“सकाळपासूनची माझ्या गाढवाची ही तिसरी खेप आहे, पाणी घेऊन टेकडी चढण्याची,” नि:श्वास टाकत डाली बाडा म्हणाल्या. “ते इतकं थकतं, पण त्याला द्यायला आमच्याकडे पुरेसा खुराकही नसतो.”

५३ वर्षीय डाली बडांच्या घरी आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा त्या गाढवाला गवत आणि उडदाची शिळी डाळ चारत होत्या. बाडाजी, त्यांचे पती, आकाशाकडे नजर लावून होते – जूनचे दोन आठवडे उलटून गेले होते. “मला वाटतं पाऊस येईल,” ते राजस्थानच्या बाग्री बोलीत म्हणाले. “पावसाळ्यात पाणी खूप गढूळ होतं आणि माझ्या बायकोला गाढवासोबत जाऊन ते खराब पाणी भरावं लागतं.”

उदयपूर पासून ७० किलोमीटरवरील असलेल्या उदयपूर जिल्ह्याच्या रिषबदेव तहसिलातील १००० वस्तीच्या पाचा पडला गावातील माणसं आणि जनावरं एकाच पावसाळी ओढ्यातील पाणी पितात. तो सुकतो तेव्हा लोक जमिनीत खड्डे खणून त्यातील पाणी वापरतात. पाऊस पडल्यावर या खड्ड्यात कचरा भरतो आणि स्वच्छ पाण्याच्या आशेत इथले रहिवासी नवे खड्डे खोदतात. अनेक कुटुंबे आपली गाढवं घेऊन टेकडीवर पाणी घेऊन जातात. इतर खेड्यात या गावाची ओळख ‘गाढवं पाणी भरतात ते गाव’ अशीच आहे.

गाढवांनी भरलेलं हे पाणी घरातील सर्वच कामांसाठी वापरलं जातं पण बायका बहुतेक वेळा आपली धुणी-भांडी ओढ्यावरच नेतात. इथल्या रहिवाश्यांच्या मते गाढवं ही एक गुंतवणूक आहे जी वर्षानुवर्षे पाणी भरून परतावा देत असते.

In Pacha Padla village, many families (including Dali Bada and her husband Badaji, centre image) use donkeys to carry drinking water uphill
PHOTO • Sramana Sabnam
In Pacha Padla village, many families (including Dali Bada and her husband Badaji, centre image) use donkeys to carry drinking water uphill
PHOTO • Sramana Sabnam
In Pacha Padla village, many families (including Dali Bada and her husband Badaji, centre image) use donkeys to carry drinking water uphill
PHOTO • Sramana Sabnam

पाचा पडला गावातील अनेक कुटुंबे (मधल्या फोटोतील डाली बाडा आणि त्यांचे पती बाडाजीसुद्धा) आपली गाढवं घेऊन टेकडीवर पाणी भरून नेतात

जेव्हा काम मिळेल तेव्हा डाली आणि बाडाजी एका स्थानिक ठेकेदाराकडे २०० रुपये रोजावर काम करतात. बाडाजी त्यांच्या ताब्यातील जेमतेम एकरभर सरकारी ‘पट्टा’ जमिनीवर उडीद, तूर, मका आणि भाजीपाला घेतात.

त्यांनी त्यांचं गाढव २५०० रुपयांना दुसऱ्या एका कुटुंबाकडून विकत घेतलं. एवढे पैसे जमवायला त्यांना १८ महिने लागले. अहरी आदिवासी जमातीच्या या कुटुंबाकडे एक गाढवीण आणि शिंगरू, शिवाय एक बकरी आणि गाय सुद्धा आहेत.

पहाटे ५ वाजता डाली पाणी भरण्याच्या कामाला लागतात. उतरणीच्या प्रत्येक खेपेला साधारण अर्धा तास आणि चढणीला एक तास लागतो. एका खेपेनंतर त्या थोडं घरकाम करतात आणि पुन्हा गाढवासह दुसऱ्या खेपेला निघतात. हे असं दहा वाजेपर्यंत चालतं. गाढवाच्या दोन्ही बाजूंना बांधलेल्या १२-१५ लिटरच्या प्लास्टिक कॅनमधून पाणी आणताना त्या स्वत: डोक्यावर एक घडा आणतात. डाली आणि तिचं गाढव चढणीवर थकतात आणि क्षणभर विसावा घेतात.

डालींच्या घरून त्या, त्यांचं गाढव आणि मी पाणी आणायला एका अवघड वाटेवरून खाली निघालो. साधारण २० मिनिटांनी आम्ही छोटे गोटे पसरलेल्या एका मोकळ्या जागी पोचलो. डाली बाडा म्हणाल्या की ही जागा पावसाळ्यात वेगळीच दिसते... तो आटून गेलेला जाबु नाला होता आणि आम्ही त्याच्या पत्रातून चालत होतो.  

Dali Bada, who makes multiple trips downhill and uphill over several hours every morning with her donkey, to fill water from a stream or pits dug by villagers, says: "... at times I feel that there's no god; if there was one, why would women like me die filling pots with water?'
PHOTO • Sramana Sabnam

डाली बाडा दिवसातले अनेक तास, ओढ्यातून किंवा गावकऱ्यांनी खणलेल्या खड्ड्यांतून पाणी भरण्यासाठी आपल्या गाढवासह टेकडीवरून खाली-वर अनेक फेऱ्या करतात. त्या म्हणतात, “... कधी कधी वाटतं देव नाहीच. तो असता तर पाणी भरताना माझ्यासारख्या बायांचे जीव का बरं गेले असते?”

गाढव थांबेपर्यंत आम्ही चालत होतो, त्याला त्याचं ठिकाण माहित होतं. डाली बाडांनी एक दोर काढला आणि आपल्या स्टीलच्या घागरीला बांधला. मग त्या खड्ड्याच्या काठावर ठेवलेल्या दांड्यावर पाय रोवून त्या उभ्या राहिल्या. खोल २० फुटावर पाणी होतं. तिने दोर खेचला आणि खूश होऊन घड्यातील पाणी दाखवलं. तिचा चेहरा विजयाने खुलेला होता.

राजस्थानच्या कडक उन्हाळ्यात पाणी आणखीच खोल जातं. डाली बाडा म्हणतात की उन्हाळा हा तर देवाचा लोकांची परीक्षा पाहण्याचा मार्ग आहे. “पण कधी कधी वाटतं देव नाहीच. तो असता तर पाणी भरताना माझ्यासारख्या बायांचे जीव का बरं गेले असते?”  

घरी परतल्यावर,  बाडाजींनी गाढवावरचं पाणी उतरवून घेतलं. “हे पाणी बिलकुल वाया घालवून चालणार नाही,” ते म्हणाले. कसलीही उसंत न घेता पाणी भरून ठेवण्यासाठी रिकामी भांडी गोळा करायला डाली बाडा आत गेल्या. त्यांचा मुलगा कुलदीप अहरी, वय ३४, रात्रभर मका दळून येऊन झोपला होता. घरातील निरव शांततेत एकच आवाज येत होता - स्टीलच्या लोट्यातून बाडाजी पाणी पीत होते त्याचा.

अनुवादः छाया देव 

छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.

Sramana Sabnam

श्रमणा सबनम नवी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात लिंगभाव अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ती पश्चिम बंगालच्या बर्धमान शहराची रहिवासी असून वेगवेगळ्या कहाण्यांच्या शोधात प्रवास करणं तिला आवडतं.

Other stories by Sramana Sabnam