पट्टणमथिट्टा जिल्ह्यातील राणी अंगाडी गावातल्या के. आर. शारदा यांच्या उमाटावरच्या घरातून भात व आरारोटची शेतं आणि केळीच्या बागा न्याहाळता येतात. या सगळ्या शेतांवर कुटुंबश्रीच्या संघ कृषीं अंतर्गत (सामूहिक कृषी) शेती केली जाते. २०१८च्या ऑगस्टमध्ये आलेल्या पुरात ही शेतं तर बुडालीच, शिवाय पाणी इतकं वर गेलं की शेताहून उंचीवर असलेल्या त्यांच्या घरातही पाणी शिरलं - अख्खा तळमजला पाण्याखाली गेला. “मला ११ दिवस घर सोडून जावं लागलं,” शारदा म्हणतात. तेवढे दिवस त्या जराशा उंचावर असणाऱ्या एका पुनर्वसन केंद्रात राहिल्या. त्या स्वतः शेतकरी नसून गृहिणी आहेत.

 

तिथून परतून बरेच दिवस होऊन गेले, तरी अजूनही त्या आपल्या वस्तू त्यांच्या घराच्या वऱ्हांड्यात आणि पायऱ्यांवर सुकवत बसल्या आहेत. त्यांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचे आहेत ते म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे काही सुंदर फोटो. सुदैवाने, त्यातील बरेचसे फोटो धुता येण्याजोगे किंवा जल-अवरोधक, लॅमिनेटेड, अशा प्रकारचे आहेत. ते फोटो त्यांनी पायऱ्यांच्या कोपऱ्यात वाळायला ठेवले होते.  त्यातील काही त्यांच्या मुलाचे, के. आर. राजेश याचे आहेत, जो सैन्यात असून आपल्या कामानिमित्त बाहेर असतो. शारदा यांना त्याचा नेमका पत्ता माहित नाही, पण तो उत्तरेत “कुठे तरी” राहतो, असं त्यांना वाटतं.


अनुवाद: कौशल काळू 

कौशल काळू रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.

पी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.

Other stories by P. Sainath