१९५६ साली दसऱ्याच्याच दिवशी डॉ. आंबेडकरांनी सार्वजनिकरित्या हिंदू धर्म नाकारला. या महत्त्वाच्या घटनेविषयी आणि बुद्धाने संन्यास घेतला त्याविषयी जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी गातायत राधाबाई बोऱ्हाडे आणि वाल्हाबाई टाकणखार

“मला बाबासाहेब आंबेडकरांच्या गोष्टी आणि बौद्ध धर्माच्या शिकवण लई आवडते, बगा,” अनेक वर्षं शेतात मजुरी करणाऱ्या राधाबाई सांगतात. आम्ही एप्रिल २०१७ मध्ये त्यांना भेटलो तेव्हा त्या किराणा मालाचं छोटंसं दुकान चालवत होत्या.

वीस वर्षांपूर्वी जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी ज्या बायांनी ओव्या गायल्या होत्या त्यांना परत भेटण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्याच्या माजलगावला गेलो होतो. (पहा, माजलगावची गाणी, महूच्या आठवणी) माजलगावातल्या दलित वस्तीत, भीमनगरमध्ये राधाबाई रहायच्या. मात्र आम्ही त्यांना भेटायला गेलो त्याच्या काही दिवस आधीच त्यांनी माजलगाव तालुक्यातल्या सावरगावी मुक्काम हलवला होता.

गृहिणी असणाऱ्या वाल्हाबाई टाकणखार सांगतात, “माझ्या भावावर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव होता आणि तो दलितांच्या प्रश्नावर काम पण करतो...”

राधाबाईंच्या यजमानांना “हे सगळं काही आवडायचं नाही,” पण राधाबाई सांगतात, “त्यांनी मला प्रवास करायला साथ दिली. मग मी औरंगाबादला जाऊन अजंठा वेरुळच्या लेण्यांमधली [बौद्ध] शिल्पं पाहिली, महूला बाबासाहेबांच्या जन्मगावी गेले, नागपूरला दीक्षाभूमीला गेले.”

दर वर्षी, विजयादशमीच्या दिवशी, दसऱ्याला नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो, लाखोंचा दलित समुदाय लोटतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर दसऱ्याला सुष्टाचा दुष्टावर विजय साजरा केला जातो. याच दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला अशी कथा आहे. महाभारतामध्ये अर्जुनाने याच दिवशी कौरवांवर विजय मिळवला असं मानलं जातं. रामायणामध्ये याच दिवशी रामाने रावणाचा वध केला.

People gathering at Dikshabhumi
PHOTO • Sudarshan Sakharkar

डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म नाकारून बौद्ध धर्म स्वीकारला तो दिवस साजरा करण्यासाठी दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी देशभरातून हजारो, लाखो दलित बांधव नागपूरच्या दीक्षाभूमीला येतात. हा दिवस म्हणजे समाजातल्या वाईटाचा नाश आणि न्यायाचा विजय होत असल्याचं प्रतीक

पण नागपुरात मात्र दलित समाज एक वेगळाच विजय साजरा करण्यासाठी जमतो – आणि हे कुठलं पुराणातलं युद्ध नाही तर भारताच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरलेली घटना आहे ही. नागपूरला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. डॉ. आंबेडकरांनी दलितांवर होणाऱ्या भेदभावाविरोधात जो लढा दिला त्याची स्मृती जागवणारा हा दिवस आहे.

अॅनिहिलेशन ऑफ कास्ट - जाती निर्मूलन (१९३६) या पुस्तकात बाबासाहेब म्हणतात, “जात ही काही विशिष्ट धार्मिक धारणांमधून निर्माण झाली आहे, ज्या धारणांना शास्त्रांची [हिंदू धर्मशास्त्रं] मान्यता आहे.”

या धारणांपासून दूर जाण्याबद्दल ते लिहितातः “लोकांनी या शास्त्रांचा अर्थ कसा लावला आहे हे महत्त्वाचं आहे. बुद्धानी जी भूमिका घेतली तीच तुम्ही घेतली पाहिजे. गुरु नानकांनी जी भूमिका घेतली तीच तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही केवळ ही शास्त्रं नाकारून उपयोग नाही, तुम्ही त्यांचं वर्चस्व नाकारायलाच हवं, जसं बुद्ध आणि नानकांनी नाकारलं तसंच. तुमच्यामध्ये हिंदूंना त्यांच्या धर्मामध्ये काय चुकीचं आहे - म्हणजेच त्यांच्या धर्माने त्यांच्यामध्ये जातीला पवित्र मानण्याची संकल्पना रुजवली आहे – हे सांगण्याचं धाडस पाहिजे. तुम्ही असं धारिष्ट्य दाखवणार आहात काय?”

संघर्ष आणि संन्यास

या मालिकेमध्ये राधाबाई बोऱ्हाडे आणि वाल्हाबाई टाकणखार गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरच्या सात ओव्या गातायत. पहिल्या दोन ओव्यांमध्ये बुद्धाने त्याचा राजवाडा, सगळं वैभव आणि ऐहिक आयुष्य त्यागलं त्याबद्दल आहेत. पहिल्या ओवीत राधाबाई गातात वडील सिदुधनाच्या शेतात सोन्याचा नांगर चालतोय तरी गौतम बुद्ध वनात निघून गेलेत. दुसऱ्या ओवीत असं गायलंय की आई मायावती दुःखी आहे कारण तिचा राजपुत्र पत्नीला सोडून निघून गेलाय.
PHOTO • Samyukta Shastri

राधाबाई बोऱ्हाडेंच्या घरच्या बुद्ध आणि बाबासाहेबांच्या तसबिरींमधून त्यांची श्रद्धा व्यक्त होते

तिसरी ते सातवी ओवी बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेदाविरोधात दिलेल्या लढ्याबाबत आहे. तिसऱ्या ओवीत राधाबाई बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याबद्दल गातात. हिंदू धर्म आणि जात व्यवस्था नाकारून बाबासाहेबांनी रात्रीचा अंधारच जणू दूर केला आहे हे व्यक्त करण्यासाठी त्यांनी पौर्णिमेच्या रात्री जसं चांदणं अंगणात येतं त्याची उपमा दिली आहे.

चौथ्या ओवीमध्ये गायलंय की रणगाडा आलाय आणि त्याला एक ऐना किंवा आरसा आहे. पण भीम काही कुणाला घाबरत नाही आणि तो झेंडा रोवूनच राहणार. या ओवीचा अर्थ गहन आहे. रणगाडा बाबासाहेबांच्या ठाम निर्धाराचं आणि मूल्यांचं प्रतीक आहे, हा निर्धारच त्यांच्या संघर्षाचा पाया आहे. आणि त्यांच्या मूल्यांमध्ये मानवतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची ताकद आहे. रणगाड्याचा ऐना म्हणजे जातीभेदाचं वास्तव दाखवणारा आरसा आहे. पण भीमाला – डॉ. आंबेडकरांना कुणाचंच भय नाही. त्यांनी विचारांची लढाई जिंकलीये. आणि या संघर्षात विजयी होऊन ते विजयाचा झेंडा रोवणारच, त्यांना कुणीच थांबवू शकणार नाही असा याचा अर्थ होतो.

पुढच्या तिन्ही ओव्या जातीभेदाविरुद्ध लढा आणि जातीच्या बेड्या तोडण्याविषयीच संदर्भ येतात. पाचव्या ओवीत रणगाड्याला कासरा आणि बामण भीमाचा सासरा असं यमक जुळवलंय. बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता, ब्राह्मण होत्या, त्याचा हा संदर्भ.

सहावी आणि सातवी ओवी सविता आंबेडकरांविषयी आहे – बामणाच्या पोरीच्या वेणीला रिबिन बांधलीये, तिच्या वेणीला भोवरा आहे असं म्हणत पुढे त्या गातात, की भीमराव तुझ्या छंदी लागला आणि तू तुझ्या जातीत, ब्राह्मणाशी लग्न न करता एका दलिताशी, भीमरावाशी लग्न केलंस. आणि त्यांनी तुला थेट दिल्लीला नेलं – त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमानच यातून व्यक्त होतो.

जातीची उतरंड, समानतेची मागणी आणि शतकानुशतकं शोषण सहन केलेल्या लोकांच्या भावनाच या अशा ओव्यांमधून व्यक्त होतात.

बाई सोन्याचा नांगर सिदुधनाच्या रानात
सिदुधनाच्या रानात गौतम गेले वनात

मायावती माता म्हणी करमत नाही आज
बाई गौतम बुध्दानी सोडीला मायाचा झाज

बाई पोर्णिमेच्या राती चांदण अंगणात
चांदण अंगणात भीम गेले बुध्द धरमात

आला आला रणगाडा रणगाड्याला अईना
भीम कुणाला भेईना झेंडे लावीता राहीना

आला आला रणगाडा रणगाडेला कासरा
रणगाडेला कासरा बामण भीमाचा सासरा

अग बामणाचे मुली तुझ्या येणीला चींधी
भीम लाग तुझ्या छंदी तुला नेल दिलीमंदी

अग बामणाचे पोरी तुझ्या वेणीला भवरा
असा बामण सोडूनी भीम केलास नवरा


bāī sōnyācā nāṅgara sidudhanācyā rānāta
sidudhanācyā rānāta gautama gēlē vanāta

māyāvatī mātā mhaṇī karamata nāhī āja
bāī gautama budhdānī sōḍīlā māyācā jhāja

bāī pōrṇimēcyā rātī cāndaṇa aṅgaṇāta
cāndaṇa aṅgaṇāta bhīma gēlē budhda dharamāta

ālā ālā raṇagāḍā raṇagāḍyālā aīnā
bhīma kuṇālā bhēīnā jhēṇḍē lāvītā rāhīnā

ālā ālā raṇagāḍā raṇagāḍēlā kāsarā
raṇagāḍēlā kāsarā bāmaṇa bhīmācā sāsarā

aga bāmaṇācē mulī tujhyā yēṇīlā cīndhī
bhīma lāga tujhyā chandī tulā nēla dilīmandī

aga bāmaṇācē pōṭī tujhyā vēṇīlā bhavarā
asā bāmaṇa sōḍūnī bhīma kēlāsa navarā

PHOTO • Samyukta Shastri

कलावंत राधाबाई बोऱ्हाडे व वाल्हा टाकणखार

गाव – माजलगाव

वस्ती – भीम नगर

तालुका – माजलगाव

जिल्हा – बीड

व्यवसाय – शेतमजुरी करणाऱ्या राधाबाई आता किराणामालाचं एक छोटं दुकान चालवतात. वाल्हा टाकणखार गृहिणी आहेत.

जात – नवबौद्ध

दिनांक – या ओव्या २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड करण्यात आल्या. छायाचित्रं २ एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आली.

पोस्टर - ज्योती शिनोळी

अनुवादः मेधा काळे

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale