जाट अयूब अमीन, त्यांच्या समुदायातल्या इतरांसारखंच, आपण समाधानी असल्याचं म्हणतात. “आम्ही दारू पीत नाही आणि इतरांच्या संपत्तीचा लोभ धरत नाही, आम्ही आमच्या म्हणण्याने चालतो आणि आणि आमच्या तालावर पावलं टाकतो.”

मी जाट अयूब आणि इतर मालधारींनी भूजच्या एका धूळभरल्या रस्त्यावर भेटलो, त्याला आता दोन वर्षं उलटून गेली आहेत. मालधारी कच्छमधले भटके पशुपालक आहेत – गुजरातीमध्ये ‘माल’ म्हणजे प्राणी (शब्दशः माल किंवा सामान) आणि ‘धारी’ म्हणजे पाळणारा. त्यांच्या कळपांमध्ये असतात उंट, मेंढरं, बकरी, म्हशी आणि गायी.

अनेक मालधारी समुदाय मार्च-एप्रिल दरम्यान, उन्हाळा सुरू होण्याआधी, हिरव्या चाऱ्याच्या शोधात चारणीला बाहेर पडतात. जुलै-ऑगस्टमध्ये, पावसाळा सुरू झाल्यानंतर ते गावी परततात. त्यांच्याकडच्या पशुधनाप्रमाणे त्यांचा भटकंतीचा हंगाम बदलतो. पण ते सगळे तगून आहेत कारण ते भटकतायत.

कच्छचे तीन प्रमुख मालधारी समुदाय म्हणजे जाट, रबारी आणि सामा. काही हिंदू (रबारी) आणि काही मुस्लिम आहेत (जाट, सामा), पण सगळ्याच समुदायांमध्ये चांगले ऋणानुबंध आहेत आणि भटक्या जगण्याचा समान दृष्टीकोन.

या वैशिष्ट्यपूर्ण मालधारींची छायाचित्रं काढणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. उंचावरच्या प्रदेशात राहणाऱ्या पशुपालकांचे सामाजिक आकृतिबंध साधे-सरळ असतात, पण कच्छमध्ये मात्र हे गुंतागुंतीचं आहे आणि ते समजून घ्यायला बराच वेळ लागतो – उदाहरणार्थ जाटांमध्येच चार पोट-भेद आहेत – फकिरानी, हाजियानी, दानेता आणि गरासिया जाट. यातले काही जण बऱ्याच वर्षांपूर्वी स्थायिक झाले आणि गायी-म्हशी पाळू लागले. केवळ फकिरानींकडेच उंट असतात आणि एकटे तेच वर्षभर आपल्याच तालुक्यामध्ये भटकंती करत असतात.

“जे लोक संत सावला पिराचे अनुयायी असतात, त्यांना फकिरानी जाट म्हणतात,” वयस्क अध्यात्मिक गुरू आणि समुदायात मोठा मान असणारे फकिरानी जाट असलेले आगा खान सावलानी सांगतात. सावलानी मला सांगतात की इ. स. १६०० मध्ये सावला पिराने देवीदास रबारी नावाच्या एका इसमाला एक उंट भेट दिला – आणि त्यानंतर रबारींनी खराई उंट पाळायला सुरुवात केली, आणि आजही त्यांच्यासाठी ते मौल्यवान आहेत.

फकिरानी जाट पुराणमतवादी आहेत आणि त्यांना कॅमेऱ्याचं वावडं आहे. ते त्यांच्याकडे आल्यागेल्यांना उंटिणीच्या दुधाचा चहा पाजतात मात्र त्यांचे फोटो काढत राहणं त्यांना अजिबात मान्य नाही. मी ज्या ज्या कुटुंबांना भेटलो त्यांनी त्यांचं रोजचं जगणं कॅमेऱ्यात पकडण्याची माझी कल्पना साफ धुडकावून लावली.

आणि मग माझी भेट झाली कच्छच्या भचाऊ तालुक्यातल्या जाट अयूब अमीन या साध्या भोळ्या फकिरानी जाट इसमाशी. ते त्यांच्या कुटुंबासोबत, पत्नी खातून, बहीण हसीना आणि उंटांचा कळप घेऊन भटकंती करतात. २०१६ च्या सुरुवातीला, त्यांनी त्यांच्या आयुष्यात मला प्रवेश दिला, माझ्या कॅमेऱ्यासह.

इथले जाट समुदाय प्रामुख्याने कच्छी बोलतात, पण ५५ वर्षीय अमीन अस्खलित हिंदी बोलतात, जी आकाशवाणी ऐकून अवगत झाल्याचं ते सांगतात. इतर अनेक फकिरानी जाटांसारखं अमीन आणि त्यांचं कुटुंब पाखांमध्ये (नरकुल, रस्सी आणि लाकडाची खोप) राहत नाहीत. ते खुल्या आभाळाखाली उघड्यावर झोपतात.

फकिरानी जाट दोन जातीचे उंट पाळतात, खराई आणि कच्छी. पण अयूब यांच्याकडे मात्र केवळ खराई उंटच आहेत. या उंटांच्या आहारासाठी खारफुटी फार गरजेची असल्यामुळे अयूब यांना सतत तिच्या शोधात भटकावं लागतं. मात्र किनारी प्रदेशातली जंगलतोड आणि वाढत्या उद्योगांमुळे अब्दासा, लखपत आणि मुंद्रा प्रदेशात खारफुटी कमी कमी होत चालली आहे. खरं तर १९८२ साली वन विभागाने हे किनारे संरक्षित प्रदेश म्हणून घोषित केले होते. तसंच अयूब गांडो बावड (विलायती बाभूळ) नावाच्या झुडपांचं प्रमाणही वाढत असल्याचं सांगतात. ही झाडं या प्राण्यांना लागणारं गवत आणि इतर वनस्पती वाढू देत नाहीत.

या सगळ्या समस्या असल्या तरीही अयूब अमीन, त्यांच्या समुदायांच्या इतर अनेकांसारखेच आपण आनंदी असल्याचं सांगतातः “दिवसाच्या शेवटी आमच्याकडे रोटी आणि उंटिणीचं दूध आहे. ते घ्यायचं आणि ताणून द्यायचं.”

PHOTO • Ritayan Mukherjee

चारी-धांद या राखीव पाणथळ प्रदेशाजवळून जात असलेलं फकिरानी जाट कुटुंब. इतर मालधारी कुटुंबं ठराविक हंगामात भटकंती करतात, पण फकिरान जाट मात्र वर्षभर कच्छमध्ये हिंडत असतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

खारी रोहर इथे, नुकत्याच जन्मलेल्या खराई उंटाच्या पिलाचा प्रेमाने मुका घेणारे जाट अयूब अमीन. अयूब कच्छच्या भचाऊ तालुक्यातले आहेत आणि यंदा त्यांच्याकडे १००-११० उंट आहेत.

PHOTO • Ritayan Mukherjee

जाट अमीन खातून भचाऊ तालुक्यातल्या चिराई मोती गावात एका चरणाऱ्या उंटाला हाकताना

जाट हसीना पाण्याच्या शोधात आपल्या उंटांच्या कळपासह. भर उन्हाळ्यात, पाणी आणि अन्नाचं एवढं दुर्भिक्ष्य असतं की या कुटुंबाला जवळ जवळ एका आड एक दिवस आपला मुक्काम हलवावा लागतो

PHOTO • Ritayan Mukherjee

आगा खान सावलानी सूर्यास्तापूर्वी नमाज अदा करण्याची तयारी करतात. सावलानी अध्यात्मिक गुरू आहेत आणि फकिरानी जाट समुदायातले जाणते आहेत. ते लखपत तालुक्यातल्या पिपर गावी राहतात

PHOTO • Ritayan Mukherjee

उन्हाळ्या आधी शक्यतो एकदा किंवा दोनदा उंटांना भादरतात – हे पशुपालक कात्रीच्या सहाय्याने उंटांच्या त्वचेवर स्वतःच अतिशय सुंदर नक्षीकाम करतात

PHOTO • Ritayan Mukherjee

उंटिणीच्या दुधासोबत रोटलो (गहू आणि बाजरीच्या पिठाची जाड रोटी) आणि चहा हे फकिरानी जाट कुटुंबांचं रोजचं जेवण. पूर्ण वाढ झालेली दुभती उंटीण रोज १०-१२ लिटर दूध देऊ शकते

PHOTO • Ritayan Mukherjee

बन्नीच्या कुरणांमध्ये भरणाऱ्या ‘सौदर्य’स्पर्धांसाठी उंट सजून तयार होतोय. त्यांना सजवण्यासाठी जाट उंटांच्या त्वचेसाठी घातक नसणारे मेंदी आणि इतर नैसर्गिक रंग वापरतात

PHOTO • Ritayan Mukherjee

भारत-पाकिस्तान सीमेच्या जेवळ कच्छच्या मोहाडी गावातल्या विहिरीवर खराई उंट पाणी पितायत

PHOTO • Ritayan Mukherjee

चरता चरता खाली कोसळलेल्या एका गाभण उंटिणीला बाहेर काढण्याची धडपड करणारे जाट अयूब अमीन. खारफुटीच्या वनांमध्ये काही ठिकाणी जमीन इतकी भुसभुशीत असते की जर त्यात उंट फसला तर त्याला आपल्या आपण उभं राहता येत नाही. आणि जर का एखादा उंट दोन तासाहून जास्त आडवा झाला तर त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. (या प्रसंगात आम्ही तिघं मिळून ४५ मिनिटांत या उंटिणीला उभं करू शकलो)

PHOTO • Ritayan Mukherjee

फकिरानी जाट समुदायात लहान मुलंदेखील आपल्या पालकांबरोबर भटकंती करतात आणि लहान वयातच चारणीची कौशल्यं शिकतात

PHOTO • Ritayan Mukherjee

उन्हाळ्यात उठलेल्या वावटळीतून वाट काढणारा फकिरानी जाट समुदायाचा हा लहानगा

व्हिडिओ पहाः जाट अयूब अमीनः ‘मी सगळीकडे जाऊन आलोय...’

मालधारींबरोबर काम करणाऱ्या भूजस्थित सहजीवन या स्वयंसेवी संस्था आणि न्यासाचे मनःपूर्वक आभार आणि कच्छच्या भटक्या जीवनाशी माझी ओळख करून देणाऱ्या हार्दिका दायलानी या माझ्या सहाध्यायी मैत्रिणीचेही आभार.

अनुवदाः मेधा काळे

Ritayan Mukherjee

Ritayan Mukherjee is a Kolkata-based photographer and a PARI Senior Fellow. He is working on a long-term project that documents the lives of pastoral and nomadic communities in India.

Other stories by Ritayan Mukherjee
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale