“लोकांना वाटतं एखाद्या कापडावर तुम्ही काही तरी काढलं म्हणजे ते वारली चित्र झालं. पण त्यांना [बिगर-वारली लोक] आमच्या देवांची चित्रं कशी काढायची ते माहिती नाही, आमच्या गोष्टी त्यांना माहित नाहीत,” सदाशिव सांगतात. ज्येष्ठ वारली कलाकार जिवा सोमा मशे (१९३४-२०१८) यांचे ते सुपुत्र. मी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या गंजड गावी त्यांच्या घरी त्यांना भेटले तेव्हा आमच्या गप्पा सुरू होत्या. तेव्हा त्यांच्या वडलांचं वय सुमारे ८० वर्षे होतं.

वारल्यांच्या शैलीतली चित्रं आता प्रदर्शनांमध्ये, हॉटेल, दिवाणखान्यांमध्ये, साडी, ओढण्या आणि अगदी खाण्याच्या भांड्यांवरही दिसू लागलीयेत. पण बहुतेक वेळा ही बिगर-वारली लोकांनी काढलेली असतात. ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रं म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर राहणाऱ्या वारली आदिवासींचा ठेवा. महाराष्ट्रात त्यांचं वास्तव्य मुख्यतः धुळे, नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमध्ये तर गुजरातमध्ये बहुतेक करून वलसाडमध्ये आहे.

व्हिडिओ पहाः जिव्या सोमा मशे आणि त्यांचे पुत्र सदाशिव त्यांच्या कलेविषयी आणि बदलत्या काळाविषयी बोलतायत

१९७१ मध्ये कॅनव्हासवर चित्र काढणारे जिव्या सोमा मशे हे पहिले वारली आदिवासी कलाकार. तोपर्यंत ही कला शक्यतो वारली समुदायातल्या विवाहित स्त्रियांपुरती मर्यादित होती. लग्नासारख्या सोहळ्यांच्या वेळी त्या झोपडीच्या मातीने लिंपलेल्या भिंतींवर ही ही चित्रं काढायच्या.

भारतात आणि भारताबाहेर वारली चित्रकला लोकप्रिय करण्याचं श्रेय बहुतकरून २०११ मध्ये पद्मश्री किताबाने गौरवण्यात आलेल्या मशेंना दिलं जातं. या चित्रफितीत ते आणि सदाशिव (जे स्वतः कलाकार आहेत) कॅनव्हासला शेण कसं लावायचं, मशेंनी पोस्टर रंगांचा वापर कसा सुरू केला, चित्रं काढण्यासाठी त्यांच्या आवडीच्या असलेल्या काड्या आणि सोबतच या कलेची परंपरेत असलेली मुळं कशी विसकटत चालली आहेत याबद्दल हे बापलेक बोलत आहेत.

अनुवादः मेधा काळे

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Namrata Bhingarde & the PARI Team

नम्रता भिंगार्डे मुंबई स्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांमध्ये जलसंधारणाचं काम करणाऱ्या पानी फौंडेशनमध्ये ती सोशल मीडिया व्यवस्थापक आहे.

Other stories by Namrata Bhingarde & the PARI Team