आपल्या दोन खोल्यांच्या मातीच्या घरात, उंबऱ्यात बसून कांती देबगुरू आणि त्यांची मुलगी धनमती लाल धाग्यात साळीचे दाणे विणण्यात मग्न आहेत. नंतर हे एका बांबूच्या फाकावर चिकटवून त्यांचे हार ओवण्यात येतील. कांती यांचे पती, गोपीनाथ देबगुरू, लक्ष्मी देवीची प्रतिमा तयार करण्यासाठी याचा वापर करतील.

गोपीनाथ एक तंतुवाद्य घेऊन घराबाहेर येतात. एकीकडे कांती आणि धनमती साळीचे हार तयार करत असताना ते तार छेडून लक्ष्मी पुराणातील काही पदं गातात. "आम्ही परंपरेनुसार लक्ष्मी देवीच्या धानाच्या प्रतिमा तयार करतो, अन् तिचं गुणगान करतो," ३५ वर्षीय कांती सांगतात. त्या आणि त्यांचं कुटुंब देबगुरू अर्थात देवगुणिया या पारंपरिक शाहीर किंवा भाटांच्या समुदायाचे असून ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातील खुडपेजा गावात राहतात.

देबगुरू त्यांच्या पूर्वजांकडूनच लक्ष्मी पुराण शिकत आले आहेत, ४१ वर्षीय गोपीनाथ मला त्यांच्याकडचं ताडाच्या सालीवरचं एक हस्तलिखित दाखवत सांगतात. लक्ष्मी पुराण हे बलराम दास यांनी १५ व्या शतकात रचलेलं काव्य आहे. लक्ष्मी देवीचा भगवान जगन्नाथांशी विवाह हे या काव्याचं कथानक असून त्यासाठी तिने पाळलेल्या व्रतवैकल्यांचं वर्णन यात केलंय. गोपीनाथ एकतारी लक्ष्मी वीणा (ब्रह्म वीणा किंवा देबगुरू वीणा म्हणूनही प्रसिद्ध) वाजवून हे काव्य गातात. देबगुरू भोपळा आणि बांबू वापरून जवळपास तीन फूट लांबीचं हे वाद्य तयार करतात.

Tp left: Gopinath Debguru sings a verse from Laxmi Purana with his Laxmi veena, while Kanti Debguru prepares garlands with paddy.  Top right: Kanti and Gopinath at the doorway of their two-room mud house in Khudpeja, where they live with their three daughters. Bottom left: Kanti fastens the paddy with red yarn on bamboo slivers to make the garlands. Bottom right: Gopinath makes the base of the idol with the garlands
PHOTO • Ipsita Ruchi

वरून डावीकडे : गोपीनाथ देबगुरू आपली लक्ष्मी वीणा वाजवून लक्ष्मी पुराणातलं एक पद गातायत , तर कांती देबगुरू धानाचे हार तयार करतायत . वरून उजवीकडे : आपल्या दोन खोल्यांच्या मातीच्या घराच्या उंबऱ्यात बसलेले कांती आणि गोपीनाथ , त्यांच्या तीन मुलींसोबत इथे राहतात . खालून डावीकडे : कांती बांबूच्या फाकांवर लाल धाग्याने धान विणून हार तयार करतात . खालून उजवीकडे : गोपीनाथ हार वापरून प्रतिमेचा तळभाग तयार करतात

लक्ष्मी पुराणाव्यतिरिक्त देबगुरू कुटुंबांतील पुरुष घरातील महिलांनी विणलेल्या धानाच्या हारांपासून देवीच्या प्रतिमा आणि पूजेत लागणाऱ्या वस्तू  – मंदिराच्या आकाराची देवघरं, खेळण्याएवढ्या आकाराचे रथ आणि पालख्या, कलश इत्यादी – तयार करतात. ते मण (धान मोजण्याचं एक माप), सूप, कमळाच्या आकाराच्या वस्तू, फुलदाण्या आणि हत्तीच्या चिमुकल्या प्रतिमा यांसारख्या वस्तूदेखील तयार करतात. "आम्हाला आमच्या पूर्वजांकडून या [धान कला किंवा धान लक्ष्मी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या] कलेचा वारसा मिळालाय," कांती म्हणतात.

हे भाट वर्षभर नुआपाडा जिल्ह्यातील गावांमध्ये लक्ष्मी पुराणातील भागांचं कथन करीत फिरत असतात. दर वेळी कथन साधारण तीन तास चालतं, पण मार्गशीर्षात (नोव्हेंबर-डिसेंबर) मात्र ते ४-५ तास चालू शकतं. देबगुरु आपण भेट दिलेल्या घरांतील विवाहित महिलांना देवीचं व्रतवैकल्य कसं पाळायचं याबद्दल सल्लेही देतात, आणि कधीकधी मूळ काव्यावर आधारित लक्ष्मी पुराण सुअंग हे नाटक देखील शिकवतात.

"काम तसं कठीण आहे, पण आम्ही आमची परंपरा जोपासण्यासाठी ते करतो. गावोगावी देबगुरू वीणा वाजवत, लक्ष्मी पुराण गात फिरायचं. भेट म्हणून लोकांना प्रतिमा अन् वस्तू द्यायच्या, त्यांना देवीची आराधना करायला प्रेरित करायचं," गोपीनाथ म्हणतात.

काही भक्त देबगुरूंनी आणलेल्या प्रतिमा आणि पूजेचं साहित्य स्वीकार करतात. दिलेल्या वस्तूच्या आकारमानानुसार या शाहिरांना प्रत्येक वस्तूच्या बदल्यात रू. ५० ते रू. १०० किंवा धान्य, डाळी आणि भाज्या मिळतात. पण देबगुरू म्हणतात की त्यांना बदल्यात कुठल्याच दानाची अपेक्षा नसते. "ती प्रेरित होऊन लक्ष्मीची भक्त बनली, की सगळं पावलं," गोपीनाथ याच नावाचे त्यांचे साठीचे चुलते म्हणतात. तेसुद्धा आपल्या कुटुंबासोबत नुआपड्याच्या खरियार तालुक्यातील खुडपेजा गावात राहतात.

हे शाहीर नुआपाडा जिल्ह्यात लक्ष्मी पुराणातील काही प्रसंगांचं कथन करीत फिरत असतात. ही कथनं साधारण तीन तास चालतात

व्हिडिओ पाहा: लक्ष्मीचं नाव घेऊन तार छेडणं

कांती तीन दिवसांत सुमारे ४० हार तयार करतात आणि गोपीनाथ दिवसाला १० प्रतिमा. ते सहसा दानात मिळालेल्या साळी वापरतात. बांबूचे फाक गावातील शेतकऱ्यांकडून किंवा खुडपेजातील नदीजवळून आणतात. कधी कधी, कांती वीटभट्ट्यांमध्ये आणि मनरेगा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी कामावर जातात. डिसेंबरमध्ये कापणीच्या हंगामात त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या भातशेतीतही राबतात.

खुडपेजात केवळ दोन – गोपीनाथ भावंडांची – देबगुरू कुटुंबं राहतात. ओडिशात इतर मागासवर्गीय (ओबीसी) यादीत समाविष्ट असलेल्या या समुदायाचे संपूर्ण नुआपाड्यात मिळून फार तर ४० कुटुंब राहत असतील.

पूर्वी देबगुरूंना मुख्यत्वे खालच्या जातीच्या हिंदू घरांमध्ये लक्ष्मी पुराणाचं पठण करायला बोलावलं यायचं. उच्च जातीच्या महिला देबगुरूंकडून फार तर लक्ष्मीच्या प्रतिमा विकत घेतात, खासकरुन मार्गशीर्षात. कालांतराने त्यांच्या परंपरेला दलित आणि आदिवासी समुदायांमध्ये देखील मान्यता मिळाली आहे. (हे पुराण अस्पृश्यतेच्या अनिष्ट प्रथेविरोधात भाष्य करतं.)

Top row: The paddy craft is a tradition inherited from their forefathers, say the Debgurus –they make altars, urns, toy-sized chariots and more. Bottom left:  Gopinath holds up an idol of Laxmi he's made. Bottom right: A palm-leaf manuscript of the Laxmi Purana, which is passed down the generations
PHOTO • Ipsita Ruchi

वरील रांग : धान कलेच्या परंपरेचा वारसा त्यांना आपल्या पूर्वजांकडून मिळालाय , असं देबगुरू म्हणतात ते देवघरं , कलश , खेळण्याच्या आकाराचे रथ इत्यादी तयार करतात . खालून डावीकडे : गोपीनाथ आपण तयार केलेली लक्ष्मीची प्रतिमा हातात धरून . खालून उजवीकडे : लक्ष्मी पुराणाच्या ताम्रपटाचं एक हस्तलिखित , जे पिढ्यान् पिढ्या हस्तांतरित होत आलंय

गोपीनाथ सकाळी आपल्या दुचाकीवर बसून बाहेर पडतात, ते संध्याकाळी परत येतात. पण, जर लांबचा प्रवास करायचा असेल, तर एक दोन दिवस तिथेच मुक्काम करतात. त्यांचे बंधू, थोरले गोपीनाथ यांना आपल्या सेकंडहँड गाडीवर आरामात प्रवास करता येतो.

पूर्वी कांती प्रवासात आपल्या पतीसोबत असायच्या. पण ७-८ वर्षांपूर्वी त्यांच्या मुलींना – १३ वर्षांची धनमती आणि १० वर्षांची भूमिसुता – खुडपेजातील सरकारी शाळेत घातल्यापासून हे थांबलं. "शिक्षण फुकट आहे म्हटल्यावर आम्ही त्यांना शाळेत पाठवलं. त्यांनी शिकावं जरूर, पण सोबत आपली पारंपरिक कलाही शिकावी, असं वाटतं. कारण त्यातूनच आम्हाला ओळख मिळते," कांती म्हणतात. शाळेत मिळणारा मध्यान्ह आहारदेखील निर्णायक घटक होता.  त्यांची धाकटी मुलगी, चार वर्षांची जमुना, स्थानिक अंगणवाडीत जाते.

मात्र, देबगुरूंच्या धान कलेची परंपरा लोप पावत चालली आहे. कांती म्हणतात की शासनाने या कलेला पाठिंबा देण्याची गरज आहे. बँक कर्ज आणि ग्रामीण आवास यांच्याशी निगडित योजना अजूनही त्यांच्यापर्यंत पोचलेल्याच नाहीत. "सरकारनं आम्हाला कारागीर ओळखपत्र दिली आहेत," कांती म्हणतात. "पण काही सहाय्यच नसेल, तर या कार्डांचा तरी काय उपयोग?"

ज्येष्ठ पत्रकार अजित कुमार पंडा यांनी या कहाणीसाठी मदत केल्याबद्दल वार्ताहर त्यांचे आभार मानू इच्छितात.

या लेखाची एक आवृत्ती प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रकाशित ग्रासरूट्स पत्रिकेच्या सप्टेंबर २०१९ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अनुवाद: कौशल काळू

Ipsita Ruchi

Ipsita Ruchi is from Khariar town in Nuapada district. She has recently completed an M. Phil in English from Berhampur University in Odisha.

Other stories by Ipsita Ruchi
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo