“आम्हाला तुमचा नंबर गांधीच्या डायरीत मिळाला. हायवेवर त्यांना कोणत्या तरी गाडीने उडवलं आणि त्यातच ते मरण पावले,” रविवारी, ९ डिसेंबर रोजी रात्री साधारण ७.३० वाजता रेशन दुकानाचे मालक आणि राजकीय कार्यकर्ते असणाऱ्या बी. कृष्णय्या यांनी मला फोनवर ही बातमी दिली.

मी गंगप्पांना – किंवा ‘गांधीं’ना – शेवटचा भेटलो ते २४ नोव्हेंबर रोजी बंगलोर-हैद्राबाद हायवेवर. सकाळचे १०.३० वाजले असावेत. ते गांधींच्या वेशात अनंतपूरला निघाले होते. अनंतपूरहून ८ किलोमीटरवर असणाऱ्या रापताडू गावातल्या एका खानावळीत ते राहत होते. “दोन महिन्यांपूर्वी कुणी तरी मला सांगितलं की एका म्हाताऱ्या माणसाला रहायला जागा हवी आहे म्हणून मी त्यांना इथे राहण्याची परवानगी दिली. मी कधी कधी त्यांना खायलाही द्यायचो,” खानावळीचे मालक, वेंकटरामी रेड्डी सांगतात.  मला ज्यांनी फोन केला ते कृष्णय्या कायम इथे चहा प्यायला यायचे आणि गंगप्पांशी गप्पाही मारायचे.

मी मे २०१७ मध्ये पारीसाठी गंगप्पांची गोष्ट लिहिली होती. तेव्हा त्यांचं वय सुमारे ८३ वर्षं होतं. सत्तर वर्षं शेतात मजुरी केल्यानंतर, वयाच्या ८३ व्या वर्षी गंगप्पांनी स्वतःला महात्मा गांधींचं रुप दिलं होतं. ऑगस्ट २०१६ पासून ते गांधींचं सोंग घेऊन पश्चिम आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर शहरात वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावत असत. शेतात मजुरी मिळायची त्यापेक्षा यातून मिळणारी भीक जास्तच होती.

२०१६ साली रानात काम करताना भोवळ येऊन पडल्यापासून गंगप्पांनी ते काम सोडलं होतं. काही काळ त्यांनी दोर वळले मात्र म्हाताऱ्या माणसाच्या हाताला कितीसं काम होणार. तेव्हाच त्यांनी गांधींचं सोंग घ्यायचा निर्णय घेतला.

गंगप्पांनी रोजच्या वापरातल्या साध्या साध्या गोष्टींमधून गांधीचां वेश तयार केला होता. महात्मा गांधींचं ‘तेज’ येण्यासाठी ते १० रुपयाची पॉण्ड्स पावडर वापरायचे. रस्त्यावरच्या टपरीतला स्वस्तातला चष्मा, गांधींचा चष्मा बनायचा. गावातल्या बाजारातली १० रुपयाची साधी काठी गांधीजींची काठी व्हायची. कुठे तरी सापडलेला मोटरसायकलचा आरसा आपला वेश आणि रंगरंगोटी ठीक आहे ना पाहण्यासाठी कामी यायचा.
M. Anjanamma and family
PHOTO • Rahul M.

डावीकडेः २०१७ साली मी त्यांना भेटलो तेव्हा तोंडाला पावडर फासून ते ‘गांधी’ होण्याच्या तयारीत होते. उजवीकडेः त्यांची पत्नी अंजनम्मा (डावीकडून तिसऱ्या) त्यांच्या गावी

अशा रितीने ऑगस्ट २०१६ पासून गंगप्पा रोज गांधींच्या वेशात अनंतपूरच्या रस्त्यांवर उभे ठाकायचे किंवा गावच्या जत्रांना किंवा बाजारांना जाऊन दिवसाला १५०-६०० रुपयांची कमाई करायचे. “नुकतंच मी एका जत्रेमध्ये एका दिवसात १००० रुपये कमवले होते,” त्यांनी मला सांगितलं होतं, अभिमानाने.

गांधींसारखा फाटका माणूस एका बलाढ्य राजवटीला हादरे देऊ शकतो आणि ती खाली खेचू शकतो याचंच त्यांना लहानपणी अप्रूप होतं, त्यांनी मला सांगितलं होतं. गांधी बनण्यासाठी देशाटन आणि चिकाटी दोन्ही गरजेची आहे असं त्यांना वाटायचं. सतत फिरत राहून आणि वेगवेगळ्या लोकांना भेटून गंगप्पा कदाचित त्यांच्या मानगुटीवर बसलेलं वास्तव दूर लोटू पाहत होते – त्यांची दलित (माडिगा) जात.

मी पहिल्यांदा गंगप्पांना भेटलो तेव्हा त्यांनी मला विनंती केली होती की त्यांची जात लिहू नये कारण ते तेव्हा अनंतपूरमधल्या एका मंदिरात मुक्काम करत होते. आणि तिथे त्यांनी कुणाला ते दलित असल्याचं सांगितलं नव्हतं. आणि अगदी गांधींचं रूप साकारतानाही ते जानवं आणि कुंकवाचा वापर करून ‘भट’ असल्याचं भासवत.

हे सोंग घेतलं तरी गंगप्पांची जात आणि त्यांची गरिबी या दोन्ही गोष्टींनी त्यांची पाठ काही सोडली नाही. मी २०१७ साली त्यांच्यापासून वेगळं राहणाऱ्या त्यांच्या पत्नींना जाऊन भेटलो आणि त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो घेतला तेव्हा तिथे खेळणाऱ्या काही मुलांनी फोटोत येण्यास नकार दिला, दलितांसोबत दिसू नये म्हणून.

कृष्णय्यांनी जेव्हा रविवारी मला फोन केला तेव्हा मी त्यांना माझ्या गोष्टीसाठी घेततल्या काही नोंदी सांगितल्या आणि गंगप्पांच्या कुटुंबाचा फोटो पाठवला. मी त्यांना अंजनम्मांचा पत्ती नीट सांगू शकलो नाही तेव्हा त्यांनी सुचवलं की कदाचित त्यांच्या जातीवरून त्यांचं गावातलं घर शोधता येईल (गावातल्या गावात जातनिहाय वस्त्या असतात याकडेच त्यांचा निर्देश होता). “कोण जाणो, गोरांतलामध्ये त्यांच्या जातीवरून त्यांचं घर कदाचित सापडू शकेल. त्यांनी कधी तुम्हाला त्यांची जात सांगितली होती का?”

कृष्णय्यांचे एक नातलग अनंतरपूरहून १०० किलोमीटरवर असणाऱ्या गोरांतलामध्ये मंडल निरीक्षक होते. अंजनम्मा आता तिथे आपल्या धाकट्या लेकीसोबत राहतात. किमान दहा वर्षांपूर्वी त्यांच्या थोरल्या मुलीने आत्महत्या केली. त्यांना दोनच अपत्यं होती. गोरांतलातल्या एका हवालदाराने अंजनम्मांना गंगप्पांच्या मृत्यूची बातमी दिली. १० डिसेंबर रोजी दुपारी त्यांनी गंगप्पांचं पार्थिव घरी नेलं.

या फाटक्या म्हाताऱ्याला उडवणारा कारचालक मात्र कुणालाच माहित नाही.


अनुवाद - मेधा काळे

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Rahul M.

राहुल एम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरचे स्वतंत्र पत्रकार आहेत आणि २०१७ चे पारी फेलो आहेत.

Other stories by Rahul M.