निवडणुका आणि मतदानाचा विचारही सी सुब्बलक्ष्मींच्या मनाला शिवणं शक्य नाही कारण पाण्याचे सहा हंडे एका वेळी नेता येईल अशी खास ढकलगाडी घेऊन त्या रस्त्याच्या पलिकडे घाईघाईत निघाल्या आहेत. त्यांच्या घराजवळच काही अंतरावर त्यांनी ही खास ढकलगाडी विकत घेतलीये. शेतात मजुरी करणाऱ्या सुब्बलक्ष्मींचे सगळं पाणी स्वतः डोक्यावर वाहून आणायचे कष्ट तरी त्यामुळे वाचतायत. “आम्ही पुरते गाळात गेलोय,” कुमारेड्डय्यापुरम गावच्या या रहिवासी म्हणतात.

४८ वर्षीय सुब्बलक्ष्मींना मतदान सोडून इतर गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतंय यालाही कारणं आहेत, पण त्यांचं गाव येतं ते थूथुकोडी इथे मात्र तमिळ नाडूतली सगळ्यात मोठ्या असामींमधली लढत रंगणार आहे. द्रविड मुन्नेत्र कळगम (द्रमुक) च्या एम. कन्निमोळी – दिवंगत डीएमके नेते एम. करुणानिधी यांची कन्या – आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष तमिळसाई सौंदराजन यांच्यात मुकाबला होणार आहे. २०१४ साली अण्णा द्रमुकच्या जयसिंग थ्यागराज यांनी द्रमुकच्या जगन पी. यांना हरवून ही जागा जिंकली होती.

१३ लाख मतदार असणाऱ्या या मतदारसंघाला विशेष महत्त्व मिळण्याचं दुसरं एक कारण म्हणजे गेल्या वर्षी थूथुकोडी इथे झालेल्या आंदोलनाला लागलेलं हिंसक आणि दुःखद वळण. अगदी २४ किमीवर असणाऱ्या कुमारेड्डय्यापुरममधल्या अनेकांनी त्याचे चटके सोसले आहेत.

१२ फेब्रुवारी २०१८ रोजी या गावातले सुमारे ३०० जण (वेदांता लि. चा एक उद्योग असणाऱ्या) स्टरलाइट कॉपर प्लांटच्या विस्तारीकरणाविरोधात निदर्शनं करण्यासाठी थूथुकोडीच्या मुख्य चौकात ठिय्या देऊन बसले. परवानगी दिलेल्या वेळेनंतरही आंदोलकांनी तिथून उठण्यास नकार दिला आणि कालांतराने त्यांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडली आणि २४ मार्च २०१८ रोजी सुमारे २ लाख लोक थूथुकोडीच्या रस्त्यावर उतरले. या भागातला स्टरलाइटच्या नव्या तांबे शुद्धीकरण प्रकल्पाचं बांधकाम थांबवण्यात यावं अशी मागणी घेऊन विविध पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या उद्योगात असणारे लोक एकत्र येऊन आंदोलन करत होते. सध्याच्या स्टरलाइट उद्योगामुळे त्यांचं पाणी, पर्यावरण विषारी झाल्याचं आणि त्यांच्या उपजीविका उद्ध्वस्त झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

Sterlite protest within the Kumareddiahpuram village which started in February 2018. The first photo has a black board which says 35th day of the protest on March 18, 2018
PHOTO • Kavitha Muralidharan

कुमारेड्डय्यापुरममध्ये, स्टरलाइट विरोधातलं आंदोलन फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू झालं आणि त्याचं रुपांतर थूथुकोडीमधील मोठ्या मोर्चांमध्ये झालं

निदर्शनांच्या शंभराव्या दिवशी, २२ मे रोजी पोलिसांनी आंदोलकांवर बेधुंद गोळीबार केला – त्यातल्या १४ जणांचा मृत्यू झाला. इतर १०० जण जखमी झाले. २८ मे रोजी, राज्य शासनाने स्टरलाइट कॉपर प्लांट बंद केला मात्र स्टरलाइटने तो परत सुरू व्हावा म्हणून कोर्टात धाव घेतली.

“हा प्रकल्प कायमचा बंद होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच घाणीत राहणार आणि निवडणुका वगैरेचा आम्हाला काही उपयोग नाही,” सुब्बुलक्ष्मी आम्हाला कुमारेड्डय्यापुरममध्ये सांगत होत्या. त्यांचं गाव थूथुकोडी जिल्ह्याच्या ओट्टपिडारम तालुक्यात येतं. आश्चर्याची बाब म्हणजे या गावातलं कुणीच जखमी झालं नाही – २१ मे रोजी रात्रा पोलिसांनी निदर्शनांसाठी ‘बंदी घातलेल्या’ तीनपैकी हे एक गाव. पण या प्रकाराने सगळेच भयभीत झाले आहेत.

यंदा तमिळ नाडूमध्ये छोट्या पातळीवर विधान सभा निवडणुका होतायत. लोक १८ एप्रिल (लोकसभा मतदानाचा दिवस) आणि १९ मे या दोन दिवशी २२ विधान सभा जागांसाठीही मतदान करणार आहेत. म्हणजेच २३४ सदस्य असणाऱ्या तमिळ नाडू विधानसभेच्या जवळ जवळ १० टक्के जागा. कुमारेड्डय्यापुरम ज्या मतदारसंघात येतं त्या ओट्टपिडरम (राखीव - अनुसूचित जाती) मतदार संघात १९ मे रोजी मतदान होणार आहे. ओट्टपिडरममध्ये पोटनिवडणूक घेण्याचं कारण म्हणजे इथले अण्णा द्रमुकचे आमदार आर. सुंदरराज यांना पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलं. आतापर्यंत केवळ द्रमुकने एम.सी. षण्मुगय्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

या २२ जागांचे निकाल काय लागतात त्यावर विधानसभेतलं बलाबल ठरणार आहे, सध्या सत्तेत असणाऱ्या अण्णा द्रमुककडे बहुमतासाठी तशाही दोन जागा कमी आहेत.

कुमारेड्डय्यापुरम आणि आसपासच्या गावांमध्ये असलेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे सुब्बुलक्ष्मी (शीर्षक छायाचित्रात) आणि त्यांच्यासारख्याच अनेकींना दिवसातला बराचसा वेळ मिळेल तिथून पाणी आणण्यात खर्च करावा लागतो. सत्य परिस्थिती अशी की या बाया जेव्हा ‘पिण्यासाठी बरं पाणी’ मिळावं म्हणून १० रुपये मोजत होत्या तेव्हाच स्टरलाइट मात्र त्यापेक्षा खूपच कमी दरात पाणी खरेदी करत होती. प्लास्टिकच्या एका हंड्यात २५ लिटर पाणी मावतं. “स्टरलाइट बंद झाल्यानंतरच या बायांना पिण्यासाठी जरा तरी बरं पाणी मिळणं शक्य झालं आहे,” पी. प्रभू सांगतात. “खेदाची बाब ही की बंद व्हायच्या आधीपर्यंत स्टरलाइटला १००० लिटर पाण्यासाठी फक्त १० रुपये मोजावे लागत होते.” प्रभू स्थानिक व्यावसायिक आहेत आणि आंदोलक आहेत. त्यांनीच मला या गावी सोबत नेलं.

Details of water procured by Sterlite
PHOTO • Kavitha Muralidharan
Details of water procured by Sterlite
PHOTO • Kavitha Muralidharan

स्टरलाइट उपसत असलेल्या पाण्याचे तपशीलः गावातल्या माणसाला २५ लिटरच्या हंड्यासाठी १० रुपये, स्टरलाइटला १० रुपयात १००० लिटर

औद्योगिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या थूथुकोडीमध्ये अनेक कुटिर उद्योग आहेत, उदा. सुपारीच्या पानाच्या वस्तू आणि शेंगदाणा चिक्की. ३०० उंबरा कुमारेड्ड्य्यापुरम वादग्रस्त कॉपर प्लांटच्या जवळ आहे. स्टरलाइटविरोधी निदर्शनांच्या हे गाव केंद्रस्थानी आहे. १९९८ मध्ये हा प्रकल्प इथे उभारण्यात आला आणि तेव्हापासूनच पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे आणि अनेक आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहिल्यामुळे स्थानिकांनी त्याच्याविरोधात निदर्शनं केली आहेत. स्टरलाइटने कायमच कामाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि २०११ पर्यंत मोठा काळ परवाना नूतनीकरण न करता प्रकल्प चालवल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. राष्ट्रीय पर्यावरण संसोधन संस्था आणि तमिळ नाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातही स्टरलाइटच्या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ पदार्थांमुळे भूजल, हवा आणि मातीचं प्रदूषण झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

कुमारेड्डय्यापुरमच्या गावकऱ्यांना जेव्हा समजलं की कॉपर प्लांटचं विस्तारीकरण करण्याचा घाट घातला जातोय, त्यांनी परत एकदा २०१८ मध्ये निदर्शनं करण्यास सुरुवात केली. त्यांचा आरोप आहे की या प्रकल्पाने त्यांचं गाव प्रदूषित केलंय आणि त्यामुळे अनेक आजार पसरतायत. “आमचं जगणं दिवसेंदिवस खराब होत चाललंय ते आम्ही पाहतोय. लोकांना वाटतं गावाकडचं आयुष्य किती छान असतं. तुम्ही एकदा कुमारेड्डय्यापुरमला या आणि इथे राहून पाह मग तुम्हाला खरं काय ते कळेल,” वेल्लई थाई या ५५ वर्षांच्या गृहिणी म्हणतात.

स्टरलाइटच्या जवळ राहिल्याने कर्करोग आणि जननासंबंधीच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. “तुम्हाला असं एकही घर सापडणार नाही जिथे कोणीही आजारी नाहीये. माझे स्वतःच्या आई-वडलांना इतक्या झपाट्याने म्हातारपण आल्यासारखं झालंय,” पी. महालक्ष्मी ही १७ वर्षांची विद्यार्थिनी सांगते.

आजही पाणी टंचाई इथली सर्वात मोठी अडचण आहे. कधीही पहा, त्यांच्या खास अशा ढकलगाड्या घेऊन बाया प्लास्टिकचे पाण्याचे हंडे घेऊन रस्ते पार करत चाललेल्या तुम्हाला दिसतील. “बरं पाणी मिळण्यासाठी आम्हाला १०-१२ दिवस वाट पहावी लागते. आणि पाणी आणण्यासाठी आम्हाला लांब जावं लागतं – एक किलोमीटर किंवा जास्त. अशा सहा खेपा करणं काही आम्हाला शक्य नाही. म्हणून ही ढकलगाडी,” शेतमजूर असणाऱ्या ५० वर्षांच्या कृष्णी लीलावती सांगतात.

राज्याच्या केवळ याच भागात दिसणाऱ्या ढकलगाड्या थूथुकोडी शहरात तयार होतात आणि गावात आणून विकल्या जातात. “एका गाडीला २,५०० रुपये मोजावे लागतात, इथे कुमारेड्डय्यापुरममध्ये आणून देण्याचे वरचे ३०० रुपये,” लीलावती कुरकुरत सांगतात.

Krishna Leelavathi, resident of Kumareddiahpuram
PHOTO • Kavitha Muralidharan
Akila, a villager with the trolley
PHOTO • Kavitha Muralidharan

शेतमजूर असणाऱ्या कृष्णा लीलावती (डावीकडे) आणि अकिला (उजवीकडे): ‘आम्ही सहा खेपा नाही करू शकत, म्हणून ही ढकलगाडी’

इथनं जवळच असलेल्या थूथुकोडीच्या योगीश्वर कॉलनीत बाया फक्त पाणी आणण्यासाठी म्हणून सायकल चालवायला शिकल्या आहेत. “या भागात सुमारे १०० कुटुंबं राहतात आणि आम्हाला किमान ५० वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावतीये. आमच्यातली एकही जण अशी नाही जिला सायकल चालवता येत नाही. आम्हाला पाणी आणायला किमान २ किमी प्रवास करायला लागतो आणि शहरामध्ये इतकी वर्दळ असताना ते फक्त सायकलवरच शक्य आहे. तरीसुद्धा इतकं पाणी आणण्याचा आमच्या तब्येतीवर परिणाम होतोच,” थूथुकोडीची रहिवासी आणि मजुरी करणारी ४० वर्षीय सरस्वती सांगते.

शासनाने स्टरलाइटचा प्रकल्प बंद करून वर्ष उलटलं तरी कुमारेड्डय्यापुरमचे रहिवासी मात्र भीती आणि चिंतेतच जगतायत. “आम्ही खूप भोगलंय, काहीही करून हा प्रकल्प पुन्हा सुरू व्हायला नाही पाहिजे,” वेल्लई थाई म्हणतात. स्टरलाइट प्रकल्प सुरू करण्यासाठी न्यायालयातून परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे याची गावकऱ्यांना कल्पना आहे.

आणि त्यामुळेच निवडणुकांच्या उत्साहापेक्षा जास्त सगळ्यांच्या मनात स्टरलाइट प्रकल्प पुन्हा सुरू होण्याच्या भीतीचं सावट आहे. “निवडणुका होवो किंवा राहोत, आमची एकच मागणी आहे – स्टरलाइट कायमचा बंद करा,” वेल्लई थाई म्हणतात.

कुमारेड्डय्यापुरममध्ये स्टरलाइटचा मुद्दा पुलवामा, बालाकोट किंवा ऑगस्टा अथवा राफाल सौद्यापेक्षा किती तरी मोलाचा आहे. “आमची मतं मागायला इथे कुणी पण आलेलं नाही, पण जोपर्यंत आम्हाला स्टरलाइट कायमचा बंद होणार असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत आम्हीदेखील मत द्यायला जाणार नाही,” लीलावती म्हणतात.

मतदानावर बहिष्कार टाकायचा का जो स्टरलाइट बंद करण्याचं वचन देईल त्याला मत द्यायचं, या छोट्या गावात अनेक पर्यायांवर खल सुरू आहे. वेल्लई थाईंनी ठरवलंय. “आम्हाला मोदी परत यायला नकोय.”

“गोळीबारात एवढी १४ माणसं मारली गेली, त्यांनी आमच्याबद्दल चकार शब्द उच्चारला नाही,” शेतमजूर असणारे ५५ वर्षीय पी. पोनराज सांगतात. “स्टरलाइट मारतंय, पण सावकाश तरी मारतंय.”

गेली २५ वर्षं या एका मुद्द्याचं सावट त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या उपजीविकांवर पडलंय तरीही, सुब्बुलक्ष्मी म्हणतात, “एवढं सगळं घडून गेलंय तरी या राजकारण्यांना वाटतं आम्ही त्यांना मत देऊ. आम्हाला मात्र हा लढा असाच चालू ठेवावा लागणार आहे, आमच्यासाठी जरी नाही तरी आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी तरी नक्कीच.”

“इथे येऊन मत मागायची त्यांची हिंमत तरी कशी होते?” शेतमजूर असणारे ४६ वर्षीय वेलू थाई खडा सवाल करतात. “त्यांना जर आमच्या आयुष्यांपेक्षा, आमच्या पोटापेक्षा स्टरलाइट जास्त महत्त्वाची वाटत असेल तर त्यांच्या लेखी आम्ही माणसं तरी आहोत का, ही निवडणुका घ्यायची सोंगं तरी कशाला?”

अनुवादः मेधा काळे

Kavitha Muralidharan

Kavitha Muralidharan is a Chennai-based independent journalist and translator. She was earlier the editor of 'India Today' (Tamil) and prior to that headed the reporting section of 'The Hindu' (Tamil). She is a PARI volunteer.

Other stories by Kavitha Muralidharan
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale