शाहूबाईंच्या ओव्या अविस्मरणीय होत्या आणि त्यांचा आवाज अप्रतिम होता. पारीवर सादर करण्यासाठी ओव्यांच्या संग्रहांमधली ध्वनीमुद्रणं ऐकताना आमच्या हाती या ओव्या लागल्या.

११ सप्टेंबर २०१७ ला आम्ही जेव्हा पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या नांदगावला गेलो तेव्हा आम्हाला शाहूबाईंना भेटायचं होतं. जात्यावरच्या ओव्या प्रकल्पात अगदी सुरुवातीपासून सहभागी असलेले आणि आमच्यासोबत येणारे जितेंद्र मैड यांनी आम्ही नांदगावला जायच्या काही दिवसच आम्हाला सांगितलं की शाहूबाई एक वर्षांपूर्वीच वारल्या. आम्ही मनोमन निराश झालो. आता त्यांच्या घरी त्यांचे पती, दोन मुलं आणि सुना आणि नातवंडं असतात. त्यांच्याकडे आम्हाला फक्त त्यांचा एक फोटो काय तो पहायला मिळाला.

PHOTO • Samyukta Shastri

संपूर्ण कुटुंब एका चौकटीत – डावीकडून उजवीकडेः धाकटी सून पौर्णिमा कांबळे, मुलगा संजय, शालूबाईंची मैत्रीण कुसुम सोनवणे, थोरली सून सुरेखा, सोबत तिची मुलगी प्रतीक्षा, नातसून रजनी, शालूबाईंचे पती नामदेव आणि नातू सक्षम आणि प्रतीक

कुसुमताई सोनवणे, ज्यांच्या ओव्या पारीवर सादर करण्यात आल्या आहेत (१५ मार्च २०१७), जळू जळू तरुणपण, सारा दोष उभारीचा, तरण्या मुलीचा, नांदगावमध्येच राहतात. त्या म्हणाल्या, “शाहू आणि मी मैत्रिणी होतो. आम्ही कोळवणला एकत्रच शाळेत जायचो. पण आम्ही फक्त पहिलीच शिकलो.” त्या दोघींचं नातंही लागतं. शाहूबाईंचे पती कुसुमताईंचे भाऊ लागतात. मैत्रिणी म्हणून आणि अगदी बहिणींसारख्या त्या एकत्र असायच्या. उखळात धान्य कांडताना त्या जुन्या गळ्यांचा सराव तर करायच्याच पण नवनव्या चालीही तयार करायच्या. याच चाली किंवा गळे नंतर जात्यावर दळणं करताना ओव्यांमध्ये उतरायचे. “आम्ही प्रत्येक जण एकेक किलो तांदूळ किंवा डाळी आणायचो आणि मग एकत्र दळणं करत ओव्या गायचो,” कुसुमताई सांगतात.

जात्यावरच्या ओव्यांच्या संग्रहात शाहूबाईंनी गायलेल्या एकूण ४०१ ओव्या आहेत, त्यातल्या सुमारे १७० ओव्यांचं ध्वनीमुद्रण झालं आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातल्या स्त्रियांनी गायलेल्या एकूण १,१०,००० ओव्यांपैकी या काही ओव्या. आता या ओव्या पारीवर प्रसिद्ध होत आहेत. आणि पारीची टीम यातल्या अनेक गावांना पुन्हा भेटी देत आहे, या कलावंत स्त्रियांना भेटत आहे, फोटो आणि व्हिडिओ गोळा करत आहे.

या मालिकेत दसऱ्यावरच्या तीन ओव्या आहेत. दसऱ्याचा दिवस म्हणजे नवरात्र संपल्यानंतरचा दहावा दिवस. चांगल्याचा वाईटावर विजय, जेव्हा दुर्गेने महिषासुराचा अंत केला तो दिवस. महाभारतामध्ये असं म्हटलंय की पांडवांचा एक वर्षाचा वनवास याच दिवशी संपला. रामायणामध्ये याच दिवशी रामाने रावणाचा वध केला असंही मानलं जातं.

दसऱ्याच्या दिवशी आणि इतरही काही हिंदू सणांच्या दिवशी घरच्या स्त्रिया सणाच्या रितीनुसार, घरच्या पुरुषांचं औक्षण करतात. हातातल्या ताम्हणात, फुलं, कुंकू आणि निरंजन असतं. घरचा पुरुष पाटावर किंवा चौरंगावर बसतो, सुवासिनी त्याच्या कपाळावर टिळा लावते, त्याला ओवाळते. लहान मुलांचंही औक्षण केलं जातं आणि कधी कधी स्त्रियांचंही.

Marigold flowers
PHOTO • Namita Waikar

इथल्या पहिल्या ओवीत शालूबाई म्हणतायत, की दसऱ्याच्या दिवशी माझं पुजेचं ताट जाळीच्या कापडाने झाकलेलं आहे. ती तिच्या मुलीला म्हणते, चल तुझ्या मामाला ओवाळूया. दुसऱ्या ओवीत ती गाते, तिच्या ताटात कुंकू आहे आणि ती तिच्या बहिणीला किंवा शेजारणीला म्हणतीये, चल आपल्या सूर्यासारख्या तेजस्वी भावाला ओवाळूया. तिसऱ्या ओवीमध्ये ती म्हणते, दसऱ्याच्या आजच्या सणाला माझ्या ताटामध्ये झेंडू आहे आणि माझ्या भावाला मी ओवाळणार आहे.

महाराष्ट्रात आणि देशाच्या इतरही काही राज्यांमध्ये सणासुदीला घराला, दुकानांना, कारखाने किंवा कचेऱ्यांना झेंडूची तोरणं लावण्याची प्रथा आहे. खरं तर ही फुलं इथली स्थानिक फुलं नाहीत. असं म्हणतात की भारतात सुरुवातीला आलेल्या पोर्तुगीज व्यापारी आणि वसाहती स्थापन करणाऱ्यांनी ब्राझीलहून झेंडू युरोपात नेला आणि तिथनं तो त्यांच्यामार्गे भारतात आला, तोही १६व्या शतकात. कालांतराने भारतभर सणासुदीला वैभव आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून झेंडू वापरला जाऊ लागला. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात झेंडूची शेती केली जाते. वर्षातून चारदा झेंडूचं पीक येतं. 

अशी दसर्याच्या दिशी माझ्या ताटामंदी जाळी
सांगते माझ्या बाई आपण ववाळू मामा आळी 

अशी दसर्याच्या दिशी माझ्या ताटामंदी कुकू
सांगते ग माझ्या ना बाई आपण ववाळू सुर्यमुखू

अशी दसर्याच्या दिशी माझ्या ताटामंदी झेंडू
सांगते माझ्या बाई आपण ववाळू आपला बंधू

aśī dasaryācyā diśī mājhyā tāṭāmandī jāḷī
sāṅgatē mājhyā bāī āpaṇa vavāḷū māmā āḷī       

aśī dasaryācyā diśī mājhyā tāṭāmandī kukū
sāṅgatē ga mājhyā nā bāī āpaṇa vavāḷū suryamukhū

aśī dasaryācyā diśī mājhyā tāṭāmandī jhēṇḍū
sāṅgatē mājhyā bāī āpaṇa vavāḷū āpalā bandhū

On Dussehra day, there is a lacy scarf in my platter

I tell you, my daughter, let’s felicitate your maternal uncle [with an oil lamp]

On Dussehra day, I have kunku in my platter
I tell you, O woman, let’s felicitate [our brother] who is like the sun 

On Dussehra day, I have marigold flowers in my platter
I tell you, O woman, let’s felicitate our brother [with an oil lamp]

Framed photo of Shahu Kamble with garland
PHOTO • Samyukta Shastri


कलावंत: शाहूबाई कांबळे

गाव: नांदगाव

तालुका: मुळशी

जिल्हा: पुणे

जात: नवबौद्ध       

वय७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं)               

मुलं: २ मुलगे आणि २ मुली   व्यवसाय: शेती

दिनांक: या ओव्या ५ ऑक्टोबर १९९९ रोजी ध्वनीमुद्रित करण्यात आल्या. छायाचित्रं ११ सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात आली.

फोटो: नमिता वाईकर व संयुक्ता शास्त्री

पोस्टरः ज्योती शिनोळी

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

पारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम: आशा ओगले, जितेंद्र मैड, बर्नार्ड बेल, नमिता वाईकर

Other stories by PARI GSP Team