डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी जात्यावरच्या ओव्या  हा  प्रकल्प सादर करत आहे नांदगाव च्या कुसुम सोनवणे आणि इतर मैत्रिणींनी गायलेल्या महाड सत्याग्रहाबाबतच्या १४ ओव्यांची एक चित्रफीत

अशी चवदार तळ्यावरी हाक पाण्याच्या घोटासाठी
जमली ती मैफिल इथं बाया पोरासाठी

२० मार्च, १९२७ – तत्कालीन मुंबई प्रांताच्या कुलाबा जिल्ह्यातल्या चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेबांनी प्यायलं – आणि त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या ३,००० सत्याग्रहींनीदेखील तेच केलं. या एका कृतीने सार्वजनिक पाणवठ्यावरचं पाणी पिऊ न देण्याच्या दलितांवर लादलेल्या नियमाला आव्हान दिलं आणि तो नियमच झुगारून दिला.

२० मार्च, २०१८ – जस्टिस आदर्श कुमार गोएल आणि जस्टिस उदय उमेश लळित यांचा निकालः जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) कायदा, १९८९ खाली तक्रार दाखल केली गेली तर वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशी केल्यानंतर आणि तक्रार नोंदवून घेण्याची परवानगी दिल्यानंतरच अशा कर्मचाऱ्याला अटक केली जाऊ शकते. या निकालानंतर त्याच्या विरोधात देशभर दलित आणि आदिवासी संघटनांनी निदर्शनं केली कारण या निकालामुळे या दोन्ही समूहांना संरक्षण देणाऱ्या अत्याचार विरोधी कायद्याच्या तरतुदीच शिथिल करण्यात आल्या आहेत.

२० मार्च, २०१८ – जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या कुसुम सोनवणे आणि त्यांचे सोबती पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या आपल्या नांदगाव या गावी परतले आहेत. “आम्ही यंदा चवदार तळ्याला पोहचूच शकलो नाही,” कुसुमताई सांगतात. “आमची गाडी अर्ध्यात महाडलाच बंद पडली, आणि मग बराच उशीर झाला होता, त्यामुळे मग आम्ही एसटीने घरी परतलो.”

दर वर्षी २० मार्चला नांदगावचे काही लोक दलितांच्या दृष्टीने ऐतिहासिक अशा या घटनेची स्मृती जागी करण्यासाठी महाडला जातात. सर्वप्रथम ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालतात आणि मग १९२७ मध्ये बाबासाहेबांनी जसं केलं तसंच चवदार तळ्याचं पाणी पितात.

महाड नगरपालिकेने (आता रायगड जिल्ह्यात) ५ जानेवारी १९२४ रोजी एक ठराव मंजूर केला आणि ‘अस्पृश्यांसह’ सर्व जातीच्या लोकांसाठी सर्व सार्वजनिक सुविधा खुल्या केल्या. पण हे सगळं फक्त कागदावरच राहिलं. आंबेडकरांनी गावात पाय ठेवेपर्यंत.

Women signing ovi
PHOTO • Samyukta Shastri

‘असा खाईला मार हात पाण्याच्या हक्कासाठी गं,’ नांदगावच्या आपल्या घरी कुसुमताई गातायत

अस्पृश्य आणि अस्पृश्यता या आपल्या निबंधांमध्ये आंबेडकर लिहितातः

“हिंदू समाजव्यवस्थेने केलेल्या अन्यायाच्या विरोधात अस्पृश्यांनी उभ्या केलेल्या चळवळीला मोठा इतिहास आहे, खास करून महाराष्ट्रात. या इतिहासाचे दोन टप्पे पाहता येतील. पहिल्या टप्प्यात यासंबंधीची निवेदनं, याचिका आणि निदर्शनं दिसतात. आणि दुसऱ्या टप्प्यात प्रस्थापित हिंदू व्यवस्थेच्या विरोधात थेट कृतीद्वारे केलेलं उघडउघड बंड दिसतं.

“विचारधारेतला हा बदल दोन गोष्टींमुळे घडून आला. एक तर हे लक्षात येऊ लागलं होतं की याचिका आणि निदर्शनांचा हिंदूंवर काहीच परिणाम झालेला नव्हता. दुसरं म्हणजे, शासनाने असं जाहीर केलं होतं की सर्व सार्वजनिक सुविधा आणि सार्वजनिक संस्था या सर्व नागरिकांसाठी, अस्पृश्यांसह, खुल्या आहेत...

“सार्वजनिक पाणवठ्यांवरून पाणी घेण्याचा हक्क बजावण्यासाठी जे-जे प्रयत्न झाले त्यामध्ये चवदार तळ्याचा निव्वळ उल्लेख पुरेसा आहे.”

व्हिडिओ पहाः ‘भीमरायाच्या जोरावरी आमचा मिळविला हाक (हक्क?),’ कुसुमताई गातात

या २५ मार्चला जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाचा गट ओव्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नांदगावला गेला. आताशा जात्याचा वापर खूपच कमी झाला आहे, सगळे जण विजेवरच्या चक्कीचाच वापर करू लागलेत. बहुतेक वेळा लग्नाची हळद फोडण्यासाठीच जाती बाहेर येतात.

पण जात्याचं महत्त्व हे की आजही स्त्रियांना त्यांच्या आयुष्याविषयी, आजूबाजूला घडत असणाऱ्या गोष्टींविषयी त्यांच्या मनातलं व्यक्त करण्याची हक्काची जागा म्हणजे हे जातं. मन मोकळं करण्याची त्यांची ही खास जागा. अनेक जाती-समाजांमध्ये जात्यावरच्या ओव्या गाण्याची परंपरा आहे, मात्र दलित समाजाचं वैशिष्ट्य हे की यातले गायक-कलावंत एकत्र जमले की त्यांच्या लाडक्या भीमबाबांनी जे काही साध्य केलं त्याविषयी आणि त्यांना न्याय्य आणि समानतेवर आधारित समाजाच्या वाटेवर नेलं त्या डॉ. भीमराव आंबेडकरांची गाणी ते गातात.

या देशाने संविधान स्वीकारलं त्याला ६८ वर्षं उलटली तरी त्यांचा लढा अजूनही चालूच आहे. जातीवर आधारित भेदभाव थांबलेले नाहीत. आजही अनेक गावांमध्ये दलित घरातल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पोषण आहार देताना वरच्या जातीच्या मुलांपासून वेगळं बसवलं जातंय.

आम्ही २५ मार्चला नांदगावला पोचलो तेव्हा बाया सकाळी ९ च्या सुमारास नळकोंडाळ्यावर पाणी भरत होत्या. आपापली घरातली कामं उरकून त्या ११.३० पर्यंत कुसुम सोनवणेंच्या घरी जमा झाल्या. पुढचे तीन तास थांबत-थांबत त्यांची गाणी सुरू होती. कुसुमताईंच्या २ ते १० वर्षांच्या तीन नाती आणि त्यांच्या मैत्रिणीदेखील आल्या होत्या. त्यांच्यातल्या सगळ्यात मोठ्या नम्रताने थोडा वेळ गाण्यातही भाग घेतला. महाड सत्याग्रहावरच्या त्यांच्या ओव्या सुरू असताना भिंतीवरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो जणू ते तिथेच असल्याचं सांगत होता.
Wall full of posters and photographs
PHOTO • Samyukta Shastri
Three little girls standing, sisters
PHOTO • Samyukta Shastri

डावीकडेः कुसुमताईंचं घर आंबेडकर, सावित्रीबाई, जोतिबा फुले आणि गौतम बुद्धाच्या प्रतिमांनी भरलं आहे. संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रतीने भिंत सजलीये. उजवीकडेः कुसुमताईंच्या नाती – अनन्या, नम्रता आणि प्रांजल

पहिल्या ओवीमध्ये, आगगाडीच्या इंजिनाची शिटी आसमंतात दुमदुमतीये आणि चवदार तळ्यापाशी रामजीचा पुत्र भीम आलाय याची सूचना देतेय. दुसऱ्या ओवीमध्ये त्या गातात की गाडीच्या डब्यांमध्ये मेणबत्त्या दिसतायत, त्यांच्या सगळ्या बहिणीच सोबत तळ्याला (महाडला) चालल्यायत. गाणारी दुसरीला सांगते की चल, तळ्याला जाऊ आणि भीमरायाला साथ देऊ. चवदार तळ्याच्या पाण्यात चार बोटं बुडवली, आणि जणू परिवर्तन झाल्यासारखं वाटतंय. आतापर्यंत ज्या पाण्याला हात लावायला मनाई होती त्या पाण्याला स्पर्श केल्याने आता आपण अस्पृश्य नाही असं वाटू लागलंय.

गाणारी गाते की रामजीचा मुलगा भीमराव आंबेडकरांचं धैर्य किती तरी मोठं आहे. पाचव्या ओवीत त्या गातात की पाण्याचा आपला हक्क बजावण्यासाठी सगळे जण तळ्यापाशी जमा झालेत. पुढच्या ओवीत गायिका गाते की तिथेच फुलांची एक बाग आहे आणि बाबासाहेबांनी सत्याग्रहासाठी मोठा त्याग केलाय. चवदार तळ्याचं पाणी पिण्याची ही कृती म्हणजे दलितांच्या मनात जी समानतेची भावना निर्माण झाली त्याचं प्रतीक आहे. आणि हेच पुढच्या ओवीमध्ये गायलंय. भीमरायाने तिथे “बंगला बांधलाय.”

पुढच्या सहा, आठव्या ते तेराव्या ओवीत महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब आणि सोबतच्या इतरांनी काय अपेष्टा सोसल्या त्याबद्दल गायलं आहे. कर्मठ ब्राह्मण जातीने तळ्याचं पाणी पिण्याचं धारिष्ट्य करणाऱ्या दलितांना मारहाण केली. ते त्यांच्या हक्कांसाठी लढत होते तेव्हा त्यांना दगड गोट्यांचा मार सहन करावा लागत होता. त्यांच्या हक्कांसाठी भांडायला ते घाबरले नाहीत, खरं तर त्यांच्या सोबत शिळ्या भाकरीदेखील नव्हत्या. त्यांनी गावोगावी जाऊन लोकांसोबत मिटिंगा घेतल्या आणि असं वाटत होतं जणू भीमरायाच त्यांच्या सोबत होता.

शेवटच्या ओवीत असं गायलंय की भीमरायाने दिल्लीमध्ये बहुजनांचा निळा झेंडा फडकवला आणि सगळ्या नेत्यांमध्ये भीमरायाच उठून दिसला.

या १४ ओव्या नक्की ऐका – आधीच्या चित्रफितीत त्या प्रत्यक्षात गायलेल्या पहा आणि ध्वनीफितीमध्ये त्या ऐकण्याचा आनंद घ्याः

आली आली आगीन गाडी ओरडली जंगलात
रामजीचं भीम बाळ उभं चवदार तळ्यात

आली आली आगीन गाडी डब्या डब्याने मेणबत्त्या
या बहिणी आमच्या साऱ्या चवदार तळ्याला गेल्या होत्या

बाई चवदार तळं, तळं जाऊया पाहायला गं
अशी भिमाई रायाला याला पाठिंबा द्यायला

अशी चवदार तळ्यावरी रंग देती चार बोटं गं
बाई रामजी च्या पुताचं याचं दीर्व्य (धैर्य) किती मोठं

अशी चवदार तळ्यावरी हाक पाण्याच्या घोटासाठी
जमली ती मैफिलं इथं बाया पोरा साठी

अशी चवदार तळ्यावरी आहे फुलांचा तो बाग गं
अशी भिमाई रायानी केला सत्याग्रहाचा त्याग गं

अशी महाडच्या तळ्यावरी पाण्याचा घोट तो रंगला गं
बाई भिमाई रायानी वर बांधला बंगला गं

असा खाईला मार हात पाण्याचा हक्का साठी गं
बाई कर्मठ जात इथं बामनाची मोठी

बाई झाला ना सत्याग्रह दगड गोटा चं खाऊनी
अशी आमच्या हक्का साठी पोरं पोटाशी घेउनी गं

अशी आमच्या जीवनाची आम्ही आशाचं नाही केली
आमच्या भीम रायाला याला साथ चं आम्ही दिली

अशी महाडच्या तळ्यासाठी आम्ही कदर नाही केली
बाया पोरना संगतीला, संग भाकर नव्हती ओली

गावा गावात जाऊइनी आम्ही मीटिंगा कश्या केल्या
पण आमचा भीमराया आमच्या संगतीला आला

यात कर्मठ जातीनी यांनी केलाना दगड फेक
भीमरायाच्या जोरावरी आमचा मिळविला हाक

बाई दिल्लीच्या तख्तावरी निळा झेंडा फडकला
बाई नेत्यामधी नेता भीमराया झळकला

PHOTO • Namita Waikar

कलावंतः कुसुम सोनवणे

गावः नांदगाव

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः नवबौद्ध

मुलं – दोन मुलगे, दोन मुली

व्यवसायः शेती

दिनांकः या ओव्या, छायाचित्रं आणि ध्वनीफित २५ मार्च २०१८ रोजी संकलित करण्यात आली.

पोस्टरः सिंचिता माजी

अनुवादः मेधा काळे

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale