‘‘आम्‍हाला श्‍वासच घेता येत नाही,’’ कामगार सांगतात.

तेलंगणातल्‍या नालगोंडा जिल्ह्यातल्या धान्‍य खरेदी केंद्रात काम करताना ते जे मास्‍क लावतात, ते घामाने भिजतात. साळीच्या ढिगांतून उठणार्‍या धुरळ्‍यामुळे अंगाला खाज येते, शिंका येतात, खोकला येतो. किती मास्‍क बदलणार? किती वेळा हात आणि तोंड धुणार? त्‍यांना दहा तासांत प्रत्‍येकी ४० किलो वजनाची ३२०० धान्‍याची पोती भरायची असतात, ती ओढून न्‍यायची असतात, त्‍यांचं वजन करायचं असतं, ती शिवायची असतात, खांद्यावरून वाहून न्‍यायची असतात आणि ट्रकमध्ये चढवायची असतात. हे सगळं करत असताना ते किती वेळा तोंड झाकून घेणार?

४३-४४ अंश सेल्‍सिअसच्‍या भाजून काढणाऱ्या उन्‍हात हे ४८ कामगार दहा तासात १२८ टन – म्हणजे मिनिटाला २१३ किलो धान्‍य हाताळत असतात. त्‍यांचं काम पहाटे तीन वाजता सुरू होतं आणि दुपारी एक वाजता संपतं. म्हणजे सकाळी ९ ते दुपारी १, असे किमान चार तास ते प्रचंड उष्ण आणि शुष्क हवेत काम करत असतात.

मास्‍क घालायला हवा, शारीरिक अंतर पाळायला हवं, खरं आहे; पण छायाचित्रांत दिसतंय त्‍या, कांगल तालुक्‍यातल्‍या कांगल गावच्‍या धान्‍य खरेदी केंद्रावर काम करताना हे पाळणं अशक्‍यच आहे. राज्‍याचे कृषी मंत्री निरंजन रेड्डी यांनी एप्रिलमध्ये स्‍थानिक पत्रकारांना सांगितलं की, तेलंगणात अशी ७००० केंद्रं आहेत.

या कामाची कामगारांची कमाई किती? प्रत्येक केंद्रात बारा-बारा कामगारांचे चार गट असतात आणि प्रत्येक कामगाराला इथल्‍या कामाचे रोज ९०० रुपये मिळतात. पण यातली मेख अशी की, तुम्‍हाला हे काम एक दिवसाआड मिळतं. म्‍हणजे ४५ दिवसांच्‍या खरेदीच्‍या हंगामात प्रत्येक कामगाराला २३ दिवस काम मिळतं – म्हणजे दीड महिन्यांच्या धान्य खरेदीच्या काळात २०,७५० रुपयांची कमाई.

या वर्षी रबी हंगामातली धान्‍य खरेदी एप्रिलच्‍या पहिल्‍या आठवड्यात सुरू झाली, २३ मार्च ते ३१ मे असा कोविड १९ ची टाळेबंदी होती, बरोब्‍बर त्‍याच काळात!

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

या प्रकारचं काम सगळ्‍यांनी मिळूनच करावं लागतं. धान्‍याच्‍या एका ढिगावर एकाच वेळी दहा-बारा कामगारांचा गट काम करतो. कांगल खरेदी केंद्रात असे चार गट काम करतात. दहा तासांत ते १२८ टन धान्य ट्रकमध्ये लादतात.

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

दोन माणसं झपाट्याने ४० किलो धान्‍याचं पोतं भरतात. हे भरताना साळीच्या ढिगातून पांढरा धुरळा उडतो. त्‍यामुळे अंगाला प्रचंड खाज सुटते. अंघोळ केल्‍याशिवाय ती कमीच होत नाही!

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

पहिल्‍याच फटक्‍यात त्‍यांना पोत्‍यात चाळीस किलो धान्‍य भरावं लागतं. सारखं सारखं जास्‍तीचं धान्‍य काढणं किंवा पोत्‍यातल्‍या धान्‍यात भर घालणं म्हणजे उशीर करणं आणि आपलं काम दुपारी १ नंतर वाढवणं!

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

भरलेली पोती ओढून नेण्‍यासाठी कामगार आकडे वापरतात आणि ते एकमेकांना देतात. प्रत्येक हत्‍यार प्रत्येक वेळी निर्जंतुक कसं करणार?

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

तालारी रवी (उजवीकडचा) या गटाचा प्रमुख. कामगार पोत्‍यात नेमक्‍या वजनाचं धान्‍य भरतायत आणि त्‍यांचं काम दुपारी १ च्‍या आधी संपवतायत, हे पाहाण्‍याची जबाबदारी त्‍याची.

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

प्रत्‍येक वेळेला वेगळे कामगार वजनकाटा एका ढिगाकडून दुसर्‍या ढिगाकडे नेतात. सॅनिटाइझर किंवा एखादं निर्जंतुक करणारं औषध उपलब्‍ध झालं असतं, (या केंद्रांवर ते नसतंच), तरीही प्रत्‍येक वेळेला वजन काटा स्‍वच्‍छ करणं शक्‍य नाही, कारण त्‍यामुळे कामाला उशीर होणार.

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

कामगारांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे तो वेग. एक मिनिटाच्‍या आत ते चार ते पाच पोत्‍यांचं वजन करतात.

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

पोती शिवण्‍याची तयारी. हे काम एकट्याने करताच येत नाही. एक जण दोरीचं बंडल धरतो आणि दुसरा त्‍याचे योग्‍य लांबीचे तुकडे कापतो. 

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

ते पोती ओढतात, त्‍यांचं वजन करतात आणि मग ती रांगेत लावून ठेवतात. त्‍यामुळे पोती मोजणं सोपं जातं.

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

सर्व गट, म्हणजे ४० ते ५० जण मिळून दुपारपर्यंत ३,२०० पोती पाच ट्रक्‍समध्ये लादतात.

PHOTO • Harinath Rao Nagulavancha

प्रत्येक शेतकरी क्‍विंटलमागे ३५ रुपये हाताळणी शुल्‍क देतो. एकूण ३२०० पोत्‍यांचे ४४,८०० रुपये मिळतात. त्‍या दिवशी ज्‍यांनी काम केलं आहे, त्‍यांच्‍यात ते समान वाटले जातात. आज ज्‍याने काम केलंय, त्‍याला एका दिवसाच्‍या अंतरानंतरच पुन्‍हा कामाची संधी मिळते.

अनुवादः वैशाली रोडे

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

Harinath Rao Nagulavancha

हरिनाथ राव नागुलवंचा लिंबू वर्गीय फळांची शेती करतात आणि ते तेलंगणातील नलगोंडास्थित मुक्त पत्रकार आहेत.

Other stories by Harinath Rao Nagulavancha