दादरच्या वाहत्या रस्त्यावरती रोज सकाळी शिवम सिंग एक लाल सतरंजी अंथरतो. या चार बाय पाच फुटाच्या सतरंजीवर तो चार पाच प्लास्टिकचे मोडे नीट ठेवतो. नंतर एका मोड्याच्या खाली तो लक्ष्मीचा फ्रेम केलेला फोटो ठेवतो आणि एक समोर उदबत्ती पेटवतो.

ज्या पिंपळाखाली त्याने त्याचं दुकान थाटलंय त्यावर एक फलक टांगलाय ज्याच्यावर लिहिलंय – ‘शिवम मेहेंदी आर्टिस्ट’. या फलकावर आणि त्याच्या मोड्यांवरच्या फोटो अल्बममध्ये मेंदीने सजलेल्या हातांचे आणि पावलांचे फोटो आहेत. आता शिवम पहिल्या गिऱ्हाइकाची वाट पाहतोय. तिने येऊन फक्त नक्षी निवडायची – फुलं, कुयऱ्या, साखळ्या किंवा मग गिऱ्हाइकाच्या हाताकडे पाहून शिवमलाच काही नक्षी सुचते. “कुणी तरी येईल...” तो म्हणतो, आजचा दिवस चांगला जाणार अशी त्याला आशा आहे.

त्याच्यापासून २०० मीटरवर दादर स्टेशनपासून जवळच रानडे रोडवर शिवा नायकनेदेखील त्याचं दुकान थाटलंय. ओली मेंदी भरून प्लास्टिकचे कोन तयार करणं हे दिवसाचं पहिलं काम. ज्या फूटपाथवर दुकान थाटलंय तिथे काही ना काही गजबज सुरू असते. इथे अनेक वस्तू विकल्या जातात त्याही स्थलांतरितांकडून – फुलं विकणारा सोलापूरचा, दागिन्यांची दुरुस्ती करणारा लखनौहून आलाय, बूट विक्रेता कोलकात्याचा तर आइस्क्रीमची गाडी राजस्थानच्या विक्रेत्याची.

PHOTO • Samyukta Shastri

मध्य मुंबईतल्या रानडे रोडवर शिवा नायक त्याच्या मेंदीच्या तात्पुरत्या दुकानात गिऱ्हाइकाची वाट पाहतोय

शिवा आणि शिवम त्यांच्या या तात्पुरत्या दुकानांमध्ये १० तास बसून राहतात. त्यांच्यासारख्या इतर मेंदी कलाकारांचा दिवस असाच असतो. या भागात सुमारे ३० मेंदी कलाकार आहेत, सगळे पुरुष. “मुलींपेक्षा मुलं मेंदी काढण्यात जास्त चपळ असतात. मुली [मेंदीचा सराव करण्यासाठी] पार्लरमध्ये जातात. आणि मुलं हा असा धंदा सुर करतात. मुली काय अशा पथारी टाकून बसू शकत नाहीत...” शिवम म्हणतो.

मुंबईच्या अनेक लोकल स्टेशनच्या बाहेर दुकानं टाकलेल्या इतर अनेक मेंदीवाल्यांसारखे शिवा आणि शिवम स्थलांतरित आहेत, दोघंही उत्तर प्रदेशहून आले आहेत. १९ वर्षांचा शिवम साधारण सहा वर्षांपूर्वी अलिगड जिल्ह्याच्या गवाना तहसीलमधल्या जामा गावातून मुंबईला आला. “मी गाव सोडलं ते ८ किंवा ९ वर्षांचा असेन,” तो सांगतो. “घरी कमावणारं असं कुणीच नव्हतं – माझ्या मोठ्या दोन्ही भावांची लग्नं झाली होती आणि ते त्यांचे त्यांचे वेगळे राहत होते.”

पण मुंबईला येण्याआधी तो दिल्लीला त्याच्या मामांकडे मेंदी शिकायला गेला. “२-३ महिने मी पूर्ण दिवस पुठ्ठ्यावरती मेंदी काढायचा सराव करायचो. माझी पुरेशी तयारी झाल्यावर त्यांनी मला गिऱ्हाइकांच्या हातावर मेंदी काढू द्यायला सुरूवात केली.” मुंबईत येण्याआधी काही तरी कमाई व्हावी यासाठी त्याने छोट्या खानावळींमध्ये काम केलं, ट्रॅक्टर, गाड्या चालवल्या.

शिवा आता विशीत आहे. दहा वर्षांपूर्वी तो फिरोझाबादच्या टुंडला तहसीलहून मुंबईला आला. त्याच्यासाठी मेंदीच्या धंद्यात येणं अगदीच साहजिक होतं. “आमचं अख्खं गाव हेच काम करतं,” तो सांगतो. “मी इथे आलो तेव्हा माझ्या भावाकडून ही कला शिकलो, माझा भाऊ आमच्या मेव्हण्याकडून. आमच्या घराण्याचा हा पिढीजात व्यवसाय आहे. सगळे तेच करतात.”

शिवाचा मामेभाऊ, कुलदीप नायक – त्याचंही मुंबईत मेंदीचं दुकान आहे. तो म्हणतो, “इतर मुलं शिकायला शाळेत जातात तसं आमच्या गावची मुलं मेंदी शिकतात. गिऱ्हाइकाला जे काही हवंय ते आम्ही काढू शकतो.” काय त्याचा पाढाच त्याने वाचला, “काही पण – अरेबिक, मुंबई स्टाइल, मारवाडी, इंडो-अरेबिक, इंडो वेस्टर्न, दुबई... अगदी काहीही.”

मुंबईला येऊन मेंदीवाल्याचं काम करणं फायदेशीर आहे. “आधी पैसा कुणी पाहिला होता?” शिवम विचारतो. “आम्ही गाव सोडून बाहेर पडल्यावर आणि काम करू लागल्यावरच आम्हाला पैसा पहायला मिळतो. गावाकडे अंगमेहनतीच्या कामाला तुम्हाला दिवसाला २००-३०० रोजगार मिळू शकतो. दिल्लीत मी वाहनचालक म्हणून महिन्याला ७०००-८००० कमवत होतो. आणि आता मी महिन्याला ३०,००० ते ५०,००० कमवतोय.”

PHOTO • Samyukta Shastri

शिवम सिंगच्या दुकानी (उजवीकडे) मेंदीच्या नक्षीचे फोटो ठेवलेले आहेत आणि तिथेच खाली लक्ष्मीचा फोटोही ठेवलाय

शिवमची बहुतेक कमाई लग्नांमध्ये मेंदी काढून होते. “इथे [रस्त्यावर] आमची दिवसाला ८००-२००० रुपयांची कमाई होते – दिवसाला ५ ते १० गिऱ्हाइक होतं. पाच जणी आल्या तर १०००-१५०० रुपये मिळतात. पण जर लोकांनी आम्हाला [मेंदी काढण्यासाठी] घरी बोलावलं तर आम्ही कमीत कमी १००० रुपये घेतो.”

त्याचे काका मनोज जयपूरचे आहेत. दादर पूर्वला त्यांचं स्वतःचं मेंदीचं दुकान आहे. शिवमला भेटायला आलेले मनोज सांगतात, “एका हातासाठी गिऱ्हाइक ५०० रुपये देतं. भाव १०० रुपयांपासून सुरू होतो. पण तितके कमी कुणीच देत नाहीत. सगळे ३००-४०० देतात. नववधूची मेंदी मात्र ५००० पासून सुरू होते.”

पण केवळ पैशामुळे लोक या धंद्यात येत नाहीत. शिवमला त्यातलं स्वातंत्र्य आवडतं, त्याला कुणालाही काहीही उत्तरं द्यावी लागत नाहीत. मनोज सांगतात, त्यांना मनात येईल तेव्हा बाहेर पडता येतं, प्रवास करता येतो. ते फार क्वचित त्यांच्या दुकानात बसून राहतात, त्यांच्या मित्रांना भेटत भटकत असतात ते. “मी ४-५ वर्षं मुंबईत आहे,” ते सांगतात. “त्याआधी माझं तमिळ नाडूमध्ये दुकान होतं. आम्ही भटकत राहतो – तमिळ नाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश – मी अख्खा भारत पालथा घातला आहे. तुम्हाला हवं तिथे, हवं तेव्हा जा. आज काय समुद्र किनाऱ्यावर जायची लहर आलीये, हा मी चाललो...”

शिवम आणि मनोज दोघांनी कामाला मदतनीस ठेवलेत. “त्यांच्या गावातले इतर लोक या कामात पैसा कमावतायत ते हे बघतात आणि मग तेही इथे येतात,” शिवम सांगतो. मनोजसुद्धा त्यांच्या मदतनिसांच्या भरोसे दुकान चालवतो. अगदीच खूप गर्दी असली तर किंवा घरच्या ऑर्डर असल्या तर ते जातात.

कामात ही मोकळीक आहे म्हणूनच शिवमला बऱ्याचदा जामा गावी त्याच्या घरी जाता येतं आणि त्याच्या कुटुंबाची जी २० बिघा (सुमारे चार एकर) जमीन आहे ती पाहू शकतो. त्याच्या दुकानात काम करणाऱ्या मुलांना तो महिन्याला ५०००-७००० पगार देतो. त्याच्या कमाईचा काही हिस्सा स्वतःच्या संरक्षणासाठी स्थानिक गुंडांना द्यावा लागतो. अजून थोडा हिस्सा भाड्यापोटी जातो – ईशान्य मुंबईच्या घाटकोपरमध्ये तो मनोज आणि इतर काही जणांसोबत एकत्र राहतो.

या सगळ्यातून जे काही मागे राहतं ते शिवम घरी पाठवतो. “इथे [मुंबई] पैसे ठेऊन मी काय करू? आम्ही हे सगळं घरासाठीच करतोय ना,” तो म्हणतो. शिवा त्यात भर घालतो, “आम्ही हा सगळा पैसा कशासाठी कमवतोय... इथे खर्च करायला का घरी पाठवायला?”

PHOTO • Samyukta Shastri

शिवम पिंपळाखाली बसलायः ‘कुणी तरी येईल...’ तो म्हणतो, आजचा दिवस चांगला जाणार अशी त्याला आशा आहे

तिथे जामामध्ये शिवमची आई आणि १५ वर्षांची बहीण अंजू त्याच्यावरच अवलंबून आहेत. अंजूने दहावी पूर्ण केलीये आणि ती आईला घरी सगळी मदत करते. तिच्या लग्नात मेंदी कोण काढणार या प्रश्नावर शिवममधला भाऊ जिवंत होतो आणि अभिमानाने तो म्हणतो, अर्थात मी काढणार. “किंवा कदाचित माझा भाऊ काढेल. दुसरं कोण?” मनोजचं मत मात्र वेगळं आहेः “मी घरी (जयपूरला) असलो तर मला मेंदी काढायला आवडत नाही. पण कधी कधी लोकांनी खूपच आग्रह केला तर मग मी मेंदी काढतो.”

दरम्यान, शिवाच्या दुकानावर एक गिऱ्हाईक थांबलीये. तिच्या भाचीच्या मेंदी कार्यक्रमासाठी त्याला घरी येण्याचं निमंत्रण द्यायला ती आली होती. “तुम्ही आम्हाला मेंदीसाठी मुंबईत कुठेही बोलवू शकता. आणि मुंबईच्या बाहेर असेल तर आम्ही जास्त पैसे घेतो,” तो म्हणतो. “आम्ही कुठेही जातो.”

Samyukta Shastri

Samyukta Shastri is an independent journalist, designer and entrepreneur. She is a trustee of the CounterMediaTrust that runs PARI, and was Content Coordinator at PARI till June 2019.

Other stories by Samyukta Shastri
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale