रोज पहाटे, एक मशीनवर चालणारी देशी नाव ब्रह्मपुत्रेतील चालाकुरा चार बेटावरून निघते. दुधाने भरलेले प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमचे कॅन घेऊन या बोटी तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या धुबरी शहरात रोज पोचतात.

चालाकुरा चार ब्रह्मपुत्रेतल्या अनेक अस्थायी आणि रेतीने तयार झालेल्या बेटांपैकी एक. ( चार बेटांसंबंधी पारीवर अधिक वाचा वाळूचा किल्ला,‘चार’-निवासींचा संघर्ष) ही बोट दुपारी परत येते आणि अजून दूध घेऊन परत धुबरीच्या दिशेने निघते.

हे सगळं दूध दक्षिण आसामच्या धुबरी जिल्ह्यातल्या चार बेटावरच्या मोंडल कुटुंबाच्या डेअरीतनं येतंय. त्यांच्याकडे ५० दुभती जनावरं आहेत. रोज या डेअरीत १००-१२० लिटर दूध निघतं. “जेव्हा आमच्या दुभत्या गायी आणि म्हशी भरपूर दूध देत असतात तेव्हा तर दिवसाला १८०-२०० विटर दूध निघतं,” ४३ वर्षांचे तमेझुद्दिन मोंडल सांगतात. धुबरी शहरात दुधाला लिटरमागे ४० रुपये भाव मिळतो.

धुबरीचा दुग्ध व्यवसाय सरकारतर्फे एक यशोगाथा म्हणून नावाजला गेला आहे. प्रत्यक्षात मात्र या दुग्ध व्यावसायिकांची उपजीविका धोक्यात आली आहे, कारण – वैरणीची/पशुखाद्याची टंचाई

चालाकुरा चार च्या ७९१ कुटुंबांसाठी दुग्ध व्यवसाय हीच सर्वात मोठी उपजीविका आहे. जवळ जवळ प्रत्येक कुटुंबाकडची दुभती जनावरं दिवसाला ३०-४० लिटर दूध देतात. तमेझुद्दिनला या व्यवसायाचा प्रणेता म्हटलं तर वावगं ठरणार नाही – १० वर्षांपूर्वी ५,१५६ लोकसंख्या असणाऱ्या या छोट्या बेटावर सर्वप्रथम त्यानेच जास्त दूध देणाऱ्या संकरित गायी आणल्या. आता या बेटावर दुधाचा धंदा करणाऱ्या बहुतेकांकडे संकरित गायी आहेत. ही जनावरं शक्यतो बिहारच्या बाजारांमधून खरेदी करून आणली जातात आणि पशुवैद्यकांच्या मते बहुतेक वेळा जर्सी गाय आणि देशी गायींच्या संकरातून यांची निर्मिता झालेली असते.

“संकरित गायी आल्यामुळे दूध उत्पादन वाढलं आहे,” चार वरचे एक दूध उत्पादक, अन्वर हुसेन सांगतात. “संकरित गायी दिवसाला १३-१४ लिटर दूध देतात तर देशी गायी केवळ ३-४ लिटर. एका म्हशीचं दिवसाला १२-१६ लिटर दूध येतं [ चार वरच्या अनेकांनी म्हशीदेखील पाळल्या आहेत].”

संकरित गायींना आसामच्या काही भागांमधूनच मागणी आहे – आसामच्या २०१५-१६ आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ साली राज्यात संकलित झालेल्या ८७ कोटी ३० लाख लिटर दुधापैकी संकरित गायींपासून मिळालेल्या दुधाचा वाटा केवळ २४ कोटी ६० लाख लिटरच्या आसपास होता (राज्याला असणारी दुधाची आवश्यकता २४५ कोटी लिटर इतकी आहे).

Milk producers of char arriving at Dhubri town early in the morning
PHOTO • Ratna Bharali Talukdar

रोद सकाळी चालाकुरा चार वरचे दुग्ध व्यावसायिक धुबरीला दूध विकायला जातात. दुधाच्या धंद्यावर या बेटांवरची ७९१ कुटुंबं चरितार्थ भागवत आहेत

तमेझुद्दिन आता धुबरीचे प्रथितयश दूध उत्पादक म्हणून प्रसिद्ध झाले आहेत आणि इतर शेतकऱ्यांसाठी दुधाचा धंदा सुरू करण्याबाबत कार्यशाळांमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना आमंत्रित केलं जातं. ते ‘चालाकुरा मिलोन दुग्ध उत्पादक समोबय समिती’ या ५१ दुग्ध उत्पादकांच्या सहकारी संघाचे अध्यक्ष आहेत. चार बेटांवर असे इतर पाच संघ आहेत.

धुबरी जिल्ह्यातला दुग्ध व्यवसाय म्हणजे, निसर्गाने घर-दार धुऊन नेलं तरी त्यावर मात करणाऱ्या लोकांची यशोगाथा आहे, अशा रितीने सरकारतर्फे या व्यवसायाची भलामण केली जाते. मात्र या यशोगाथेमागचं वास्तव हे आहे की या व्यावसायिकांची उपजीविकाच धोक्यात आलेली आहे आणि कारण आहे – पशुखाद्य/वैरणीची टंचाई.

२०१६ पर्यंत केंद्राकडून रेशनवर राज्याला येणारा गहू स्थानिक पातळीवर कांडला जात होता आणि दुग्धव्यावसायिकांना ६०० रुपये क्विंटल अशा माफक दरात पशुखाद्य उपलब्ध करून दिले जात होते असं धुबरीचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी दिनेश गोगोई सांगतात. उदा. तमेझुद्दिनच्या कुटुंबाला दर महिन्याला २५ क्विंटल गव्हाचा कोंडा माफक दरात मिळत असे.

२०१५ च्या डिसेंबरमध्ये आसाम सरकारच्या विनंतीवरून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्याच्या अन्न वाट्यामध्ये पुढीलप्रमाणे बदल केले. अंत्योदय अन्न योजनेखाली (‘प्राधान्य’ विभागात) केवळ तांदूळ आणि राष्ट्रीय अन्न अधिकार कायद्याअंतर्गत (‘टाइड ओव्हर’ ? ‘अतिरिक्त’ विभागात) केवळ गव्हाची मागणी नोंदवण्यात आली. त्यानंतर आसामला ६१० रु प्रति टन दराने दर महिन्याला ८,२७२ टन आणि जुलै २०१६ नंतर ५,७८१ टन गहू मिळाला.

मात्र २०१६ डिसेंबरनंतर राज्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली काहीच गहू मिळालेला नाही. मंत्रालयाने राज्य सरकारला ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की “केंद्राच्या साठ्यामध्ये गव्हाची कमतरता असल्यामुळे भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे की अतिरिक्त विभागातल्या राज्यांना डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या काळात गव्हाच्या ऐवजी तितकाच तांदूळ पाठवण्यात येईल.”

Milk producers of char selling milk at Dhubri town
PHOTO • Ratna Bharali Talukdar

राज्य सरकारचं अनुदान मिळत नसल्यामुळे दूध उत्पादकांना बाजारात महाग किंमतीला पशुखाद्य विकत घ्यावं लागत आहे. “आत दुधाचे दर वाढले तरच आम्ही तग धरू शकू,” तमेझुद्दिन मोंडल म्हणतात.

तेव्हापासून चार वरच्या दूध उत्पादकांना अनुदानित पशुखाद्य मिळालेलं नाही, ऑगस्ट २०१७ मध्ये पुरादरम्यान मदत म्हणून मिळालेली काही वैरण एवढाच अपवाद. त्यामुळे आता ते खुल्या बाजारात थेट २००० रुपये क्विंटल इतक्या चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या पशुखाद्यावर अवलंबून आहेत.

यामुळे दुधाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. पण दुधाचा बाजारभाव मात्र ४० रुपये इतकाच आहे. “सध्याचे पशुखाद्याचे भाव पाहता दुधाचा दर ५० किंवा त्यापेक्षा जास्त वाढला तरच आम्ही तग धरू शकू,” तमेझुद्दिन म्हणतात.

तमेझुद्दिनचं ३५ सदस्यांचं एकत्र कुटुंब आहे. ते जमीर अली, ओमर अली, अब्दुल रहीम, अब्दुल कासम आणि नूर हुसेन या त्यांच्या पाच भावांसोबत डेअरीचं काम बघतात. या सगळ्यांची चूल आजही एकच आहे. त्यांची २ एकर शेतजमीन आहे जिथे घरच्या स्त्रिया वेगवेगळी पिकं घेतात. कुटुंबाचं रोजचं उत्पन्न दिसताना बरंच दिसतं पण त्यानं मिळणार नफा सहा कुटुंबांमध्ये विभागला जातो हे लक्षात घेतलं तर तो फारसा नाही हे कळून येतं.

“डेअरीच्या कामात फार कष्ट आहेत,” तमेझुद्दिन सांगतात. “संकरित गायींना नियमितपणे खायला घालावं लागतं. त्यांना पटकन रोग होऊ शकतात त्यामुळे त्यांची देखभाल करायला एक माणूसच त्यांच्यासाठी लागतो.” तमेझुद्दिन सांगतात की या भागात जनावराच्या डॉक्टरची मदत लगेच मिळत नाही कारण सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरेसे कर्मचारी नाहीत. जर रात्रीच्या वेळी तातडीने डॉक्टरांना बोलवायला लागलं तर २५०० ते ३००० रुपये देऊन बोट भाड्यावर घ्यावी लागते.

PHOTO • Ratna Bharali Talukdar

मोंडल कुटुंबाच्या डेअरीचं दिवसाचं दूध उत्पादन १००-१२० लिटर इतकं आहे. मात्र येणारा नफा ३५ सदस्यांच्या ६ कुटुंबांमध्ये विभागला जातो हे लक्षात घेता हाती फार काही लागत नाही

ब्रह्मपुत्रेतली सगळीच बेटं नाजूक स्थितीत आहेत आणि धूप होण्याचा त्यांना मोठा धोका आहे. पण चालाकुरावर (त्याचा अर्थच ‘स्थित्यंतर - हालता’ असा आहे) जमिनीची धूप जास्तच वेगाने होते. रेतीच्या बेटांची मजा अशी आहे की ती पाण्याने धुऊन गेली तर लगेचच जवळच नवीन बेट तयार होतं आणि लोक लगेचच नव्या बेटावर वस्ती करू शकतात. चालाकुरा चार चे आता पाच वेगवेगळे भाग आहेत. प्रत्येक भागाची लोकसंख्या १३५ ते १,४५२ इतकी आहे. इथल्या रहिवाशांना दर तीन किंवा चार वर्षांनी विस्थापित व्हावं लागतं. तमेझुद्दिनने आतापर्यंत १५ वेळा तरी आपला बिस्तरा इकडून तिकडे हलवला आहे.

चार च्या रहिवाशांचं आयुष्य अगदी भटक्यांसारखं आहे आणि कित्येक पिढ्या गेल्या दुधाचा धंदा त्यांच्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग बनला आहे. “एवढ्या अनिश्चित आणि अस्थिर आयुष्यामुळे आणि सततच्या विस्थापनामुळे आमच्या पूर्वजांनी उपजीविकेसाठी दुग्ध व्यवसायाची निवड केली,” तमेझुद्दिन सांगतात. “शेतातलं उभं पीक दर वर्षीच्या पुरात किंवा मातीची धूप झाल्यामुळे हातचं जाऊ शकतं. पण जनावरं अशी संपत्ती आहे की जी इकडून तिकडे नेता येऊ शकते. जेव्हा केव्हा आम्हाला आहे ते बेट सोडून जावं लागतं आम्ही नव्या चार वर जाताना सोबत घरची भांडीकुंडी आणि जनावरं घेऊन जातो. हे आपला ठिकाणा बदलत राहणं आमच्या आयुष्याचा भाग बनलंय.”

आधीच्या साली झालेल्या दुधाच्या कमाईतून कित्येक कुटंबांनी त्यांची गवताच्या छपरांची घरं बदलून नव्या पद्धतीची घरं घेतली आहेत. या घरांना पत्र्याच्या भिंती आणि छतं आहेत जी लाकडाच्या चौकटीत बसवली आहेत आणि ती इथून तिथे हलवायला सोपी असतात.

व्हिडिओ पहाः ‘धुबरीत दुधाला जो दर मिळतो त्याच्याहून जास्त पैशाला आम्हाला पशुखाद्य विकत घ्यावं लागतं,’ दूध उत्पादक सुकुरुद्दिन सांगतात

आजूबाजूच्या चार वरदेखील दुधाचा धंदा कमाईचं मुख्य साधन झाला आहे. दररोज प्रत्येक बेटावरून दुधाचे कॅन घेऊन एक तरी मशीन बोट धुबरीला दूध घालायला जाते. मात्र आता पशुखाद्याच्या, वैरणीच्या टंचाईमुळे दूध उत्पादकांना त्यांचा व्यवसाय चालू ठेवणं मुश्किल झालं आहे.

जिल्हा वशुवैद्यकीय अधिकारी गोगोई सांगतात की पशुधन आणि पशुवैद्यक खात्याने पशुखाद्याला पर्याय म्हणून हिरव्या चाऱ्याचं महत्त्व सांगण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. जनावरांच्या छोट्या मोठ्या आजारांवर उपचार करू शकणाऱ्या काही स्थानिकांनाही ‘गोपाल मित्र’ – दूधउत्पादकांचे मित्र म्हणून प्रशिक्षित करायचं ठरवलं आहे. “चालाकुरा चार वरच्या वेगवेगळ्या भागातून पाच जणांची निवड केली गेली आहे आणि त्यांचं प्रशिक्षण लवकरच पूर्ण करण्यात येईल,” गोगोई सांगतात.

दरम्यान बेटांवरून दुधाने भरलेल्या बोटींचा वेग जरा मंदावला आहे आणि चालाकुराचे शेतकरी त्यांच्या परिस्थितीत काही सुधारणा होईल याकडे डोळे लावून बसले आहेत.

Ratna Bharali Talukdar

Ratna Bharali Talukdar is a 2016-17 PARI Fellow. She is the executive editor of Nezine, an online magazine on India's North East. Also a creative writer, she travels widely in the region to cover various issues including migration, displacement, peace and conflict, environment, and gender.

Other stories by Ratna Bharali Talukdar
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale