सत्तर वर्षं शेतात मजुरी केल्यानंतर, वयाच्या ८३ व्या वर्षी गंगप्पांनी स्वतःला महात्मा गांधींचं रुप दिलंय. ऑगस्ट २०१६ पासून ते गांधींचं सोंग घेऊन पश्चिम आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर शहरात वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात. शेतात मजुरी मिळायची त्यापेक्षा यातून मिळणारी भीक जास्तच आहे.

“मी तुमच्या वयाचा झालो, की तुमच्यासारखेच कपडे घालीन, स्वामीजी,” अनंतपूरला गांधीजी आले तेव्हा लहानग्या गंगप्पांनी त्यांना असं सांगितल्याचं त्यांना स्मरतं. “माझे आई-वडील तेव्हा पेरूरू तलावावर मजुरी करत होते, त्यांच्यासोबत होतो मी.” गंगप्पांचा जन्म झाला ते चेन्नमपल्ली पेरूरूहून फार दूर नाही. ध्येय गाठण्याची त्यांची क्षमता, मोठ्या मोठ्यांना कह्यात आणण्याची त्यांची ताकद त्या वेळी गंगप्पांना भावली होती.

गंगप्पा खरंच गांधीजींना भेटले होते का किंवा कधी भेटले हे पडताळून पाहणं अवघड असलं तरी गांधीजींच्या त्या स्मृतीने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. गंगप्पांना प्रवास करायला आवडतं – गांधी बनायचं असेल देशाटन आणि चिकाटी आवश्यकच, त्यांचा विश्वास आहे.

गंगप्पा (ते आडनाव लावत नाहीत) म्हणतात आता त्यांचं नाव गंगुलप्पा झालंय कारण लोक चुकीने त्यांना तसंच बोलावतात. गांधीजींचं सोंग हुबेहूब वठावं यासाठी ते जानवं घालतात. कपाळावर आणि पावलांवर टिळा लावतात आणि कधी कधी ‘भटा’सारखा गांधींच्या वेशात असताना लोकांना हात उंचावून आशीर्वाद देतात.

त्यांनी ही नवी ओळख धारण केल्यामुळे गावातल्या देवळाची दारं त्यांना खुली झाली आहेत. दिवसा त्यांना देवळातल्या चौथऱ्यावर विश्रांती घ्यायची परवानगी मिळाली आहे. देवळातल्याच नळावर ते स्नान करतात आणि अंगाचा रंग उतरवतात.
PHOTO • Rahul M.

गंगप्पांच्या वेशांतरामुळे त्यांच्यासाठी नवी दारं खुली झाली आहेत

गेल्या दहा वर्षांपासून गंगप्पा आणि त्यांच्या पत्नी मिड्डी अंजनम्मा व त्यांच्या कुटुंबामधले संबंध बिघडले आहेत. त्यांच्या थोरल्या मुलीने जीव दिल्यापासून हे असंच सुरू आहे. “मी कोलापल्लीला जंगलामध्ये खड्डे खंदायला गेलो होतो. मी घरी परतलो, तर माझी लेक मरण पावली होती,” ते सांगतात. लेकीच्या आठवणीने डोळ्यातून अश्रू ओघळतात. “आजही मला समजलेलं नाही, की ती का गेली ते. कुणीच मला सांगत नाहीये, ती का मेली ते. असं असताना मी त्या घरी कसा काय जाणार सांगा?”

गेली दोन वर्षं अंजनम्मा गंगप्पांशी बोलल्या नाहीयेत, आणि त्यांचा लहरी स्वभाव त्यांना मुळीच आवडत नाही. मात्र त्यांची कमी त्यांना भासतीये आणि त्यांनी परत यावं असं त्यांना वाटतं. “कृपा करा आणि त्यांना माघारी बोलवा. माझ्याकडे काही मोबाइल फोन नाही, साधी महिन्याची कॉफी पूड घ्यायला पण पैसे नाहीयेत. ही पोरं [नातवंडं] मला पैसे मागतात, त्यांना द्यायला पण माझ्याकडे पैसे नसतात.” अंजनम्मा त्यांच्या धाकट्या लेकीबरोबर अनंतपूरहून १०० किलोमीटरवर गोरंतला नावाच्या गावी राहतात. मी तिथेच त्यांची भेट घेतली.

PHOTO • Rahul M.

गंगप्पांच्या पत्नी, मिड्डी अंजनम्मा, डावीकडून तिसऱ्या, त्यांच्या कुटुंबासोबत. त्या गंगप्पांसोबत राहत नाहीत 

गंगप्पांनी घर सोडलं, तरी त्यांनी रानात मजुरी करणं थांबवलं नाही. दारूचं प्रमाण वाढतच गेलं. २०१६ मध्ये रानात काम करत असताना ते चक्कर येऊन पडले. “माला पुन्नमी [वार्षिक सण] नंतर मी रानात काम करणं थांबवलं,” गंगप्पा आठवून सांगतात. “काही दिवस मी दोर वळले, पण त्यातनं फार पैसे सुटत नव्हते.”

तेव्हाच कधी तरी त्यांच्या मनातली गांधींची आठवण जागृत झाली आणि त्यांनी नवा अवतार घ्यायचं ठरवलं.

गंगप्पांनी रोजच्या वापरातल्या साध्या साध्या गोष्टींमधून गांधीचां वेश तयार केला आहे. महात्मा गांधींचं ‘तेज’ येण्यासाठी ते १० रुपयाची पॉण्ड्स पावडर वापरतात. रस्त्यावरच्या टपरीतला स्वस्तातला चष्मा, गांधींचा चष्मा बनतो. गावातल्या बाजारातली १० रुपयाची साधी काठी गांधीजींची काठी होते. कुठे तरी सापडलेला मोटरसायकलचा आरसा आपला वेश आणि रंगरंगोटी ठीक आहे ना पाहण्यासाठी कामी येतो. 

PHOTO • Rahul M.

डावीकडेः गंगप्पा कमाईसाठी वेगवेगळ्या गावांतल्या जत्रा आणि बाजारांना जातात. उजवीकडेः कुठे तरी सापडलेला मोटरसायकलचा आरसा वेशभूषा आणि रंगरंगोटी पाहण्या कामी येतो

रानात काम करत असताना गंगप्पा शक्यतो आखूड चड्डी घालायचे. “आता मी धोतर नेसतो आणि ३-४ दिवसातून एकदा डोकं भादरून येतो,” ते सांगतात. खरं तर ते बिड्या ओढतात, दारू पितात. पण गांधींचं रूप घेतलं की सगळं वर्ज्य. ते आसपासच्या गावांमधल्या जत्रा आणि बाजारांमध्ये जाऊन दिवसाला १५०-६०० रुपयांची कमाई करतात. “नुकतंच मी एका जत्रेमध्ये एका दिवसात १००० रुपये कमवले होते,” ते अभिमानाने सांगतात.

“आज कादिरी पौर्णिमा आहे ना, मी सलग सहा तास एका जागी उभा होतो,” ते सांगतात. अनंतपूर जिल्ह्याच्या कादिरी भागामधल्या गावांमध्ये हा सण साजरा केला जातो, कारण त्या दिवशीची पौर्णिमा सर्वात जास्त उजेडाची असते.

PHOTO • Rahul M.

कुरुबा पूजम्मा, त्यांच्या भटकंतीतल्या साथीदार, आता एकट्याच कुठे निघून गेल्या आहेत

काही महिन्यांपूर्वी गंगप्पा पुट्टपार्थीला निघाले होते तेव्हा वाटेत त्यांची गाठ कुरुबा पूजम्मा या ७० वर्षीय विधवेशी पडली. पुट्टपार्थी ते पेनिकोण्डा या ३५ किलोमीटर मार्गावर त्या भीक मागत होत्या. “एक दिवस संध्याकाळी ते एकटेच बसलेले माझ्या नजरेस पडले,” त्या सांगतात. “मी त्यांना विचारलं ते काय करतात म्हणून. त्यांनी सारं सांगितलं आणि मला सोबत येणार का असं विचारलं. मी राजी झाले. ते म्हणाले, ‘खरंच चला. मी जिथे कुठे जाईन तुम्हाला सोबत नेईन’.” अशा रितीने पूजम्मा गंगप्पांच्या सोबत जाऊ लागल्या. गांधींचं रूप घेण्यासाठी त्यांना मदत करायची, पाठीला पावडर लावून देणे, त्यांचे कपडे धुणे अशी कामं करू लागल्या.

पण पूजम्मा आणि गंगप्पांची जोडी काही साधी-सोपी नव्हती. “एकदा रात्री,” त्या सांगतात, “ते कुठे तरी गेले आणि बराच वेळ परतलेच नाहीत. मी एकटीच होते. खूप भीती वाटू लागली मला. आजूबाजूला माणसं होती आणि मी आपली पत्र्याच्या शेडखाली बसून राहिले होते. काय करावं तेच कळेना. आता आपलं कुणीच नाही या विचाराने मला रडूच येऊ लागलं होतं. नंतर ते परत आले, जेवण घेऊन!” 

PHOTO • Rahul M.

गावातल्या उत्सवाची तयारीः गंगप्पांना गांधींचं रुप घेण्यासाठी पूजम्मा मदत करतायत, पाठीला पावडर लावून देतायत, काही रंगरगोटी मात्र ते स्वतःच करतात

गंगप्पा आणि पूजम्मा अनंतरपूर शहराच्या वेशीवरच, महामार्गाच्या जवळच राहतात. एका खानावळीच्या बाहेरच ते निजतात, तिथला मालक गांधींचा भक्त आहे. गंगप्पा साधारणपणे पहाटे ५ ला उठतात आणि रात्री ९ वाजतात निजतात. रानात काम करतानाची सवय त्यांनी सोडलेली नाही.

कधी कधी ज्या खानावळीच्या बाहेर ते निजतात तिथनंच त्यांना खाणं मिळतं. सकाळी रस्त्यावरच्या टपऱ्यांमधून ते काही तरी नाश्ता आणतात आणि दुपारच्या जेवणाला सुट्टी असते. पूजम्मा देखील खातायत ना यावर गंगप्पांचं लक्ष असतं. कधी तरी जेव्हा तब्येतीत जेवावं असं त्यांना वाटतं तेव्हा ते नाचणी, तांदूळ आणि चिकन घेऊन येतात आणि मग पूजम्मा रस्त्यावरच चूल मांडून मस्त मुद्दा [रायलसीमा भागाची खासियत असणारे नाचणी आणि तांदळाचे उंडे] आणि चिकनचं कालवण करतात.

सरळ साधं आयुष्य आहे हे. आणि आधी होतं त्यापेक्षा किती तरी चांगलं. गांधींचं सोंग घेतल्यापासून त्यांना पोटाची आणि डोक्यावरच्या छपराची काळजी राहिलेली नाही. तरीही, गंगप्पांना या गोष्टीचं दुःख वाटतं की आज काल कुणी गांधींना मानत नाही. असं कसं होऊ शकतं? “काही पोरं माझ्यापाशी आली आणि गांधींचं सोंग वठवणं थांबवा असं म्हणाली,” ते सांगतात. “त्यांचं म्हणणं होतं की आता सरकार नोटांवरून गांधींना हटवायला निघालेत आणि मी कशाला इथे गांधींचं सोंग घेऊन उभा आहे?”

ताजा कलमः काही दिवसांपूर्वी घरी जाण्यासाठी म्हणून पूजम्मा गंगप्पांना सोडून गेल्या. “त्या उगाडीच्या उत्सवाच्या आसपासच गेल्या आहेत,” ते म्हणतात. “त्या काही आता परत येत नाहीत. त्या तिथे स्वतः भीक मागून पैसे गोळा करणार. मी त्यांना ४०० रुपये दिलेत. आता मला एकट्यानेच रहावं लागणार.”

अनुवाद - मेधा काळे

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Rahul M.

राहुल एम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरचे स्वतंत्र पत्रकार आहेत आणि २०१७ चे पारी फेलो आहेत.

Other stories by Rahul M.