“एखाद्या कलेला तुम्ही कधी तरी कर्फ्यू लावू शकता का?” मणिमारन अगदी सहजपणे विचारतात. “आम्ही या आठवड्यात बांग्लादेशमध्ये असणार होतो,” क्षणभर थांबून ते सांगतात. “आम्ही १२ जण जाणार होतो, आमच्यासाठी फार मोलाची संधी होती ही. पण आता काय मार्च आणि एप्रिलचे आमचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.” पण पराई कलाकार आणि शिक्षक ४५ वर्षीय मणिमारन – तमिळ नाडूतले सर्वोत्तम – शांत बसून राहू शकत नाहीत.

मग काय मणिमारन आणि त्यांची पत्नी मगिळिनी लॉकडाउनमध्येही त्यांची कला सादर करतायत – रोज फेसबुक लाइव्ह किंवा मग यूट्यूबवर व्हिडिओ प्रसारित करून.

कोविड-१९ मुळे या चमूच्या सगळ्याच नियोजनाला पुढचे दोन महिने खीळ बसली असली तरी मणिमारन यांनी आता या विषाणूबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक नवं गाणं तयार केलंय – ते नेहमी जसं करतात तसं. सादरकर्त्या कलावंताने लिहिलेलं आणि त्यांच्या पत्नी मगिळिनींनी गायलेलं, सुब्रमण्यम आणि आनंदची साथ असलेलं हे गाणं चांगलंच गाजतंय. “दुबईतल्या एका रेडिओ केंद्राने ते वाजवलं,” ते सांगतात, “त्यांनी तर त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरही ते टाकलंय.”

व्हिडिओ पहाः कोरोना गीत

२००७ पासून सुरू असलेला बुद्धार कलई कुळु हा लोककलावंतांचा सर्वात जास्त गाजलेला फड चालवणारे मणिमारन दर वर्षी पराई शिकण्याची इच्छा असणाऱ्या शेकडो जणांना प्रशिक्षण देतायत. पराई हा एक ढोलाचा प्रकार आहे, जो कधी काळी केवळ दलितच वाजवायचे आणि तेही अंत्यविधीच्या वेळी. पण आज मणिमारन यांच्यासारख्या कलावंताने त्याचं राजकीय भान जपलं आणि आज पराई केवळ एक वाद्य नाही तर मुक्तीचा आविष्कार आहे.

“पण, आजही काही जण अंत्यविधीच्या वेळी पराई वाजवतात, पण त्यांना कुणी कलावंत म्हणत नाही. अगदी लोककलांसाठी [राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या] कलईममनी पुरस्कारांमध्ये देखील पराईची दखल कुणी कलाप्रकार म्हणून घेत नाहीत,” ते आपली खंत व्यक्त करतात. पण मणिमारन यांना समाजाचा अस्पृश्यतेचा आणि काहीही संबंध नसल्याचा जो आव आहे त्याच्या पलिकडे पराईला घेऊन जायचंय. त्यामुळे ते आठवड्याला नियमित वर्ग घेतात आणि दर वर्षी प्रशिक्षण शिबिरं आयोजित करतात. आणि या शिबिरांना समाजाच्या सगळ्या स्तरातून विद्यार्थी येतायत. सगळ्यांनाच हे ठेक्यात आणि ठसक्यात वाजणारं तालवाद्य शिकायचंय. आणि ते वाजवतानाच त्या वाद्याचं राजकारणही त्यांना शिकता येतं. अर्थात लॉकडाउनच्या काळात आता प्रत्यक्ष भरणारे वर्ग मात्र रद्द करण्यात आले आहेत.

मणिमारन सांगतात की त्यांनी या विषाणूबद्दल गाणं तयार करायचं ठरवलं कारण त्यांनी काही ‘गान’ (चेन्नईतील लोकगीताचा प्रकार) ऐकली, ज्यात याबद्दल चुकीची माहिती दिली जात होती. “काही कलावंत अफवा ऐकून गाणी करत होते असं वाटतं. आता हेच घ्या, कोरोना [विषाणू] मांसाहारी खाण्यातून पसरतो असा लोकांचा समज झालाय. एक लक्षात घ्या, मांसाहारी खाण्याला विरोध करणारी एक मोठी राजकीय यंत्रणा आधीपासूनच अस्तित्वात आहे, आणि आता कोरोनाचं निमित्त करून ते त्यांची पोळी भाजून घेतायत. म्हणून मग आम्हाला हे गाणं रचावं लागलं.”

तसंही कोणतंही संकट आलं तरी त्याला प्रतिक्रिया देणाऱ्या कलावंतांमध्ये मणिमारन आघाडीवर असतात. “माझं स्पष्ट मत आहे की कला ही नेहमीच राजकीय असते. आणि त्यामुळे कोणत्याही कलाकाराने समाजात, त्याच्या अवतीभोवती काय सुरू आहे याबद्दल व्यक्त व्हायलाच पाहिजे. लोककलावंत आणि गान कलाकारांनी हे केलंय, संकटकाळात त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांचं कर्तव्य पार पाडलंय. आणि खरं तर खोटे दावे खोडून काढण्यापेक्षाही आमचं कोरोना गाणं त्याबद्दल जागरुकता निर्माण करतं.”

२००४ साली आलेल्या त्सुनामीनंतर जो काही हाहाःकार उडाला आणि त्यानंतर २०१८ साली गज वादळाने तमिळ नाडूतल्या कित्येक जिल्ह्यांमध्ये दाणादाण उडवली, तेव्हाही मणिमारन यांनी आपल्या गाण्यांमधून या संकटाने उद्ध्वस्त झालेल्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचं काम केलं होतं. “लोक कला ही मुळात लोकांची कला आहे. आणि जेव्हा एखादं संकट कोसळतं तेव्हा लोकांच्या बाजूने उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही काही कुणाला पैसे दान करू शकत नाही. म्हणून मग आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करतो,” मगळिनी त्यांच्या नव्या, कोरोना गाण्याबद्दल म्हणतात.

PHOTO • M. Palani Kumar

२०१८ साली तमिळ नाडूत गजा वादळाचा तडाखा बसलेल्या गावांमध्ये आपला कार्यक्रम सादर करताना बुद्धार कलई कुळु. हे कार्यक्रम आणि गाणी संकटाची झळ बसलेल्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी सादर केले गेले (संग्रहित फोटो)

गजा वादळानंतर त्यांनी ज्या प्रकारे कार्यक्रम केले तसंच आहे हे. मणिमारन आणि त्यांची कलाकार मंडळी गजाचा तडाखा बसलेल्या, खास करून कावेरीच्या खोऱ्यातल्या गावा-गावांना जाऊन लोकांना गोळा करण्यासाठी पराई वाजवायचे. आणि एकदा का लोक जमा झाले की मग ते पराईसोबतच गाणीदेखील सादर करायचे, ज्यातून त्यांचं दुःख जरा हलकं व्हावं. “एक प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. एक माणूस आमच्यापाशी आला आणि म्हणाला, ‘आमच्यापर्यंत खूप सारी मदत पोचलीये, बिस्किटं आणि इतरही अनेक गोष्टी. पण तुम्ही आज आम्हाला जे दिलंय त्यातून आमच्या मनात खोलवर रुजलेली भीती निघून गेलीये’. आता एखाद्या कलाकाराला याहून जास्त काय हवं असणार सांगा?” मणिमारन विचारतात.

सध्या हे दोघं जण पेरांबलूर जिल्ह्याच्या अळथूर तालुक्यातल्या थेनूर गावी मुक्कामाला आहेत. सध्या ते रोज फेसबुक लाइव्हद्वारे सगळ्यांशी कोविड-१९ बद्दल आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संवाद साधतात, आणि मधून मधून कार्यक्रम सादर करतात. “आम्ही या कार्यक्रमाचं नाव ‘कोरोना कुम्बिडु’ [कोरोना नमस्ते] असं ठेवलंय. आम्ही लॉकडाउनच्या दोन दिवस आधी हे कार्यक्रम सुरू केलेत आणि आता तो निघेपर्यंत ते चालूच ठेवण्याचा आमचा विचार आहे.”

त्यांच्या सध्याच्या मालिकेमधल्या पहिल्या दिवशी, त्यांनी नवं गाणं तर सादर केलंच पण कोरोनाच्या साथीच्या काळात पदपथांवर राहणाऱ्यांच्या व्यथाही मांडल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी या विषाणूचा धोका सर्वात जास्त आहे अशा वयोवृद्धांबद्दल कार्यक्रम केला. तिसऱ्या दिवशी जेव्हा ते मुलांबद्दल बोलले तेव्हा मणिमारन यांनी पुन्हा एकदा पारंपरिक खेळ खेळायला पाहिजेत असा संदेश दिला. चौथ्या दिवशी त्यांनी ट्रान्सजेन्डर समाजाकडे लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या लॉकडाउनमध्ये त्यांना किती हालअपेष्टा सोसाव्या लागत असतील त्याबद्दल ते बोलले.

“आपण केवळ सध्याच्या काळात नाही तर नेहमीच त्यांचा विचार करायला पाहिजे,” ते म्हणतात. “मी माझ्या पेसबुक लाइव्हमध्ये देखील हे सांगतो. पण कसंय, या कोरोनामुळे निर्माण झालेल्या भावनिक-मानसिक आघाताबद्दल आणि त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होत असेल हे मी आता बोलतोय, आणि मला वाटतं की त्याचा परिणाम एरवीपेक्षा सध्या नक्कीच जास्त होऊ शकेल.” 

PHOTO • M. Palani Kumar

डावीकडे वरतीः मणिमारन आणि मगिळिनी थिरुवल्लूवर या महाकवींच्या पुतळ्यासोबत. त्यांच्या थिरुक्कुरल काव्यावरती त्यांचा चमू पराईच्या ठेक्यावर कार्यक्रम तयार करतोय. उजवीकडे वरतीः पराई विद्यार्थ्यांसोबत. खालच्या रांगेतः मणिमारन आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी पराई सादर करताना (संग्रहित फोटो)

पायिर या पेरांबलूरच्या काही गावांमध्ये ग्राम विकासासाठी काम करणाऱ्या संघटनेसोबत मणिमारन लहान मुलांसाठी प्रभावी सामाजिक संदेश असणारे पण सामाजिक अंतर पाळून खेळता येण्यासारखे नवे खेळ तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. “आमचं काम सुरू देखील झालंय. पण सध्या आम्ही आमच्या गावांमध्ये कोविड-१९ बद्दल जागृती निर्माण करण्यावर जास्त भर देतोय कारण हा आजारही नवा आहे आणि लोकांना कसलीही माहिती नाही. आम्ही लवकरच मणिमारन आणि मगिळिनी यांच्यासोबत मुलांसाठी खेळ तयार करण्याचं काम सुरू करणार आहोत,” प्रीती झेवियर सांगतात. त्या पायिरच्या मार्गदर्शक आहेत.

त्यांच्यासारख्यांच्या कलावंतांसाठी सध्याचा काळ खडतर असल्याचं मणिमारन सांगतात. “कसंय, लोक कलावंत हे संकटाच्या काळात लोकांसोबतच असतात. आणि आता सामाजिक अंतर बाळगायचं, कुणाशी काही संबंध ठेवायचा नाही, हे सगळं जरा त्रासदायकच आहे.” लोक कलावंताचं कामच जाणार असल्यामुळे शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे असं ते म्हणतात. “शिवाय, आम्ही समाजमाध्यमांवर आमचे कार्यक्रम सादर करूच शकतो. तसंही लोक कलावंतांची झोळी तशीही फाटकीच असते त्यामुळे सरकारने आम्हाला काही तरी मदत करायला पाहिजे,” ते कळकळीने म्हणतात.

आता मदत मिळो अथवा ना मिळो, मणिमारन आणि मगिळिनी तर पराई वाजवतच राहतील, गाणी गातच राहतील. आणि कोरोना विषाणूची भीती दूर करण्याचं काम रोजच करत राहतील. “आम्ही जागरुक असण्यावर भर देत राहू आणि हा विषाणू पसरू नये यासाठी आम्ही आमच्या परीने सगळं काही करत राहू. आणि जेव्हा कोरोना आम्हाला रामराम करून जाईल तेव्हा मात्र आम्ही पराईच्या तालावर आमचा आनंद साजरा करू.”

कोरोना गाण्याचा अनुवाद

थाना थाना थान

कोरोना घालतोय थैमान

किती तरी लोक आता

पसरवतायत अफवा

त्यांच्या खोडसाळ बोलण्यावर

विश्वास कसा ठेवावा!

दुर्लक्ष नाही करायचं

घाबरून नाही चालायचं

कोरोनाचा हल्ला

आता परतवून लावा

कोरोनाला दूर ठेवा

नाक झाकून घ्या

जागरुक रहाल तरच

कोरोनाला बसेल आळा

एकमेकांत अंतर ठेवा 

कोरोना जाईल गपगुमान 

थाना थानन थान

कोरोना घालतोय थैमान

अफवा पसरवू नका, 

लावा त्याला चाप!

मांस मच्छी खाऊन

पसरत नाही कोरोना

शाकाहारी माणसांनाही

सोडत नाही कोरोना

सगळेच देश आता

पुरते गेलेत हबकून

संशोधन करून काढतील

त्याची मुळं शोधून

प्रतिकार शक्ती वाढवा 

चांगलं-चुंगलं जेवण करा

स्वतःचं रक्षण करा

भूलथापा लांब ठेवा

खोकणाऱ्यांपासून लांब रहा

शिंकणाऱ्यांपासून दूर पळा

ताप येतोय का लक्ष ठेवा

श्वासावरती ध्यान असू द्या

आठवडाभर असंच राहिलं

समजा कोरोनाने गाठलं

कोरोनावर उपचारासाठी

गाठा तुम्ही दवाखाना

अनुवादः मेधा काळे

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Kavitha Muralidharan

कविता मुरलीधरन चेन्नई स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत. पूर्वी त्या 'इंडिया टुडे' च्या तमिळ आवृत्तीच्या संपादक आणि त्या आधी 'द हिंदू' वर्तमानपत्राच्या वार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्या सध्या पारीसाठी व्हॉलंटियर म्हणून काम करत आहेत.

Other stories by Kavitha Muralidharan