“काय गं, आज गाडीत बसायला जागा मिळेल का?” दक्षिण कोलकात्याच्या यादवपूर स्थानकातल्या गर्दीर्ने ओसंडून वाहणाऱ्या फलाटावरून ब्रेश्पती सरदार जोरात हाळी घालते. तिच्या पलिकडे उभ्या असलेल्या बाया नाराजीतच नकारार्थी मान डोलावतात. तिच्या प्रश्नाचं त्यांना हसू येतं.

ब्रेश्पती कॅनिंगला जाणाऱ्या ४.३५ वाजताच्या गाडीची वाटत पाहतीये. आणि गाडी वेगात यादवपूर स्थानकात येते. सगळ्या बाया गर्दीत ढकलाढकली करून, अगोदरच गच्च भरलेल्या महिलांसाठीच्या डब्यात शिरायची पुरेपूर तयारी करतात.

ही गाडी उत्तर कोलकात्याहून आलीये, वाटेत पार्क सर्कस, बालीगंज जंक्शन आणि ढाकुरियाचे थांबे तिने घेतलेत. यादवपूरनंतर आता ती बाघायतीन, न्यू गडिया आणि गडिया या स्थानकांवर थांबेल. दक्षिण कोलकात्यातल्या बहुतांशी मध्यम वर्गीय किंवा श्रीमंत असा भाग आहे हा. जादवपूर स्थानकात थांबलेल्या, आणि मार्गावरच्या इतरही थांब्यावरच्या या बाया दक्षिण कोलकात्यातल्या या वसाहतींमध्ये घरकामगार म्हणून काम करतात.

यातल्या बऱ्याच जणी सियाल्दा-कॅनिंग या ४५ किमीच्या, १६ थांबे असणाऱ्या मार्गावर किंवा सियाल्दा-लक्ष्मीकांतपूर या ६५ किमीच्या २५ थांबे असणाऱ्या मार्गावर किंवा सियाल्दा-नामखाना या दक्षिणेकडे अजून पुढे जाणाऱ्या मार्गावर प्रवास करतात. त्यामुळेच कोलकात्यातल्या काहींनी या पूर्व मार्गावरच्या गाड्यांना ‘झी’ स्पेशल असं नाव दिलंय. बंगाली भाषेत घरकामगारांसाठी तुच्छतेने ‘झी’ असा शब्द वापरला जातो.

Breshpati Sardar and other women workers on a crowded train from Sealdah to Canning, via Jadavpur
PHOTO • Urvashi Sarkar
Breshpati Sardar and other women workers on a crowded train from Sealdah to Canning, via Jadavpur
PHOTO • Urvashi Sarkar

सियाल्दा-कॅनिंग गाडीमध्ये -  कोलकात्यातल्या काहींनी पूर्व मार्गावरच्या या गाड्यांना ‘झी’ स्पेशल असं नाव दिलंय - बंगाली भाषेत घरकामगारांसाठी तुच्छतेने ‘झी’ असा शब्द वापरला जातो

त्या दिवशी दुपारी, कामावरून घरी परतत असताना नारंगी साडी नेसलेली, भाळावर कुंकू आणि हातात पर्स घट्ट धरलेली ब्रेश्पती कशी बशी गाडीत शिरली. आतमधल्या बाया, बॅगा आणि बांगड्यांच्या गर्दीत तिने कशी बशी उभं राहण्यापुरती जागा पटकावली. शेजारच्या खिडकीपासच्या जागेकडे तिचं वारंवार लक्ष जातं. तिथे बसलेली प्रवासी तिथनं उठताच ब्रेशपतीने झेप मारून तिथली मोलाची जागा पटकावली. तिचा धक्का लागलेली एक बाई तिच्यावर खेकसलीच.

आणि मग भांडण लागलं. ब्रेशपतीचा आवाज चढला आणि ती संतापाने लालेलाल झाली. इतर बाया लगेच मध्ये पडल्या. मग कुठे ती जराशी शांत झाली आणि दुसऱ्या एका बाईच्या मांडीवर जरा टेकली. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं आणि मग तिने तिच्या फोनवरचा, सशाला साप गिळत असल्याचा व्हिडिओ शेजारच्या बाईला दाखवला. “मी ना कधीच भांडत नाही. पण तुम्ही पाहिलं ना ती बाई कशी करत होती?” ती संतापून विचारते.

सुमारे ७५ मिनिटांनी, गाडी जादवपूरहून ४५ किमीवरच्या कॅनिंग स्टेशनात येते. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या सुंदरबन प्रदेशाच्या वेशीवरच कॅनिंग स्थानक आहे. आपल्या घराजवळ फार काही काम मिळत नसल्यामुळे या बायांना रोज असा प्रवास करून शहर गाठावं लागतं.

ब्रेश्पतीचं घर स्टेशनपासून चालत ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. “मी आधी आई-बाबांबरोबर रहायची, शाळेत जायची. पण पाचवीत असताना त्यांचं त्यांना भागवणंच मुश्किल होऊ लागलं होतं.” ब्रेश्पतीला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. वयाच्या ११ वर्षापासून तिने दुसऱ्यांच्या घरी कामं करायला सुरुवात केली ते आजपर्यंत. चौदाव्या वर्षी तिचं लग्न झालं, आज तिचं वय २८ आहे.

At Breshpati Sardar’s home
PHOTO • Siddharth Adelkar
Breshpati Sardar’s daughters
PHOTO • Siddharth Adelkar

ब्रेश्पती सरदार पहाटे ४.३० ची कॅनिंगहून दक्षिण कोलकात्यातील यादवपूरला जाणारी गाडी पकडते आणि परतीची ४.३५ ची गाडी पकडून आपल्या पत्र्याच्या दोन खोल्यांच्या घरी परतते (डावीकडे), तिच्या मुली सान्या आणि तान्या (उजवीकडे) आणि एक मुलगा तिच्या आई-वडलांकडे किंवा सासरी राहतात कारण तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या कामाच्या धबडग्यात त्यांना घरी वेळ म्हणून नसतो

आम्ही संध्याकाळी ६ वाजता घरी पोचलो तेव्हा ब्रेश्पतीच्या मुली, ११ वर्षांची तान्या आणि १० वर्षांची सान्या तिची वाट पाहत होत्या. तिचा ६ वर्षांचा मुलगाही आहे, बिस्वजीत. मुलं तिच्या आई-वडलांकडे किंवा सासरी राहतात. ब्रेश्पती आणि तिच्या नवऱ्याच्या कामाच्या धबडग्यात मुलांसाठी त्यांच्याकडे फुरसतच राहत नाही. संजीब एका फरसाणच्या कारखान्यात काम करतो आणि महिन्याला ९,००० रुपये कमावतो.

त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या मुली त्यांना भेटायला येणार होत्या. ब्रेश्पती त्यांना दुकानातून तेल आणि भाजी आणायला पाठवते आणि स्वयंपाकासाठी गोबर गॅसवरची चूल पेटवते, शेजारच्या कूपनलिकेवरून पाणी भरून आणते. संजीबदेखील थोड्याच वेळात घरी पोचेल. घरच्यांना खाऊ घालून, स्वतः चार घास खाऊन झाले की भांडी घासून ब्रेश्पती काही तास निजेल आणि परत पहाटे ३ वाजता उठेल. जादवपूरची पहाटेची ४.३० ची गाडी पकडण्यासाठी तिली वेळेत कॅनिंग स्टेशनला पोचावं लागेल. “मिट्ट काळोख असतो आणि कधी कधी थंडी पण. पण मला भीती वाटत नाही कारण माझ्यासारख्या बऱ्याच जणी आम्ही कोलकात्यात कामाला जातो त्यामुळे एकत्रच प्रवास करतो. घरावरून जाता जाता एकमेकींना आवाज देतो.”

त्यानंतर दिवसभरात ब्रेश्पती सहा घरांमध्ये काम करते. “माझं काम म्हणजे स्वयंपाक, कपडे, भांडी आणि झाडलोट. मला महिन्याला ८,५०० रुपये मिळतात. मला शक्यतो कामावरच चहा आणि काही तरी खायला मिळतं आणि महिन्यातून ३-४ दिवस सुट्टी. पण सगळे मालक काही इतके भले नसतात. एकदा मी थोडे दिवस कामावर गेले नाही तर मालकाने २० दिवसांचा पगार कापला माझा. त्यानंतर मी ते काम सोडलं.”

मला तशी चांगलीच वागणूक मिळते असं ब्रेश्पती जरी म्हणत असली तरी घरकामगारांना फार बिकट परिस्थितीत काम करावं लागतं. पुरेसा पगार नाही, कामाचे तास आणि लाभ ठरलेले नाहीत, छळ आणि लैंगिक अत्याचार या समस्याही आहेतच. घरकामगारांच्या संघटना आणि संस्थांनी एकत्र येऊन गृह श्रमिक अधिकार अभियानातर्फे २०१६ साली पश्चिम बंगाल सरकारला दिलेल्या निवेदनात या समस्या मांडल्या आहेत.

‘बायांनी पगार वाढवून मागितले, तर काम सुटायची भीती असते कारण त्याहून कमी पैशात कामाला तयार होणाऱ्या अनेक असतात. कधी कधी त्यांना शिळंपाकं अन्न दिलं जातं...’

व्हिडिओ पहाः पहाटेची गाडी पकडून घरकामाचा रगाडा उरकायचा

या निवेदनात मानवी व्यापार करणाऱ्यांकडून आणि कामं मिळवून देणाऱ्या केंद्रांकडून होणारा अन्याय, अपरिहार्य स्थलांतर, कोणतेही कल्याणकारी उपाय आणि कौशल्य विकासाच्या संधी नाहीत हेही नमूद केलं आहे. असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा (२००८) आणि कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रियांचे लैंगिक शोषण (प्रतिबंध, निषेध आणि उपाययोजना) कायदा, २०१३ अंतर्गत घरकामगारांचा समावेश होतो असंही या निवेदनात नोंदवलं आहे. पण तरीही त्या कोणत्या परिस्थितीत काम करतात यावर पश्चिम बंगाल शासनाचं कसलंही नियमन नाही.

केंद्र सरकारने घरकामगारांसाठी राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार केला आहे ज्यात सामाजिक सुरक्षा आणि किमान वेतनासंबंधी शिफारशी करण्यात आल्या आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी मात्र राज्य सरकारांवर टाकली आहे.

जून २०१८ मध्ये पश्चिम बंग गृह परिचारिका समिती या घरकामगारांच्या संघटनेला पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कामगार संघटनेचा दर्जा मिळाला. त्यानंतर लगेचच, संघटनेने राज्य सरकारला आपल्या मागण्या सादर केल्या ज्यामध्ये ताशी रु. ५४ वेतन, मातृत्व रजा, दर महिन्यात चार पगारी सुट्ट्या आणि कामाच्या ठिकाणी शौचालय वापरण्याचा अधिकार या मागण्या होत्या.

“बायांनी पगार वाढवून मागितले, तर काम सुटायची भीती असते कारण त्याहून कमी पैशात कामाला तयार होणाऱ्या अनेक असतात,” घरकामगारांबरोबर काम करणाऱ्या कोलकात्याच्या परिचिती या स्वयंसेवी संस्थेच्या मल्लिका दास सांगतात. “कामाच्या ठिकाणा पाळणाघराची सोय नसते त्यामुळे त्यांना आपली लेकरं दुसऱ्या कुणाकडे तरी सोडून यावं लागतं. कधी कधी त्यांना शिळंपाकं अन्न दिलं जातं. काही घरमालक तर त्यांना घरचा संडासदेखील वापरू देत नाहीत. रेल्वे स्थानकातील संडास बंद असतात, मोडकळीला आलेले असतात किंवा इतक्या वाईट अवस्थेत असतात की या बायांना संध्याकाळी घरी परतेपर्यंत कुठे जाता येत नाही आणि हे आवेग दाबून धरावे लागतात.”

Breshpati Sardar at Canning railway station in the morning
PHOTO • Siddharth Adelkar
Breshpati Sardar sitting in the train early in the morning
PHOTO • Siddharth Adelkar

ब्रेश्पती सरदार सकाळी कॅनिंग रेल्वे स्थानकात आणि उजाडायच्या आधीच कामावर रेल्वे डब्यात

ब्रेश्पती जिथे काम करते ते तिला घरचा संडास वापरू देतात. “मी माझ्या हाताने त्यांची कणीक मळते, भाज्या चिरते. त्यांना काय हरकत असणार?” तिला सगळ्यात जास्त त्रास होतो तो दिवसभर कामावर आणि रेल्वेमध्ये उभं रहावं लागतं त्याचा. “माझी पाठ आणि पाय, कायम दुखत असतात,” ती सांगते.

रात्र सरते आणि पहाटे ४ च्या सुमारास कॅनिंग स्थानक हळू हळू जागं व्हायला लागतं. आम्हाला स्थानकात ब्रेश्पती दिसते, हातात चहा आणि बिस्किटं. इतक्या लवकरसुद्धा ती एकदम ताजीतवानी दिसते, केसांचा नीट अंबाडा, कपाळावर लाल कुंकू आणि चेहऱ्यावर तकाकी. बाकी बायाही येतात, सगळ्या कामाला निघाल्या आहेत. त्यातच तिची मैत्रीण आहे, बसंती सरदार. तीदेखील यादवपूरला काम करते. “थंडी वारा, ऊन पाऊस काहीही असो, आम्हा कामवाल्या बायांना कामावर जायलाच पाहिजे. नाही तर आमच्या मालकांना राग यायचा. आमच्याशिवाय त्यांचं पानही हलत नाही!” बसंती म्हणते. सगळ्या जणी हसतात.

Workers outside Jadavpur railway station
PHOTO • Siddharth Adelkar

जादवपूर (वरती) आणि इतर स्थानकात उतरल्यावर बाया चालत कामावर जायला निघतात

“आमची जिंदगी खडतर आहे आणि आम्ही गरीब आहोत. असं काही क्षण का होईना हसायला मिळावं म्हणून तर आम्ही जगतोय,” ब्रेश्पती म्हणते. इतकी पहाट आहे म्हणून गाडी पूर्ण रिकामी आहे पण कोलकत्याच्या दिशेने जाता जाता हळू हळू ती भरत जाईल. ब्रेश्पती आणि बसंती महिलांच्या डब्यात न बसता जनरल डब्यात बसतात. “जनरल डब्यात कसंय, गडी माणसं कधी कधी आम्हाला बसायला जागा देतात आणि आमच्या अंगावर खेकसत नाहीत. जमेल तेव्हा आम्ही याच डब्यात चढतो,” बसंती सांगते.

पहाटे ४.३० ला गाडी सुटते आणि सुमारे ७५ मिनिटांनी जादवपूरला पोचते. ब्रेश्पती झपाझप पावलं उचलत कामावर पोचते, आजूबाजूला स्थानकातून बाहेर पडणाऱ्या घरकामगार बायांची गर्दी आहेच.

बऱ्यात कामगार दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या लक्ष्मीकांतपूरहून सियाल्दाला प्रवास करून जातात. साठ किलोमीटरहून जास्त अशी या प्रवासाला तब्बल ८५ मिनिटं लागतात. चमेली बैद्य या मार्गावरच्या तिसऱ्या थांब्यावरून, मथुरापूरहून गाडीच चढते. ती दक्षिण कोलकात्याच्या बालीगंज वसाहतीत सहा घरांमध्ये काम करते. पण दहा वर्षांपूर्वी तिचं आयुष्य असं नव्हतं.

“माझा आणि माझ्या नवऱ्याच्या मालकीचा पान-बिडीचा ठेला होता,” ती सांगते. “काही काळ सगळी नीट चाललं होतं, पण नंतर माझ्या नवऱ्याने कामच थांबवलं आणि पैसे उडवायला सुरुवात केली. मग आम्हाला दुकान बंद करावं लागलं आणि मी लोकांच्या घरी कामं करू लागले. माझं दुकान चालवत होते, तेव्हा मी स्वतंत्र होते. आता दुसऱ्याच्या घरी काम करतीये तेव्हा जरा जरी उशीर झाला किंवा खाडा झाला तर मला ओरडा खावा लागतो.” आता तर चमेलीला साधं घरभाडं भरणं पण जड जातंय. आता ती, तिचा नवरा, तीन मुली आणि एक मुलगा असे सगळे मथुरापूर रुळपट्टीला लागून असणाऱ्या झोपडपट्टीत राहतात.

चमेलीच्या मते लोकांच्या घरी कामं करण्यापेक्षाही हा रेल्वेचा प्रवास जास्त कठिण आहे. “रोज सकाळी प्रवासात मला इतका त्रास होतो. सगळे धक्के मारतात, ओरडतात. कधी कधी तर लोक एकमेकांना मारायला उठतात. बसायला कणही जागा नसते. माझ्या लेकरांना भरवायला तांदळाचे चार दाणे असते ना घरात तर मी असला प्रवासच केला नसता. घरी राहिले असते निवांत.”

अनुवादः मेधा काळे

Urvashi Sarkar is an independent journalist and a 2016 PARI Fellow.

Other stories by Urvashi Sarkar
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale