चुकलं तर दुरुस्त करणं हा पर्याय तानुबाई गोविलकरांसाठी नाहीच. कारण एक जरी टाका चुकला तर केलेलं सगळं काम उसवून परत नव्याने सुरुवात करायची एवढा एकच पर्याय आहे. आणि सगळं म्हणजे तब्बल ९७,८०० टाके.
“तुम्ही चुकला तर वाकळ काही दुरुस्त होत नसते,” आपल्या कलेमध्ये कसलीही कसूर राहून चालत नाही हेच या ७४ वर्षांच्या किरकोळ शरीरयष्टीच्या आजी सांगतात. आणि खरं तर आजवर वाकळ शिवताना चुकलीये अशी एकही बाई त्यांना ध्यानात येत नाहीये. “एकदा शिकलं की चूक होत नाही,” हसत हसत त्या सांगतात.
त्यांना स्वतःला खरं तर ही कष्टाची कला शिकण्याची फार काही इच्छा नव्हती. पण आयुष्याने आणि जगण्याच्या प्रश्नचिन्हाने त्यांना हातात सुई घ्यायला लागली. “पोटाने शिकवलं मला,” आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहत त्या म्हणतात. १९६० च्या दशकात वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं त्या काळात त्या जातात.
“शाळा शिकायच्या वयात पेन पेन्सिल नाही तर माझ्या हातात विळा अन् सुई आली बघ. मी शाळेत गेले असते तर ही कला काय शिकता आली असती का?” तानुबाई विचारतात. त्यांना इथे सगळे प्रेमाने आजी म्हणतात.
तानुबाई आणि त्यांचे स्वर्गवासी पती धनाजी मराठा कुटुंबातले. शेतमजुरी करून कसंबसं घर चालत असताना थंडीसाठी पांघरुणं विकत घ्यायची म्हणजे चैनच होती. “त्या काळी वाकळ विकत घेणं परवडत नव्हतं,” आजी सांगतात. “म्हणून काही बाया जुन्या साड्यांपासून वाकळ शिवाया लागल्या.” मग, दिवसभर शेतात राबराब राबून तानुबाई संध्याकाळी घरी आल्यावर थोडी थोडी करत वाकळ शिवायच्या.
“शेतात खुरपं घेऊन भांगललेलं बरं, पण हा धंदा नको,” त्या म्हणतात. कारण प्रत्येक वाकळ शिवायची म्हणजे जवळपास चार महिन्यांचं आणि अंदाजे ६०० तासांचं अगदी बारीक शिवणकाम. पाठदुखी तर कायमचीच आणि डोळ्याला ताणही. खुरपं घेऊन भांगलेलं बरं असं तानुबाई का म्हणतात ते यावरून आपल्याला समजेल.
आणि कोल्हापूरच्या जांभळी या ४,९६३ लोकसंख्येच्या (जनगणना, २०११) गावात वाकळ शिवणाऱ्या त्या आज एकट्याच का याचं उत्तरही या कष्टाच्या कामात दडलं आहे.
*****
वाकळ शिवायला सुरुवात होते ते आधी ‘लेवा’ आंथरून. म्हणजे साड्या एकमेकीला नीट जोडून. एका वाकळीत किती साड्या लावायच्या ते शिवणारीच्या मनावर असतं. शिवायला किती जणी आहेत त्यावर बाया किती साड्या घ्यायच्या ते ठरवतात. तानुबाई आता शिवतायत त्या वाकळीत नऊ सुतू नऊवारी साड्या आहेत.
सुरुवातीला त्या एक साडी निम्मी करतात आणि जमिनीवर आंथरतात. त्यानंतर त्यावर आणखी दोन साड्या निम्मी घडी करून अंथरल्या जातात. अशा प्रकारे आठ साड्यांचे चार पदर तयार होतात. त्यानंतर साधा धावदोरा घालून या नऊही साड्या एकमेकींना तात्पुरत्या जोडल्या जातात. खालचा पदर एकदम ताठ राहील याची मात्र काळजी घेतली जाते. “वाकळ शिवत जाऊ तसा धावदोरा काढून टाकायचा,” आजी सांगतात.
त्यानंतर आजी आणखी काही साड्यांची ठिगळं फाडतात. वाकळीच्या सगळ्यात वरच्या पदरावर ही शिवली जातात. आणि त्यातून एक रंगीबेरंगी अशी सुंदर नक्षी तयार होते. “आधीपासून त्याचं काही ठरलेलं नसतं,” त्या सांगतात. “एकेक ठिगळ उचलायचं आणि शिवत जायाचं.”
त्यांचा प्रत्येक टाका बरोबर पाच मिमी आकाराचा असतो आणि बाहेरच्या कडेपासून त्या आत शिवत येतात. जसजसे टाके वाढतात तसतसं वाकळीचं वजन वाढत जातं. आणि ती शिवणाऱ्य हातांवर येणारा ताणही. एक वाकळ शिवण्यासाठी त्यांना गोधडीच्या दोऱ्याची ३० रिळं म्हणजेच १५० मीटर दोरा लागतो. आणि कित्येक मोठ्या सुया. जांभळीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या इचलकरंजीतून त्या १० रुपयांना एक रीळ विकत घेतात. “पूर्वी १० रुपयाच्या दोऱ्यात अख्खी वाकळ शिवून होत होती. आता ३०० रुपये लागाया लागलेत,” त्या कुरकुरत सांगतात.
शेवटचे टाके घालण्याआधी आजी वाकळीचं ‘पोट भरतात’. भाकरीचा एक घास ठेवून त्या वाकळ पूर्ण करतात. ही वाकळ घेणाऱ्याला ऊब मिळेल त्याचं ऋण म्हणून. “त्याला पण पोट आहे की रे बाळा,” त्या म्हणतात.
चार कोपऱ्यांना चार त्रिकोणी तुकडे जोडले की वाकळ तयार. हे खास वाकळीचं वैशिष्ट्य. या कोपऱ्यांमुळे जड वाकळ उचलायलाही सोपं जातं. ९ लुगडी, २१६ ठिगळं आणि ९७,८०० टाके असलेल्या या वाकळीचं वजन ७ किलो भरतं.
“चार महिन्यांचं काम दोन महिन्यांत केलो,” आजी अगदी कौतुकाने इतक्यात त्यांनी शिवलेली वाकळ दाखवतात आणि सांगतात. ६.८ फूट x ६.५ फूट मापाची अतिशय सुंदर अशी ही वाकळ आहे. त्यांनी आपल्या नेहमीच्या कामाच्या ठिकाणी बैठक मारली आहे. बाजूने किती तरी शोभेची झाडं लावून त्यांनी हा व्हरांडा सजवला आहे. कोलियस आहे, निशिगंध आहे. अनेक वर्षांत गोळा केलेली किती तरी झाडं याची शोभा वाढवतायत. व्हरांड्याची जमीन आजी पूर्वी शेणाने सारवायच्या. आणि याच जमिनीवर बसून हजारो तास काम करून अगणित ठिगळं जोडून त्यांनी सुरेख वाकळी शिवल्या आहेत.
“एक वाकळ धुवायची तर चार माणसं तर पाहिजेत, बघ. असली जड असते,” त्या सांगतात. वर्षातून तीन वेळा वाकळा धुतल्या जातात – दसरा, नव्याची पुनव (संक्रांतीनंतरची पहिली पौर्णिमा) आणि गावाच्या जत्रेच्या वेळी. “आता याच तीन दिवशी का ते काही मला माहित नाही पण रीत आहे तशीच.”
आजवर तानुबाईंनी ३० वाकळा शिवल्या आहेत. हे कष्टाचं आणि नाजूक काम करण्यात त्यांनी १८ हजार तासांहून अधिक काळ व्यतीत केला आहे. आणि तेही केवळ फावल्या वेळातलं काम आहे बरं. आयुष्याची साठ वर्षं त्या पूर्ण वेळ शेता मजुरीला जायच्या. म्हणजे दररोज ८-१० तास अंग मोडून टाकणारं काम करायच्या.
“आता इतकं काम करून सुद्धा ती थकत नाही. जरा कुठे रिकामा वेळ मिळाला की नवी वाकळ शिवायला घेते,” त्यांची मुलगी, सिंधु बिरंजे सांगतात. त्या मात्र वाकळ शिवायला शिकल्या नाहीत. “आम्ही अख्खं आयुष्यभर शिवलो तरी तिच्यासारखं काम काही जमायचं नाही. आजही तिला काम करताना पाहतोय ना, आमचं भाग्यच समजा,” तानुबाईंच्या थोरल्या सूनबाई लताताई सांगतात.
सिंधुताईंची सून २३ वर्षांची अश्विनी बिरंजे हिने शिवणकामाचा एक कोर्स पूर्ण केलाय आणि वाकळ कशी शिवायची ते तिला येतं. “पण मी मशीनवरच शिवते. जुन्या पद्धतीने शिवायचं तर त्याला खूपच चिकाटी पाहिजे आणि वेळसुद्धा,” ती म्हणते. या कामाचा मान आणि पाठीवर खूप ताण येतो आणि सुई लागून बोटंसुद्धा दुखावतात हे मात्र ती सांगत नाही.
पण तानुबाईंना त्याचं फारसं काही वाटत नाही. “माझ्या हाताला सवय झालीये. कसे स्टीलसारखे झालेत बघ. सुईचा मला काही त्रास होत नाही,” त्या हसतात. कामाच्या मध्ये कुणी आलं तर त्या पटकन आपल्या वेणीत सुई खोचतात. “सुई अडकवायची एकदम ब्येस जागा आहे बघ,” हसत हसत त्या सांगतात.
आजच्या तरुण पिढीला ही कला शिकायची नाहीये, असं का? त्यावर त्या पटकन म्हणतात, “चिंध्या फाडायला कोण येणार? किती पगार देणार?”
आजची तरुण मंडळी मशीनवर शिवलेल्या, बाजारात मिळणाऱ्या स्वस्त रजया घेतात, त्या म्हणतात. “वाईट हेच की आता वाकळ कशी शिवायची हे अगदी मोजक्याच बायांना माहित आहे. आणि ज्यांना ही कला अजूनही आवडते त्या मशीनवर शिवून घेतात,” तानुबाई सांगतात. “वाकळ का शिवायची, त्याचं कारणच बदलून गेलंय. पण काय करणार काळाप्रमाणे चालावं लागतं,” त्या म्हणतात. आजकाल नव्या साड्यांपासून बाया वाकळ शिवतात. पूर्वी फक्त जुन्या साड्या वापरल्या जायच्या, त्या म्हणतात.
आयुष्यभरात अक्षरशः लाखो सुरेख टाके घालत शिवणकाम करणाऱ्या तानुबाईंना आजही त्यांचे शेजारी नाईक (आजींना त्यांचं नाव काही आठवत नाही) यांनी दिलेला सल्ला न ऐकल्याची खंत आहे. “ते मला नेहमी सांगायचे की शिवण शिका म्हणून,” त्या म्हणतात. “मी जर शिवण शिकले असते ना, माझं आयुष्य आज वेगळंच असतं.” अर्थात वाकळ शिवण्यात कितीही कष्ट असले तरी त्यांचं या कलेवरचं प्रेम तसूभारही कमी झालेलं नाही.
गंमत म्हणजे, तानुबाईंनी आजवर एकही वाकळ विकलेली नाही. “कशाला रे मी विकू वाकळ, बाळा? आणि त्याला लोक असे किती पैसे देणार?”
*****
वाकळ शिवायचा विशिष्ट असा हंगाम नसला तरी शेतीच्या कामाप्रमाणे या पण कामाचं चक्र चालायचं. फेब्रुवारी ते जून या काळात शेतात फारशी कामं नसल्यामुळे बाया याच काळात शिवणाची कामं काढायच्या. “मनाला येईल तेव्हा करायचं,” तानुबाई सांगतात.
त्यांना आठवतं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यात नौकुड या त्यांच्या गावी साधारण साठच्या दशकापर्यंत जवळ जवळ सगळ्याच बाया घरी वाकळी शिवायच्या. महाराष्ट्रात इतर भागात याला गोधडी म्हणतात. “पूर्वी कसं बाया शेजारपाजारच्या बायांना वाकळ शिवायला बोलवायच्या. दिवसभराचं काम झाल्यावर तीन आणे द्यायच्या.” चार बायांनी बसून सलग शिवलं तर एक वाकळ दोन महिन्यांत पूर्ण होते.
तेव्हा साड्या देखील महाग असायच्या. एक सुती साडी आठ रुपयांना आणि चांगल्यातली घेतली तर १६ रुपयांना मिळायची. दिवसभर शेतात राबल्यावर ६ आणे मजुरी मिळायची आणि एक किलो मसुरीची डाळ देखील १२ आण्यात मिळायची. त्या काळात साड्यांची किंमत भरपूरच होती.
“आम्ही वर्षासाठी दोन साड्या आणि चार झंपर घ्यायचो, बस्स.” साड्या फारशा नसायच्या हे लक्षात घेतल्यावर वाकळ टिकाऊ असण्याचं महत्त्व कळतं. तानुबाई अगदी अभिमानाने सांगतात की त्यांनी शिवलेली वाकळ कमीत कमी ३० वर्ष तर टिकतेच. या कलेचे सगळे कंगोरे अगदी बारकाईने शिकून त्यात तरबेज झाल्यानेच हे होऊ शकतं.
१९७२-७३ च्या भयंकर दुष्काळाची झळ २ कोटीहून अधिक लोकांना (महाराष्ट्रातली ५७ टक्के जनता) बसली. तेव्हाच गोविलकर कुटुंब नौकुडहून ९० किलोमीटरवरच्या शिरोळ तालुक्यातल्या जांभळीत रहायला आहे. “दुष्काळाची आठवणसुद्धा काढू नये. लईच भयंकर काळ होता तो. कित्येक दिवस आम्ही उपाशी पोटी झोपलोय,” तानुबाई सांगतात. बोलता बोलता त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात.
“नौकुडच्या एका माणसाला जांभळीत काही काम मिळालं. आणि पुढचा मागचा विचार न करता अख्खं गावच उठलं,” त्या सांगतात. गाव सोडण्याआधी त्यांचे पती धनाजी रस्त्याची, दगडं फोडायची कामं करायचे. पार १६० किलोमीटरवर गोव्यापर्यंत ते जात असत.
जांभळीमध्ये चाळीस जण सरकारच्या दुष्काळ निवारण कामाचा भाग म्हणून रस्त्याची कामं करत होते. त्यात आजी देखील होत्या. “१२ तास काम असायचं, फक्त दीड रुपया मजुरी मिळायची,” त्या सांगतात. तेव्हाच गावातल्या एका पुढाऱ्याने दिवसाला ३ रुपये मजुरीवर त्याच्या शेतात काम करायला सांगितलं. तेव्हापासून तानुबाई शेतात मजुरीला जायला लागल्या. भुईमूग, ज्वारी, गहू, भाताची शेतीची कामं असायची. चिक्कू, आंबा, द्राक्षं, डाळिंब आणि सीताफळाच्या बागांमध्ये काम असायचं.
२००० सालानंतर काही वर्षांत त्यांनी शेतीतलं काम थांबवलं. तब्बल तीस वर्षं त्या काम केल्यानंतरही मजुरीत १० तासांच्या पाळीला १६० रुपये इतकीच वाढ झाली होती. “कोंड्याचा धोंडा खाल्ला पण मुलांना कधी मागं ठेवलो नाही,” त्या म्हणतात. आयुष्यभराचे काबाडकष्ट आणि गरिबी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. पण त्यांचा संघर्ष आणि त्याग दोन्हीचं चीज झालं. आज त्यांचा थोरला मुलगा प्रभाकर शेजारच्या जयसिंगपूरमध्ये खताचं दुकान चालवतोय आणि धाकटा बापूसाहेब जांभळीतल्या एका बँकेत कामाला आहे.
शेतीतलं काम थांबवल्यानंतर घरी रिकामं बसून वेळ जाईना तेव्हा त्यांनी परत शेतात मजुरी करायला सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी त्या घरीच पडल्या आणि त्यातून जरा इजा झाली. त्यानंतर परत त्यांचं काम थांबलं. “उजव्या खांद्यावर दोन ऑपरेशन झाली, तरी दुखायचं राहत नाही,” त्या सांगतात. पण तसं असूनही त्यांनी आपल्या नातवासाठी संपत बिरंजेसाठी एक वाकळ शिवलीच.
खांदा त्रास देत असला तरी तानुबाई दररोज सकाळी ८ वाजता शिवायला सुरुवात करतात ते थेट संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचं काम सुरू राहतं. मध्ये मध्ये जरा आवारातली मका खायला येणाऱ्या माकडांना हाकलायला तेवढं उठायचं. “माकडांनाही खाऊ द्या हो, पण माझ्या नातवाला रुद्रला मक्याची कणसं लई आवडतात,” त्या सांगतात. दोघी सुनांची त्यांना फार मदत होते आणि त्यांची ही आवड जपण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. “त्यांच्यामुळे मला घरचं काही पहावं लागत नाही.”
वयाच्या ७४ व्या वर्षीदेखील तानुबाईंच्या हातातल्या सुईदोऱ्याची जादू तशीच सुरू आहे. आणि त्यांच्या हातातलं कसब जरा देखील कमी झालेलं नाही. “त्यात काय विसरणार, बाळा? त्यात काय विद्या आहे?” त्या अगदी नम्रपणे विचारतात.
तानुबाईंचं सगळ्यांना एक सांगणं आहेः “कसलीही परिस्थिती येऊ द्या, नेहमी प्रामाणिक रहावं.” चिंध्या आणि ठिगळांपासून कशी एक वाकळ तयार होते तसंच आपलं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या आहेत. “पूर्ण आयुष्यच मी शिवत गेले.”
ही कथा ग्रामीण भागातील कारागिरांवरील संकेत जैन लिखित आगामी लेखमालिकेतील असून या मालिकेस मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे सहाय्य मिळाले आहे.
अनुवादः मेधा काळे