वाळून कडक झालेल्या जमिनीतल्या एका बिळात एक खेकडा मरून पडलाय, त्याचे पाय शरीरापासून वेगळे झालेत. “गरमीमुळे मरून जातायत ते,” आपल्या पाच एकर भातखाचरातली खेकड्यांची बिळं दाखवत देवेंद्र भोंगाडे सांगतो.

जर का पाऊस पडला असता तर हेच खेकडे शेतातल्या पाण्यात पोहताना दिसले असते, आपल्या सुकत चाललेल्या पिवळ्या –हिरव्या धानाच्या रानात उभा असलेला देवेंद्र सांगतो. “माझ्या धानाच्या कोंबांचं काही खरं नाही,” तिशीतल्या या शेतकऱ्याच्या आवाजात चिंता लपून राहत नाही.

त्याच्या रावणवाडी गावात (लोकसंख्या ५४२, जनगणना २०११) शेतकरी रानातल्या छोट्या वाफ्यात जून महिन्यात, मोसमी पाऊस येण्यापूर्वी बी पेरतात. काही दमदार पाऊस झाले आणि खाचरात पाणी साठलं की ३-४ आठवड्यांच्या रोपांची रानात लावण केली जाते.

पण यंदा रावणवाडीमध्ये, एरवी पावसाचं आगमन होतं त्याला सहा आठवडे उलटून गेले, २० जुलै उजाडला तरीही पावसाचा पत्ता नव्हता. दोनदा जरा शिडकावा झाला, पण त्यानं काय होणार? ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत त्यांनी कसं बसं धानपिकाला पाणी दिलं. आणि रानातली कामं कमी होत चालली म्हटल्यावर भूमीहीन मजुरांनी रोजंदारीसाठी गावं सोडली.

*****

इथून २० किलोमीटरवर, गरडा जंगली गावात, लक्ष्मण बांटे देखील काही काळापासून या टंचाईचा सामना करतायत. जून आणि जुलै कोरडेच चाललेत, ते सांगतायत. जमलेले इतर कास्तकार दुजोरा देतायत. आणि २-३ वर्षांतून एकदा तरी त्यांची खरिपाची पिकं वाया जातायत.

पन्नाशीचे असणारे बांटे सांगतात की त्यांच्या लहानपणी हे असं नव्हतं. पावसात सातत्य होतं, धानाचं पीक व्यवस्थित यायचं.

पण २०१९ चं वर्षसुद्धा तोटाच घेऊन आलंय. आणि हीच नवी रीत व्हायला लागलीये. शेतकऱ्यांना घोर लागलाय. “माझं रान खरिपात पडक राहणार,” धास्तावलेले नारायण उइके म्हणतात (जमिनीवर बसलेले, शीर्षक छायाचित्र पहा). त्यांनी सत्तरी पार केलीये आणि गेली जवळपास पन्नास वर्षं ते त्यांचं दीड एकर रान कसतायत. आयुष्यभर त्यांनी शेतमजुरी देखील केलीये. “२०१७ साली, २०१५ साली रानं रिकामीच होती...” ते सांगतात. “गेल्या साली देखील पाऊस उशीरा आला म्हणून आमच्या पेरण्या लांबल्या होत्या.” पाऊस लांबला की त्याचा परिणाम पिकाच्या उताऱ्यावर आणि उत्पन्नावर होतो. आणि कास्तकारच रानात पेरणार नसेल तर शेतमजुरांनाही पुरेशी मजुरी मिळत नाही.

PHOTO • Jaideep Hardikar

देवेंद्र भोंगाडे (वर, डावीकडे), आपल्या रावणवाडी गावच्या रानात जिथे धान पिकाची कोंबं सुकत  चाललीयेत तिथली खेकड्यांची बिळं दाखवताना (वर, उजवीकडे). नारायण उइके (डावीकडे, खाली) म्हणतात, ‘पावसाने साथ दिली नाही, तर शेतकऱ्याचं काही खरं नाही’. गरडा जंगलीचे शेतकरी आणि माजी सरपंच लक्ष्मण बांटे आपल्या गावातल्या शुष्क शिवारापाशी

गरडा जंगली हे भंडारा जिल्हा आणि तालुक्यातलं भंडारा शहरापासून २० किलोमीटरवर असणारं ४९६ लोकांचं एक छोटं गाव आहे. रावणवाडीप्रमाणे इथल्या शेतकऱ्यांकडे एक ते चार एकर अशी लहान शेती आहे आणि तीही कोरडवाहू, पावसावर अवलंबून. आणि पावसाने साथ दिली नाही तर शेतकऱ्याचं काही खरं नाही, गोंड आदिवासी असणारे उइके म्हणतात.

यंदा २० जुलै उजाडला तरी त्यांच्या गावातल्या शिवारात जवळ जवळ सगळ्यांच्याच भाताच्या लावण्या खोळंबल्या होत्या आणि भाताची रोपं सुकून चालली होती.

पण दुर्गाबाई दिघोऱ्यांच्या रानात मात्र कसं तरी करून भातरोपांची लावणी चालू होती. त्यांच्या रानात बोअर वेल आहे. गरड्यातल्या चार किंवा पाच शेतकऱ्यांनाच ही चैन परवडणारी आहे. त्यांची ऐंशी फूट खोल विहीर कोरडी पडल्यानंतर दिघोरेंनी त्या विहीरीतच दोन वर्षांपूर्वी बोअर वेल घेतली, १५० फूट खोल. २०१८ साली तीही कोरडी पडल्यानंतर त्यांनी दुसरी बोअर मारली.

बांटे म्हणतात, या भागात बोअर वेल म्हणजे नवलच आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत इथे बोअर बिलकुल पहायला मिळायच्या नाहीत. “पूर्वीच्या काळी, बोअर घ्यायची गरजच नव्हती,” ते म्हणतात. “पण आता पाण्याची वानवा आहे, पावसाचा भरोसा नाही त्यामुळे लोक [बोअर] घेऊ लागलेत.”

२०१९ सालच्या मार्चपासून गावाजवळचे दोन मालगुजारी तलावही कोरडे पडलेत, बांटे सांगतात. खरं तर एरवी उन्हाळ्याच्या महिन्यांमध्येही या तलावांमध्ये पाणी राहतं. त्यांचा असा कयास आहे की बोअरवेलची संख्या वाढत असल्यामुळे या तलावांचा भूजलाचा साठा आटत चालला असावा.

हे साठवण तलाव विदर्भाच्या पूर्वेकडच्या धानाची शेती करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत स्थानिक राजेरजवाड्यांच्या वरदहस्तामुळे बांधले गेले आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याच्या सिंचन विभागाने मोठ्या तलावांची देखभाल दुरुस्ती आणि कारभार आपल्या अखत्यारीत घेतला आणि छोट्या तलावांची जबाबदारी जिल्हा परिषदेने घेतली. या जलस्रोतांचं व्यवस्थापन स्थानिक समुदायांनी करणं आणि त्यांचा वापर मासेमारी आणि सिंचनासाठी होणं अपेक्षित आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात असे सुमारे ७,००० तलाव आहेत पण यातले बहुतेक अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून त्यांना फारच अवकळा आली आहे.

After their dug-well dried up (left), Durgabai Dighore’s family sank a borewell within the well two years ago. Borewells, people here say, are a new phenomenon in these parts.
PHOTO • Jaideep Hardikar
Durgabai Dighore’s farm where transplantation is being done on borewell water
PHOTO • Jaideep Hardikar

त्यांची विहीर कोरडी पडल्यानंतर (डावीकडे) दुर्गाबाई दिघोरेंच्या कुटुंबाने त्याच विहिरीत दोन वर्षांपूर्वी बोअर घेतली. इथल्या लोकांचं म्हणणं आहे की बोअर वेल म्हणजे या भागासाठी नवलच आहेत. दिघोरेंच्या रानात काम करणाऱ्या मजुरांना बोअरचं पाणी होतं म्हणून भाताच्या लावणी करता आली.

अनेक तरुण मुलं गाव सोडून बाहेर पडलेत – भंडारा शहरात, नागपूर, मुंबई, पुणे, हैद्राबाद, रायपूर आणि इतर ठिकाणी. आणि तिथे ते ट्रकवर क्लीनर, भटके मजूर, शेतजमूर म्हणून किंवा पडेल ती काम करतायत.

आणि हे वाढतं स्थलांतर आता लोकसंख्येच्या आकड्यांमधूनही पुढे यायला लागलंय. २००१ ते २०११ या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १५.९९ टक्के वाढ झालेली दिसते, तर याच काळात भंडाऱ्याची लोकसंख्या मात्र ५.६६ टक्के इतकीच वाढली आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण जे लोकांच्या बोलण्यातून सातत्याने पुढे येतं ते म्हणजे शेती जास्तीत जास्त बेभरवशाची होत चाललीये, शेतात कामं कमी झालीयेत आणि घरचा खर्च भागवणं शक्य होत नसल्यामुळे लोक इथून बाहेर पडतायत.

*****

भंडारा हा मुख्यतः भातशेती करणारा जिल्हा आहे. शिवारं आणि अध्येमध्ये जंगल. इथलं सरासरी वार्षिक पाऊसमान १,२५० मिमी ते १,५०० मिमी आहे (केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालातील नोंदीनुसार). वैनगंगा ही बारमाही नदी सात तालुक्यांच्या या जिल्ह्यातून वाहते. भंडाऱ्यात काही फक्त पावसाळ्यात वाहणाऱ्या नद्याही असून सुमारे १,५०० मालगुजारी तलाव आहेत असं विदर्भ सिंचन विकास महामंडळाने नमूद केलेलं आहे. फार पूर्वीपासून इथून काही महिन्यांपुरतं स्थलांतर होत असलं तरी विदर्भाच्या इतर काही जिल्ह्यांप्रमाणे इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं पेव फुटलेलं नाही.

केवळ १९.४८ टक्के शहरीकरण असलेल्या या कृषीप्रधान जिल्ह्यातल्या छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांचं उत्पन्न प्रामुख्याने शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून आहे. मात्र सिंचनाची मजबूत व्यवस्था नसल्याने इथली शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे, आणि पावसाळा संपल्यावर, ऑक्टोबरनंतर तलावांचं पाणी थोड्याच शेतीला पुरतं.

अनेक अहवालांनी असं सूचित केलंय की भंडारा जिथे येतो, त्या मध्य भारतात जून ते सप्टेंबर या काळातला मोसमी पाऊस कमी होत चाललाय आणि जोरदार किंवा अतिवृष्टीच्या घटना वाढत चालल्या आहेत. २००९ सालच्या पुण्याच्या भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थानच्या एका अभ्यासात ही या बदलाची नोंद घेण्यात आलेली आहे. २०१८ साली जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासानुसार भारतातल्या वातावरणीय बदलांच्या १० केंद्रबिंदूंमध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. या अभ्यासानुसार, वातावरणीय केंद्रबिंदू म्हणजे असं ठिकाण जिथे सरासरी हवामानामध्ये होणाऱ्या बदलांचे लोकांच्या जगण्याच्या दर्जावर विपरित परिणाम होऊ शकतात. आणि सध्याची परिस्थिती अशीच पुढे चालू राहिली तर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मोठे आर्थिक फटकेही सहन करावे लागू शकतात असा इशाराही हा अहवाल देतो.

२०१८ साली भारतीय हवामान वेधशाळेच्या पावसाच्या आकडेवारीचा आधार घेऊन रिव्हायटलायझिंग रेनफेड ॲग्रिकल्चर नेटवर्कने महाराष्ट्रासाठी काही वास्तव सांगणारी माहिती संकलित केली. त्यानुसारः एक, २००० ते २०१७ या काळात विदर्भाच्या जवळ जवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ देण्याच्या घटनांची वारंवारिता आणि तीव्रता या दोन्हीत वाढ झाली आहे. दोनः मोठ्या कालखंडातील पावसाच्या वार्षिक सरासरीत जरी सातत्य दिसत असलं तरी पावसाच्या दिवसांची संख्या घटली आहे. म्हणजेच या प्रदेशांमध्ये पावसाचं प्रमाण तितकंच आहे मात्र हा पाऊस कमी दिवसांमध्ये पडतोय – आणि याचा पिकांवर परिणाम होतो.

Many of Bhandara’s farms, where paddy is usually transplanted by July, remained barren during that month this year
PHOTO • Jaideep Hardikar
Many of Bhandara’s farms, where paddy is usually transplanted by July, remained barren during that month this year
PHOTO • Jaideep Hardikar

भंडाऱ्यातल्या अनेक शेतांमध्ये, जिथे जुलैपर्यंत भातलावण्या पार पडलेल्या असतात, ती या वर्षी मात्र अजूनही कोरडीच दिसतायत

२०१४ साली टेरी (द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट) या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, “१९०१-२००३ या काळातल्या पावसाच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यातल्या मोसमी पावसाच्या प्रमाणात [राज्यभरात] घट होत आहे, तर ऑगस्ट महिन्यातल्या पावसात वाढ होतीये... भरीस भर मोसमी पावसामध्ये अतिवृष्टीचा टक्का वाढत चालला आहे, तोही विशेषकरून मोसमाच्या पूर्वार्धात (जून व जुलै).”

असेसिंग क्लायमेट चेंज व्हल्नरेबिलिटी अँड अडाप्टेशन स्ट्रॅटेजीज फॉर महाराष्ट्रः महाराष्ट्र स्टेट अडाप्टेशन ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज या अभ्यासानुसार विदर्भासाठी कोणत्या गोष्टी बिकट ठरू शकतात त्या नोंदवण्यात आल्या आहेतः “पावसाची मोठी ओढ, पावसाच्या लहरीपणात वाढ आणि पाऊसमानामध्ये घट.”

भंडारा हा अशा काही जिल्ह्यांमधला एक जिल्हा आहे जिथे अतिवृष्टीचं प्रमाण १४ ते १८ टक्क्यांनी वाढू शकतं पण त्या सोबतच पावसाळ्यातल्या कोरड्या दिवसांमध्येही वाढ होऊ शकते. हा अभ्यास असंही सांगतो नागपूर विभागासाठी (ज्यात भंडाऱ्याचा समावेश आहे) तापमानाच्या सरासरीमध्ये ( वार्षिक तापमान सरासरी २९.१७) १.१८ ते १.४ अंश (२०३० पर्यंत) आणि २०१७ पर्यंत २.८८ ते ३.१६ अंश इतकी वाढ होऊ शकते. राज्याच्या एकूण विभागांमधली ही सर्वात जास्त वाढ आहे.

भंडाऱ्याच्या कृषी अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या या पावसावर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातले बदल आता जाणवू लागले आहेत. या जिल्ह्याची नोंद शासकीय कागदपत्रांमध्ये आणि जिल्हा आराखड्यांमध्ये ‘चांगले सिंचन’ असणारा प्रदेश म्हणून केली जाते. कारण आहेत इथले पारंपरिक तलाव, नद्या आणि पुरेसा पाऊस. “पाऊस उशीरा सुरू होतोय, अशीच स्थिती इथे आता दिसू लागली आहे, याचा पेरण्यांवर आणि उत्पादनावर परिणाम होतो,” भंडाऱ्यातील विभागीय कृषी अधीक्षक, मिलिंद लाड सांगतात. “आमच्याकडे पावसाचे ६०-७० दिवस मिळायचे, पण साधारणपणे गेल्या दशकात हा आकडा जून-सप्टेंबर या काळासाठी ४०-४५ दिवसांवर आला आहे.” काही मंडळांमध्ये – २० महसुली गावांचं मिळून एक मंडळ बनतं – यंदा जून आणि जुलै महिन्यात केवळ ६ ते ७ दिवस पाऊस झाल्याचं निरीक्षण नोंदवतात.

“पावसाने ओढ दिली, तर तुम्ही उच्च प्रतीचा तांदूळ पिकवू शकत नाही,” लाड पुढे सांगतात. “रोपं २१ दिवसांची झाल्यानंतर जर लावण्या लांबल्या तर हेक्टरी दर दिवसाला १० किलो अशा दराने उत्पादन घटतं.”

पूर्वीची परंपरागत धूळपेरणी – बियांपासून रोपं तयार करून लावणी करण्याऐवजी मातीत बी फेकून पेरणी करण्याची पद्धत – पुन्हा एकदा या जिल्ह्यात रुळू लागली आहे. मात्र भातलावणीच्या तुलनेत अशा पेरणीत उगवणीची शक्यता कमी असल्यामुळे उतारा कमी पडू शकतो. पण जर पावसाने गुंगारा दिल्यामुळे भात रोपं वाया गेली तर जे नुकसान होतं त्यापेक्षा धूळपेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तोटा कमी होतो.

 Durgabai Dighore’s farm where transplantation is being done on borewell water.
PHOTO • Jaideep Hardikar

भंडाऱ्याच्या बहुतेक शिवारांमध्ये खरिपात धानाचंच पीक घेतलं जातं

“भाताची रोपं तयार होण्यासाठी आणि नंतर लावणीसाठी जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस फार गरजेचा असतो,” ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अविल बोरकर सांगतात. ही संस्था पूर्व विदर्भातील धान शेतकऱ्यांबरोबर देशी वाणांच्या संवर्धनासाठी काम करते. आणि मोसमी पावसात बदल होत असल्याचं मत ते नोंदवतात. थोडाफार बदल झाला तर लोक त्याला तोंड देऊ शकतात. “पण पावसाळाच कोरडा गेला तर – मग मात्र मुश्किल आहे.”

*****

जुलै महिना संपता संपता पावसाने भंडाऱ्यामध्ये जरा जोर धरायला सुरुवात केलीये. पण तेवढ्या काळात खरिपातल्या धानाच्या पेरण्यांना फटका बसलाय – जुलै संपेतो संपूर्ण जिल्ह्यात धानाच्या केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या होत्या, मिलिंद लाड सांगतात. भंडाऱ्याच्या खरीप पिकाखालील १.२५ लाख हेक्टर क्षेत्रात जवळ जवळ केवळ धानच घेतलं जातं.

अनेक मालगुजारी तलाव ज्यांच्यावर मच्छिमार समुदायांची उपजीविका अवलंबून आहे, तेही कोरडे पडलेत. गावात सर्वत्र कशाची चर्चा चालू असेल तर पाण्याची. आता रोजगार देणारं एकमेव क्षेत्र म्हणजे शेती. पण इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये भंडाऱ्यात भूमीहीन मजुरांसाठी काहीही रोजगार निर्माण होऊ शकलेला नाही आणि आता जरी पाऊस पडला तरी धानाच्या पेरण्यांना चांगलाच फटका बसलेला आहे.

एकरच्या एकर जमिनी तुम्हाला पडक पडलेल्या दिसतील – नांगरलेली विटकरी माती, उन्हाचा कार आणि ओलाव्या अभावी कडकून गेलीये, मधे मधे पिवळी पडत चाललेली भाताची रोपं, जिथे फुटलेले धुमारे वाळून चाललेत. आणि जे कोणते रोपांचे वाफे हिरवे दिसतायत, तिथे इतर काही पर्याय नाही म्हणून खताची मात्रा दिलेली दिसते, ज्याने तेवढ्यापुरती तरी रोपांची वाढ होते.

गरडा आणि रावणवाडी प्रमाणेच भंडाऱ्याच्या धरणगाव मंडळामधल्या २० गावांमध्ये यंदा चांगला पाऊस झालेला नाही असं लाड सांगतात. आणि यंदाच नाही तर गेल्या काही वर्षांत हीच परिस्थिती होती. पावसाची आकडेवारी दाखवते की जून ते १५ ऑगस्ट २०१९ या काळात भंडाऱ्यामध्ये पाऊसमानात २० टक्के तूट आहे आणि या काळात पडलेल्या ७३६ मिमी पावसातला बहुतेक पाऊस २५ जुलैनंतर पडलेला आहे (याच काळासाठी पावसाची सरासरी ८५२ मिमी आहे). म्हणजे, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात, या जिल्ह्यात मोठी तूट भरून निघाली आहे.

त्यातही परत हा पाऊस देखील समसमान पडलेला नाही असं भारतीय वेधशाळेच्या मंडळाप्रमाणे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून दिसून येतं. उत्तरेकडे तुमसरला चांगला पाऊस झाला, मध्यभागातील धारगावमध्ये कमी पाऊस होता, आणि दक्षिणेला पवनीमध्ये चांगल्या सरी बरसल्या.

Maroti and Nirmala Mhaske (left) speak of the changing monsoon trends in their village, Wakeshwar
PHOTO • Jaideep Hardikar
Maroti working on the plot where he has planted a nursery of indigenous rice varieties
PHOTO • Jaideep Hardikar

मारोती आणि निर्मला म्हस्के (डावीकडे) त्यांच्या वाकेश्वर गावातल्या पावसात झालेल्या बदलांविषयी सांगतायत.  आपल्या रानातल्या वाफ्यात धानाच्या देशी वाणांची रोपं केलीये तिथे काम करताना मारोती

मात्र सरासरी, व्यापक आकडेवारीमध्ये जमिनीवर, लोकांचे काय अनुभव आहेत ते कधी व्यक्त होत नाही. जसं की पाऊस मधूनच बरसतोय, थोड्याच काळासाठी, कधी कधी अगदी काही मिनिटं. पण पाऊस मापन केंद्रामध्ये मात्र तो पूर्ण दिवस पावसाचा दिवस म्हणून नोंदला जातो. तुलनात्मक तापमान, उष्मा आणि आर्द्रता याबाबत गावपातळीवरची विदा उपलब्ध नाही.

१४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते विमा कंपन्यांना आदेश दिले की ज्या शेतकऱ्यांनी या वर्षी त्यांच्या ७५ टक्के रानात पेरण्या केलेल्या नाहीत त्या सगळ्यांना भरपाई देण्यात यावी. प्राथमिक अंदाजांनुसार हा आकडा १.६७ लाख इतका असून पेरण्या न झालेलं एकूण क्षेत्र ७५,४४० हेक्टर इतकं आहे.

सप्टेंबरपर्यंत भंडाऱ्यात १,२३७.४ मिमी पावसाची नोंद झाली होती किंवा जून ते सप्टेंबर या काळात इथे सहसा पडणाऱ्या पावसाच्या (१,२८०.२ मिमी) ९६.७ टक्के. यातला बहुतेक पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाला, तोपर्यंत पावसावर अवलंबून असणाऱ्या जून-जुलै महिन्यातल्या खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या होत्या. पावसाने रावणवाडी, गरडा जंगली आणि वाकेश्वरमधले मालगुजारी तलाव भरले. अनेक शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात दुबार पेरणी केली, काहींनी कमी दिवसांच्या वाणाची धूळपेरणी केली. आता पिकाचा उतारा मात्र कमी येणार आणि कापण्या उशीरा, नोव्हेंबरच्या शेवटी होणार.

*****

मागे जुलै महिन्यात ६६ वर्षीय मारोती म्हस्के आणि ६२ वर्षीय निर्मला म्हस्के चिंतेत पडले होते. या लहरी पावसाच्या भरोशावर राहणं मुश्किल आहे, ते म्हणतात. पूर्वीसारखी जी पावसाची संततधार लागायची – अगदी चार-पाच किंवा सात दिवस पावसाची झड लागायची ते दिवस आता संपलेत. आता, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाऊस अधून मधून येतो – तोही एक-दोन तासांसाठी आणि मुसळधार, मग मधेच ओढ आणि उष्मा.

दहा वर्षं झाली, त्यांनी जून-जुलै महिन्यातला मृगाचा दमदार पाऊसच पाहिलेला नाही. मृग पडला की पेरण्या करून भाताची २१ दिवसांची तयार रोपं पाणी भरलेल्या खाचरांमध्ये लावली जायची. ऑक्टोबरच्या शेवटापर्यत धानाचं पीक कापणीला आलेलं असायचं. आता मात्र त्यांना नोव्हेंबर संपेपर्यंत, कधी कधी तर डिसेंबर पर्यंत थांबावं लागतं. पाऊस लांबला की एकरी पिकाचा उतारा कमी पडतो आणि जास्त दिवसांच्या धानाच्या उत्तम जाती लावण्यावर मर्यादा येतात.

“या वक्तापर्यंत [जुलैच्या अखेरीस],” वाकेश्वरला मी त्यांना भेटलो तेव्हा निर्मला म्हणाल्या, “आमच्या लावण्या पार पडलेल्या असतात.” इतर अनेक शेतकऱ्यांप्रमाणे म्हस्के कुटुंब भाताच्या लावणीसाठी पावसाकडे डोळे लावून बसलेत. गेले दोन महिने त्यांच्या रानात काम करणाऱ्या सात मजुरांना जवळ जवळ काहीही काम नाहीये, ते सांगतात.

म्हस्केंच्या घरासमोरच त्यांचं दोन एकर रान आहे ज्यात ते भाजीपाला करतात आणि देशी वाणाचं धानाचं पीक घेतात. या कुटुंबाच्या मालकीची १५ एकर जमीन आहे. या गावात पिकांचं काटेकोर नियोजन आणि जास्त उतारा यासाठी मारोती म्हस्केंचं नाव घेतलं जातं. मात्र पावसाच्या स्वभावात झालेला बदल, त्याचा वाढता लहरीपणा, कधी कमी, कधी जास्त पडण्याची वृत्ती या सगळ्यांमुळे त्यांनाही घोर लावलाय. ते म्हणतातः “जर पाऊस किती आणि कधी पडणार हेच जर आपल्याला माहित नसेल तर काय पीक घ्यायचं हे कसं ठरवणार?”

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Jaideep Hardikar

Jaideep Hardikar is a Nagpur-based journalist and writer, and a PARI core team member.

Other stories by Jaideep Hardikar
Editor : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale