तो जुनाही आणि नवाही. पुरातनही आणि आधुनिकही. फार मोठं ऐतिहासिक मोल आहे त्याला आणि तरीही अगदी आधुनिक संदर्भ. पुदु मंडपम म्हणजे अख्ख्या मदुराईचं छोटंसं रूप. या ३८४ वर्षं जुन्या इमारतीत दुकानंही आहेत आणि इथे या पुरातन शहराचा गाभा जसा जपला गेलाय तसा ते इतरत्र कुठेही नाही. झगमगीत, विविध रंगी कापडांचे पोषाख शिवले जात असतात, दुकानांमध्ये पारंपरिक भांडीकुंडी विकायला ठेवलेली असतात, या जागेचे अनेक न्यारे ढंग आहेत.

तमिळ नाडूच्या कदाचित सर्वात जास्त महत्त्व असणाऱ्या हिंदू मंदिरातल्या उत्सवाला गर्दी करणाऱ्या भक्तांसाठी इथे पोषाख शिवले जातात. आणि या पोषाख शिवणाऱ्या १५० जणांपैकी जवळ जवळ एक तृतीयांश या शहरातले मुस्लिम आहेत. आणि हे पोषाख परिधान करणारे मदुराईच्या आसपासच्या खेड्यापाड्यातले मुस्लिम आहेत.

या शिलाईकाम कारागिरांना जर विचारलं की ते मुस्लिम असूनही एका हिंदू सणासाठी पोषाख शिवतायत ते कसं, तर ते हा प्रश्न धुडकावून लावतात. “हा काही उत्तर भारत नाहीये, मॅडम,” आमीर जॉन म्हणतात. “आम्ही पिढ्या न् पिढ्या एकमेकासोबत राहिलोय आणि एकमेकांना नात्याने पुकारतो. इथे काहीही चुकीचं कसं घडू शकेल?”

“यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?” ४२ वर्षीय मुबारक अली विचारतात. तेही पुदु मंडपममध्ये पोषाख शिवतात. “आम्ही पिढ्या न पिढ्या हे करत आलो आहोत.”

Pudhu Mandapam entrance
PHOTO • People's Archive of Rural India
Pudhu Mandapam
PHOTO • People's Archive of Rural India

जवळपास चारशे वर्षं जुना पुदु मंडपम (डावीकडेः प्रवेशद्वार, उजवीकडेः एक व्हरांडा) आणि इथली समन्वयी संस्कृती जपणारी दुकानं

‘मंडपम’ म्हणजे देवळाचा मंडप, पण जास्त करून हा शब्द मंगल कार्यालयं किंवा सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणाऱ्या मांडवांसाठी वापरला जातो. हा मंडप मदुराई शहराच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या मीनाक्षी अम्मन मंदिरांच्या पूर्व गोपुराच्या विरुद्ध दिशेला आहे.

आता गंमत अशी की जवळ जवळ या चारशे वर्षं जुन्या रचनेच्या नावातल्या ‘पुदु’चा म्हणजे तमिळमध्ये ‘नवा’. आणि १६३५ साली जेव्हा मदुराईचा राजा तिरुमलई नैयक्कर याने वसंतोत्सव साजरा करण्यासाठी जेव्हा हा मंडप बांधला, तेव्हा मात्र तो नक्कीच नवा होता.

गेल्या दोन हजार वर्षापासून इथल्या राजकीय पटावर मदुराईवर सत्ता म्हणजे तमिळ भूमीवर सत्ता असं समीकरण होतं आणि त्या संदर्भात या जागेचं राजकीय आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य अगदी सहज सामावून जातं. अलिकडच्या काळात – अगदी गेल्या आठवड्यात – याचं राजकीय अंग दिसून आलं ते मदुराई लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कळगम (एआयडीएमके) पक्षाचे व्ही व्ही आर राज आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सु वेंकटेशन यांच्यातील लढतीत. आणि त्याचं सगळं धार्मिक महात्म्य लक्षात घेतलं तरी एक गोष्ट विसरता नये ती म्हणजे मदुराईची जागा तीनदा जिंकलीये ती डाव्या पक्षांनी.

आज, २२ एप्रिल रोजी अळगर उत्सव या पोषाख शिवणाऱ्यांना विशेष महत्त्व असणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे – मतदानाचा राजकीय शिमगा १८ एप्रिल रोजी संपला त्याला १०० तासही लोटलेले नाहीत.

Mubarak Ali at his shop
PHOTO • Kavitha Muralidharan
Amir John at his shop
PHOTO • Kavitha Muralidharan

पुदु मंडपममधल्या १५० कारागिरांपैकी किमान ६० मुस्लिम आहेत. डावीकडेः मुबारक अली, त्यांच्या दुकानात. उजवीकडेः आमीर जॉन कामात मग्न

अळगर, कल्लअळगर या शब्दाचं संक्षिप्त रूप. मदुराई शहरापासून फक्त २० किमी दूर असणाऱ्या मेलुर तालुक्यातल्या अळगर कोविल याच नावाच्या पाड्यावरच्या अळगर कोविल मंदिराची मुख्य देवता म्हणजे अळगर. लोकसंस्कृती सांगते की अळगर वैगई नदी पार करून आपली बहीण मीनाक्षी हिच्या लग्नासाठी आला पण जेव्हा त्याला समजलं की लग्न आधीच लागलं आहे तेव्हा मात्र तो लग्न मध्येच सोडून रागावून निघून गेला.

या वर्षी ८ एप्रिलला सुरू झालेला मीनाक्षी मंदिर सोहळा साधारण १२ दिवस चालतो. अळगर उत्सव १४ एप्रिलला सुरू झाला आणि तो ९ दिवस चालेल आणि २२ एप्रिल रोजी त्याची सांगता होईल. या दोन्ही साधारणपणे एकाच वेळी सुरु असलेल्या सोहळ्यांना एकत्रितपणे चित्रई थिरुविळ असं संबोधलं जातं. पहिल्या उत्सवाची सांगता मीनाक्षी थिरू कल्याणम (मीनाक्षीचा दिव्य विवाह) आणि थेरोत्तम (रथयात्रा) सोहळ्याने होते.

पुदु मंडपमची रचना ३३३ फूट लांब, २५ फूट रुंद असून त्याला १२५ कोरीव खांब आहेत. प्रत्येक खांबावर नायक राजे आणि देवतांची शिल्पं कोरली आहेत. यातली काही दुकानं तर कदाचित तमिळनाडूतली सर्वात जुनी दुकानं असतील. इथे पुस्तकांची, भांड्यांची, बांगड्या, कपडे, खेळणी आणि इतर बऱ्याच छोट्या-मोठ्या वस्तूंची ३०० दुकानं आहेत. “मला तरी जेवढं माहित आहे, त्याप्रमाणे ही दुकानं किमान गेल्या २०० वर्षांपासून पुदु मंडपममध्ये आहेत. यातलं सगळ्यात जुनं दुकान जे अजूनही चालू आहे ते म्हणजे – सिकंदर लोखंडी भांड्यांचं दुकान किमान १५० वर्षं जुनं आहे,” जी. मुथु पाण्डी सांगतात. ते स्वतः पोषाख शिवतात आणि मदुराई पुदु मंडपम व्यापारी आणि पोषाख शिवणाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत.

G. Muthu Pandi at his shop
PHOTO • Kavitha Muralidharan
Festival paraphernalia
PHOTO • Kavitha Muralidharan

डावीकडेः मदुराई पुदु मंडपम व्यापारी आणि पोषाख शिवणाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष जी. मुथु पाण्डी. उजवीकडेः या कारागिरांनी तयार केलेल्या उत्सवासाठीच्या काही वस्तू

दर वर्षी तमिळ चित्रई (चैत्र) महिन्यात – १५ एप्रिल ते १५ मे – हे शिलाई-कारागिरांकडे इतर दुकानदारांपेक्षा जास्त काम असतं. याच काळात स्वतः अळगराचा वेश परिधान करणाऱ्या भक्तांसाठी ते पोषाख शिवतात. या हिंदू भक्तांसाठी हे रंगीबेरंगी कपडे बेतण्याचं आणि शिवण्याचं काम आमीर जॉन शांतपणे करत असतात. हा व्यवसाय करणारी त्यांची ही तिसरी पिढी. भाविक कोणत्या भूमिकेसाठी कोणते कपडे घालतात हे त्यांनी आम्हाला बिलकुल न कंटाळता दाखवलं. हे करताना त्यांचं काम काही थांबलेलं नव्हतं. त्यांची सराईत बोटं असं काही काम करत होती की अतिशय अवघड असं भरतकामही एकदम डाव्या हाताचा मळ वाटावं. “आमच्या या दुकानाला आता ६० वर्षं पूर्ण झालीयेत आणि मी माझे वडील शेख नवाब जॉन यांच्याकडून हा व्यवसाय आत्मसात केलाय,” ते सांगतात.

त्यांना कोणती भूमिका करायची आहे यावर भाविकांचा पोषाख अवलंबून असतो. मग त्यांना सल्लादम (विजार), काचइ (कंबरेला गुंडाळलेलं वस्त्र), मारडी मालइ (माळा), उरुमा (मुकुट) किंवा सात्तइ (चाबूक) यातलं काही तरी लागणार. त्यातले काही जण थोप्परइ (पाण्याची कापडी पखाल) देखील विकत घेतात किंवा कापडाचे पलिते.

१९८९ साली तमिळ नाडूच्या तिरुनेलवेलीमधील मनोमनियम सुंदरनार विद्यापीठातील तमिळ विभागाचे माजी विभाग प्रमुख थो परमसिवम यांनी लिहिलेल्या अळगर कोविल या पुस्तकानुसार, भाविक या उत्सवात चार वेगवेगळ्या पात्रं रंगवतातः थिरियडुथाडुवोर (हातात आग घेऊन नाचणारे), थिरियिंद्री आडुवर (आगीशिवाय नाचणारे), सात्तई आडिथाडुवर (चाबकाचे फटके मारून घेत नाचणारे) आणि थिरुथी नीर थेलिप्पर (देव आणि भाविकांवर पाणी शिंपडणारे).

‘ते [मुस्लिम पोषाख कारागीर] आमच्यातलेच आहेत. आम्ही नातलगांसारखे आहोत आणि एकमेकांना तसंच पुकारतो. आम्ही एकमेकांच्या बाजूने उभं राहतो, एकमेकाचं रक्षण करतो’

व्हिडिओ पहाः ‘तुम्हाला हे सगळं फक्त पुदु मंडपममध्येच पहायला मिळेल...’

पहिली तीन पात्रं रंगवणारे कायम लाल विजारी घालतात तर हातात आग घेऊन नाचणारे लाल मुकुट घालतात. जे पाणी शिंपडतात किंवा पाणी वाटतात ते योद्ध्याचे कपडे परिधान करतात आणि उरुमा आणि मारडी मालइ घालतात. परमसिवम नोंदवतात की सर्व जातीचे लोक, अगदी दलित समाजातले देखील लोक या रिवाजांमध्ये भाग घेतात. यांचा उगम कशातून झाला याची मात्र त्यांना कधी कधी कल्पनाही नसते. “बहुतेक जण नवस फेडण्यासाठी म्हणून किंवा पूर्वापारपासून ते या गोष्टी करत आले आहेत म्हणून या प्रथा पाळतात,” ते नोंदवतात. स्त्रिया क्वचितच अशी सोंगं घेतात पण त्यांना तसं करण्यास बंदी असल्याचं ऐकिवात नाही. परमसिवन अशीही नोंद करतात की मीनाक्षी उत्सव हा जास्त करून मदुराई शहरवासीय साजरा करतात तर अळगर हा जास्त करून गावाकडच्या लोकांचा सण आहे.

त्यांच्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे अबू बाकर सिद्दिक, वय ५३ अळगरच्या या दुनियेत प्रविष्ट झाले ते २००७ साली. “आधी पुदु मंडपम मध्ये माझं स्वतःचं एक [छोट्या-मोठ्या वस्तूंचं] फॅन्सी स्टोअर होतं, पण या उत्सवाने मला भारावून टाकलं. विचार करा, हा उत्सव काही फक्त मदुराईत साजरा होत नाही. पुदु मंडपमचे पोषाख कारागीर राज्यातल्या अनेक मंदिरांमधल्या सणांसाठी कपडे शिवतात.”

त्यांच्यातलेच एक आहेत शेख दाऊद, वय ५९. त्यांनी अगदी वयाच्या १३ व्या वर्षी अळगरसाठी पोषाख शिवायला सुरुवात केली. ते म्हणतात, “मी शिवरात्री, कंदस्वामी मंदिरातल्या सोहळ्यासाठी [देखील] कपडे शिवतो.”

अळगर वैगई नदीत शिरून ती पार करतो तो सोहळा साजरा करण्यासाठी लाखभर लोक एका दिवशी गोळा होतात. हा प्रसंग उभा करणं ही या अळगर उत्सवातली सगळ्यात मोठी पर्वणी. त्याच दिवशी भाविक वेगवेगळे पोषाख परिधान करून दिंडी काढतात.

Sheikh Dawood at his shop
PHOTO • Kavitha Muralidharan
Siddique with his employee selvam who he refers to as nephew. Selvam is showing a sickle, various sizes of which can also be seen in the photo
PHOTO • Kavitha Muralidharan

शेख दाऊद (डावीकडे), म्हणतात, ‘मी शिवरात्री, कंदस्वामी मंदिरातल्या आणि इतर सोहळ्यासाठी [देखील] कपडे शिवतो.’ अबू बाकर सिद्दिक (उजवीकडे), त्यांचे मालक हातात ‘कोयता’ धरलेले सेल्वम यांच्यासोबत, सोहळ्यासाठी अशा अनेक वस्तू हाताने तयार केल्या जातात

अळगर पोषाखासाठी गिऱ्हाइकाच्या गरजेप्रमाणे रु. ७५० ते रु. १००० मोजावे लागू शकतात. कधी कधी गिऱ्हाइक अळगर कोविलचा रक्षणकर्ता देव करुप्पस्वामी याला वाहण्यासाठी कोयता विकत घेतात. एखादा शिलाई कारागीर दिवसात दोन किंवा जास्तीत जास्त तीन पोषाख शिवू शकतो. मात्र सणाच्या काळात त्याची कमाई रु. ५०० किंवा रु. ६०० पेक्षा कमी होईल असा एकही दिवस नसतो – अर्थात त्या दिवशी जो पोषाख शिवलाय त्यावर कमाई अवलंबून असते. आणि ही कमाई हाताखालच्या कामगारांना त्यांची मजुरी दिल्यानंतरची आहे.

सिद्दिक सांगतात की त्यांचे काही गिऱ्हाईक तर असे आहेत की जेव्हा त्यांना कळतं ते मुस्लिम आहेत, तेव्हा, “ते मला जास्त पैसे देतात आणि सांगतात की ते इथे कपडे खरेदी करायला आले हे त्यांचं भाग्य आहे.”

मदुराई पुदु मंडपम व्यापारी आणि पोषाख कारागीर संघटनेचे अध्यक्ष जी. मुथु पाण्डींच्या अंदाजानुसार पुदु मंडपममधल्या १५० कारागिरांपैकी किमान ६० जण तरी मुस्लिम आहेत आणि “त्यांच्यापासून काही धोका होईल” असा विचार करणंही शक्य नाही. “ते आमच्यातलेच आहेत. आम्ही नातलगांसारखे आहोत आणि एकमेकांना तसंच पुकारतो. आम्ही एकमेकांच्या बाजूने उभं राहतो, एकमेकाचं रक्षण करतो. देशात बाकी ठिकाणी वेगळं चित्र असेल पण मदुराईत मात्र आम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून असू, एकमेकांचे गळे धरून नाही.”

पोषाख कारागिरांचं म्हणणं आहे की त्यांच्या व्यवसायात कधीच घसरण झाली नाहीये – फेब्रुवारी २०१८ मध्ये मीनाक्षी मंदिरात आग लागली तेव्हा पुदु मंडपम सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आला होता तेव्हाच कदाचित. त्यानंतर तो परत सुरू झाला मात्र अधिकाऱ्यांनी सध्याच्या गर्दीच्या बजबजपुरीतून दुकानं हटवण्याचा मानस आहे आणि पुदु मंडपमचं नूतनीकरण करून ते एक वारसा स्थळ म्हणून त्याचं जतन केलं जाणार आहे. “आम्हालाही पुदु मंडपमचं ऐतिहासिक मोल कळतं आणि आम्हालाही तो जतन करायचाय,” सिद्दीक म्हणतात. “प्रशासनाने आम्हाला कुन्नथूर छत्रम इथे जागा देण्याचं कबूल केलं आहे. जेव्हा ती जागा तयार होईल तेव्हा आम्ही तिथे पसारा हलवू.” दुकानाची जागा बदलली तरी त्याचा व्यवसायावर परिणाम होणार नाही याचा त्यांना विश्वास आहे.

“कदाचित हा असा एक धंदा आहे ज्यात कधीच तोटा होत नाही,” सिद्दीक म्हणतात. “या धामधुमीच्या जगात, चित्रईसारखे सण लोकांना थोडी उसंत मिळवून देतात. लोक एकत्र येतात, काही दिवस एकत्र मजा करतात. आणि कदाचित त्यामुळेच असेल, आमचं कधीही नुकसान म्हणून होत नाही.”

अनुवादः मेधा काळे

Kavitha Muralidharan

Kavitha Muralidharan is a Chennai-based independent journalist and translator. She was earlier the editor of 'India Today' (Tamil) and prior to that headed the reporting section of 'The Hindu' (Tamil). She is a PARI volunteer.

Other stories by Kavitha Muralidharan
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale