीच नसणार.
भूजल
सर्वेक्षण विभागाच्या भूगर्भशास्त्रज्ञांची कामगिरीही फारशी चमकदार नाहीच. त्यांना
तज्ज्ञ म्हणावं का हा तर वेगळाच प्रश्न आहे. काहींबाबतीत तर नक्कीच. कारण कार्यालयीन
वेळांव्यतिरिक्त थोडे फार पैसे घेऊन पाणाड्याचं काम करणं जास्त फायदेशीर ठरतं.
त्यात जर तुम्ही ‘तज्ज्ञ’ असाल तर मग गिऱ्हाइकांची रांग हटतच नाही. सहा जिल्ह्यांमध्ये
आम्ही फिरलो आणि तिथे या तज्ज्ञांनी पाणी लागेल म्हणून सांगितलेल्या जवळपास सगळ्या
जागा कोरड्या ठाक होत्या. बोअरवेल अगदी ४०० फूटापर्यंत गेली तरी पाणी लागलं
नव्हतं. पुजारी आणि रायुलु हे पाणाड्यांच्या वाढत्या संख्येतले आणखी दोन.
प्रत्येक पाणाड्याची स्वतःची अगदी
खास पद्धत आहे बरं. राज्याच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला पाणाडे भेटतात. त्यांच्या या
भन्नाट पद्धती एस. रामू नावाच्या द हिंदू वर्तमानपत्राच्या एका तरुण वार्ताहराने
नोंदवून ठेवल्या आहेत. त्या वाचाच. पाणाड्याचा रक्तगट ‘ओ’ पॉझिटिव्ह असला पाहिजे.
एकाच्या मते साप जिथे घर करतात तिथे पाणी लागतं. अनंतपूरमध्ये ‘पाणीवेड्यांची’
संख्या कमी नाही हेच खरं.
पण हा सगळा वेडेपणा सुरू असण्यामागचं
खरं कारण तरी काय आहे? या जिल्ह्यात सलग चार पिकं हातची गेली आहेत. रेड्डींनी स्मशानभूमीत
खोदलेल्या चार बोअरवेलना म्हणावं तितकं पाणी लागलेलं नाही. फक्त पाण्याच्या शोधात
व्हिलेज ऑफिसर या पदावर काम करणाऱ्या रेड्डींनी आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले
आहेत. आणि दर महिन्याला त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. “मागच्याच
आठवड्यात मी सरकारच्या हेल्पलाइनवर फोन केला होता,” ते सांगतात. “हे असंच नाही
चालू शकत. आम्हाला थोडं तरी पाणी मिळायलाच पाहिजे.”
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि गहिऱ्या होत जाणाऱ्या कृषी संकटाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात वाय. एस. आर. राजशेखर रेड्डींच्या शासनाने एक हेल्पलाइन सुरू केली होती. इतर राज्यांपेक्षा या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या जास्त आहे. त्यातही अनंतपूर जिल्हा सर्वात जास्त संकटात आहे. ‘अधिकृत’ आकडेवारीनुसार या जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत ५०० शेतकऱ्यांनी जीव दिला आहे. इतर अंदाज हा आकडा याहून किती तरी पटीने जास्त असल्याचं दाखवतात.
रेड्डींचा हेल्पलाइनला गेलेला फोन ही
सरळ सरळ धोक्याची घंटा आहे. त्यांना असलेला धोका स्पष्ट आहे. आणि त्यांची परिस्थिती
बिकट आहे यात वाद नाही. पाण्याचं स्वप्न आणि कर्जाचा बोजा. ज्या फळबागांसाठी त्यांनी
मोठी गुंतवणूक केली त्या आज सुकून गेल्या आहेत. आणि बोअरवेल्सची परिस्थितीही तीच
आहे.
असं संकट आलं की त्यावर आपली पोळी
भाजण्यात अतिश्रीमंतांचा हात कुणीच धरू शकत नाही. पाण्याची खाजगी बाजारपेठ जोरात
सुरू आहे. शेतीतून निघणार नाही इतका पैसा हे ‘पाणी-दार’ आपल्या बोअरवेलमधून पाणी उपसून
ते विकून करतायत.
आपलं एकरभर रान भिजवण्यासाठी ७०००
रुपये मोजण्याची वेळ हतबल शेतकऱ्यांवर आली आहे. जे काही पाणी आहे त्यावर कब्जा
करणाऱ्या आपल्याच शेजाऱ्याला पैसे देण्याची वेळ लोकांवर आलीये. किंवा त्याच
पाण्यासाठी मग टँकरवाल्याचे खिसे गरम करायचे.
अशा संकटकाळात लोक, समुदाय वगैरे
सगळं मागे पडतं. महत्त्व फक्त पैशाला. “एकरभर शेतीचा खर्च किती वाढतो तुम्हाला
कल्पना तरी आहे का?” रेड्डी विचारतात. महामार्गावरून दौडत जात असलेल्या बोअरवेल
पाडणाऱ्या गाड्या आणि पाणाडे साटंलोटं करून पाणी शोधण्याचा धंदा करतायत. एकाच्या
धंद्यात दुसऱ्याचा नफा आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अतिशय गंभीर आहे.
हिंदुपुरचे दीड लाख रहिवासी वर्षभरात पिण्याच्या पाण्यावर ८ कोटी रुपये खर्च करत
असावेत असा अंदाज आहे. एका पाणी दांडग्याने चक्क नगरपालिकेच्या कचेरीभोवतीच मोठी
जागा विकत घेतली आहे इतक्यात.
अंधश्रद्धा, दैवी शक्ती, देव, सरकार, तंत्रज्ञान
किंवा चक्क नारळ. अनंतपूरमध्ये पाण्याच्या शोधात वणवण फिरणाऱ्या लोकांनी मिळेल
त्या गोष्टीचा आधार घेतलेला दिसतो. मात्र या सगळ्यांचं
एकत्रित यशही तसं फारसं भारी नाही
तर, अनंत काळानंतर पावसाचं आगमन होतं. चार दिवस जरी पाऊस झाला तरी पेरण्या पार पडतात. लोकांच्या मनात थोडी आशा निर्माण होते आणि आत्महत्यांचं सावट जरा कमी होण्याची शक्यता दिसू लागते. संकट मात्र तसंच घोंघावत राहणार. चांगलं पिकलं तर कुणाला नकोय. पण त्यासोबत इतर समस्यांचं पेव फुटणारच आहे.
“तुमचा विश्वास बसणार नाही, पण
चांगलं पिकलं तरी शेतकरी जीव देणारच,” मल्ला रेड्डी सांगतात. ते अनंतपूरच्या
इकॉलॉजी सेंटर ऑफ द रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे संचालक आहेत. “एखाद्या शेतकऱ्याला जास्तीत
जास्त एक लाख हातात येणार. इतकी वर्षं पिकलं नाहीये त्यामुळे डोक्यावर ५ ते ६
लाखांचा कर्जाचा बोजा आहे. या काळात किती तरी लग्नं लावून द्यायची राहिली आहेत. ती
आता लावावी लागणार.”
“आता शेतातला खर्च वेड्यासारखा
वाढलाय. एखाद्या शेतकऱ्याने या सगळ्याला कसं तोंड द्यावं? पुढचे काही महिने
देणेकरी किती दबाव टाकणारेत बघा. आणि कर्जवसुली कायमची थोडी थांबणारे?”
शेतकऱ्यांच्या समस्या थोड्या कधीच नसतात. असतात त्या उदंडच. पाण्याचं स्वप्न
आणि कर्जाचा बोजा. हेच खरं.