त्या आपल्या समुदायासाठी लढतायत - बरेचदा त्यांच्याच धारणांविरुद्ध. त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्या झटत आहेत, पण त्यांच्या रोजच्या कामाविरुद्ध. असं काम, ज्याचा त्यांना नायनाट करायचा आहे. त्यांना वाटतं की जुनी पिढी त्यांच्यापासून तुटलीये म्हणून त्या आता लहान मुलांवर लक्ष केंद्रित करत आहे. या आहेत कल्पना*, वय केवळ ३३ वर्षे, पण गोमासपलयम येथे लहान मुलांकरिता त्या एक मोफत शिकवणी चालवतात. ही तमिळनाडूतील मदुरै येथील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे - २३० घरांमधून दाटीवाटीने राहणारी अंदाजे ७०० कुटुंबं - आपल्या पर्यटन स्थळांसाठी जास्त प्रसिद्ध असलेल्या शहराच्या अगदी मधोमध.

हाताने मैला साफ करणारे, सफाई कर्मचारी (रस्ते झाडणारे) किंवा घरकामगार आणि सेवक यांची ही कुटुंबं. ही सगळी माणसं अरुंधतियार आहेत, दलित समुदायांतील सामाजिक उतरंडीत सर्वांत खालच्या पायरीवर असणारी. अनेकांना, विशेष करून इथे राहणाऱ्या वयस्कर लोकांना, वाटतं की त्यांच्या आयुष्यात तरी हे काम सुटणार नाही. “का ते माहित नाही, पण माझ्या लोकांना वाटतं की हे बदलणं काही अवघड आहे,” त्या म्हणतात. “मी या कामाबद्दल अभियान राबवलं की त्यांना राग येतो. त्यांना कुणाला दुखवायचं नाहीये.”

म्हणून मग कल्पना कोवळ्या मनांमध्ये वेगळ्या कल्पना रुजवू पाहताहेत. त्या एक शिकवणी केंद्र चालवतात – स्वतःच्या जोरावर - ४० मुलांकरिता, आठवड्याचे ५ दिवस. कधीकधी शनिवारी सुद्धा वर्ग घेतले जातात. हे केंद्र गोमासपलयम येथील एका सामुदायिक भवनात घेतले जातात, वेळ असते, सायंकाळी ५:३० ते ८:३०. “आपल्या पालकांचं काम हाती घेण्याचा विचारही मनात आणायचा नाही” असं त्या कायम या मुलांच्या मनावर बिंबवत असतात. “मी हे गेली तीन वर्षं करत आलेय,” त्या म्हणतात, “आणि इथे असेपर्यंत करत राहणार.” तीन वर्षांपूर्वी या ५० वर्षं जुन्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी पहिल्यांदाच काँक्रिटची पक्की घरं बांधण्यात आली. “या तथाकथित नूतनीकरणानंतर मी ह्या [तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या] सामुदायिक भवनाचा वापर मुलांना शिकवण्यासाठी करतीये.”

PHOTO • Krithika Srinivasan

इथे राहणाऱ्या बऱ्याच लोकांना सफाईचं काम सोडणं कठीण वाटतं , कल्पना म्हणतात , ज्यांनी स्वतः ही वेस ओलांडली आणि आता इतरांनाही असंच करायला मदत करत आहेत

असं असलं तरीही त्यांची आई मात्र दररोज रस्ते झाडते. “मी अगदीच लहान असताना माझे वडील मरण पावले. मी जर आईला सांगितलं की हे काम करणं सोडून दे, तर तिला ते आवडत नाही. तिला वाटतं, हे काम होतं म्हणूनच आमचं घर चालू आहे. तिला हे कळत नाही की, या कामात आपसूकच विटंबना होते. की आपला एका विशिष्ट जातीत जन्म झाला म्हणूनच हे काम आपल्या माथी आलं.”

कल्पना यांची शिकवणी १४ वर्षांच्या कौसल्यासारख्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडते - ज्यांना आपल्या घरातील गर्दीत आणि अडचणीत आपला गृहपाठ पूर्ण करणं कठीण होऊन बसतं. “मी इथे क्लास लावल्यापासून वर्गातील पहिल्या दहा मुलांमध्ये माझं नाव यायला लागलं,” कौसल्या म्हणते, तिचे वडील रमेश मदुरै मध्ये सफाईचं काम करतात. “मी खूप मन लावून अभ्यास करते, नाहीतर मला माझ्या बाबांसारखंच आपला मान गमावून महिन्याला ६,००० रुपये कमवावे लागतील. मी माझ्या बाबांचा आदर करते, ते मला पाहिजे ती गोष्ट देऊ पाहतात. पण, त्यांनी या दुष्टचक्रातून बाहेर यावं, असं मला मनापासून वाटतं.”

आपलं ध्येय पूर्ण करायला बरेचदा कल्पना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात. त्या मदुरै महानगरपालिका कार्यालयाच्या महिला विभागात रु. २५० मानधनावर समूह संघटिका म्हणून काम करतात. “ही नियमित नोकरी नाहीये, म्हणून मी लॉयला संस्थेत महिलांना शिवणकाम शिकवते, त्याचा रु. ३००० पगार मिळतो.”

PHOTO • Krithika Srinivasan
PHOTO • Krithika Srinivasan

‘आयुष्याला सामोरं जाण्यासाठी उपयोगी अशा बऱ्याच गोष्टी त्या आम्हाला शिकवतात,’ १५ वर्षांची एक विद्यार्थी सांगते, गोमासपलयम कॉलनीत (उजवीकडे) कल्पना यांची शिकवणी (डावीकडे) लावल्यावर तिच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे

या कामांव्यतिरिक्त कल्पना सकाळ-संध्याकाळ एका सरकारी शाळेच्या मदतनीस म्हणून मुलांना व्हॅनमध्ये बसवून देणं आणि उतरवणं हे काम करतात, त्याचे त्यांना ३,००० रुपये मिळतात. दर दोन महिन्यातून  ५०० रुपये काढून त्या दर दोन महिन्यांनी सामुदायिक भवनाचं विजेचं बिल भरतात. “मी ज्या संस्थेत काम करते तिचे संचालक मला दरमहा १,००० रुपये देतात. त्यात मी वरचे काही पैसे घालून मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू विकत घेते. कधीकधी मी त्यांची सहल काढते. त्यांचे पालक बसचं भाडं देतात. मी खाऊ, खेळणी, बगीचा किंवा प्राणीसंग्रहालयाचं प्रवेश तिकीट, वगैरे इतर खर्चाचं बघते.”

त्यांच्या शिकवणीत येणारी ४० मुलं अजून काही शिकण्याच्या इराद्याने पुन्हा पुन्हा इथे का येतात हे कदाचित यातूनच स्पष्ट होतं. “एक दिवस मी कल्पनाअक्का सारखीच शिक्षिका होणारे,” १५ वर्षांची अक्षयश्री म्हणते, जिचे वडील, अलागिरी मदुरै मधील एका हॉटेलात सफाईचं काम करतात. “त्या आम्हाला पुस्तकातून शिकवतात पण त्या तेवढ्यावरच थांबत नाहीत. आयुष्याला सामोरं जाण्यासाठी उपयोगी अशा बऱ्याच गोष्टी त्या आम्हाला शिकवतात. मी शिकवणी केंद्रात येणं सुरु केल्यापासून माझा वर्गात नेहमीच पहिला वा दुसरा क्रमांक आला आहे.”

गुणा व्हिन्सेंट, महालिर शक्ती (महिला शक्ती) या मदुरै-स्थित एका समाजसेवी संस्थेचे संस्थापक-व्यवस्थापक आहेत. या संस्थेने त्यांचा समुदाय ज्या व्यवसायात अडकून पडला आहे त्यातून बाहेर पडण्यास कल्पना यांना मदत केली. व्हिन्सेंट यांच्या मते “अशा अधिकाधिक कल्पनांना त्यांच्या चेरी [झोपडपट्टी] आणि जातीतून मुक्त करणं” हा या मागचा विचार आहे. “बऱ्याच लोकांना त्यांच्या समुदायाने किंवा समाजाने आखून दिलेल्या मर्यादा ओलांडणं पसंत नसतं. कल्पना ते करू धजली. तरी, एवढ्यावर ती थांबली नाही. आणखी लोकांनी त्या मर्यादा ओलांडाव्या, अशी तिची इच्छा आहे.”

कल्पना आशा करतात की, एक दिवस किमान यातलं एखादं पोर तरी उभं राहील आणि हाती झाडू किंवा बादली आली तर ते नाकारेल.

कविता यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं खरं नाव बदलण्यात आलं असून त्यांचे छायाचित्र धूसर करण्यात आले आहेत.


अनुवाद: कौशल काळू

Krithika Srinivasan

Krithika Srinivasan is a Chennai-based freelance journalist with a master’s degree in sociology. She is a trained shadow puppeteer.

Other stories by Krithika Srinivasan
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo