PHOTO • Purusottam Thakur

अबुज माडिया महिला ओरछातल्या आठवडी बाजारात येताना

घरी परतण्याचा प्रवास खडतर आहे. या महिला रात्री भाटबेडा येथे मुक्काम करतील, दिवसा परत चालू लागतील, आणि संध्याकाळी डोंगरमाथ्याला असलेल्या राजनैरी पाड्यावर पोचतील. आठवडी बाजारातून त्यांच्या गावी परतायला त्यांना दोन अख्खे दिवस लागतील. डोंगरदऱ्यांमधल्या वाटेने ओरछातल्या आठवडी बाजरात पोहोचायलाही त्यांना दोन दिवस चालावं लागलं होतं.

PHOTO • Purusottam Thakur

घरी परतायच्या लांबच्या प्रवासावर निघण्यासाठी सगळे तयार

या दरम्यान अबुज माडिया या जंगलांमध्ये वास्तव्य असणाऱ्या आदिवासी महिलांना मध्य भारतातील छत्तीसगढमधल्या दाट जंगल असलेल्या नारायणपूर जिल्ह्यातील धुळीने भरलेल्या वाटांनी जवळपास ४० किमी अंतर तुडवत जावं लागणार आहे. त्यांचं गाव, अबुजमाड, हे माओवादी बंडखोर आणि भारतीय सैन्यदलाच्या हिंस्र चकमकी होतात त्या ४,००० चौरस किमी भागावर पसरलं आहे. या संघर्षामुळे लोक साशंक आणि भयभीत झाले असल्याने आम्ही त्यांची ओळख उघड करण्याचं टाळलं आहे.

PHOTO • Purusottam Thakur

हा लांबचा पल्ला म्हणजे रंगांची उधळण आणि तोल सांभाळणं 

अगोदर, ओरछामधील आठवडी बाजारातील गोंगाटात आम्ही काही महिलांशी संवाद साधला होता, सगळ्या वेगवेगळ्या वेशात हजार होत्या - अंगाभोवती एक वस्त्र गुंडाळलेलं आणि चोळीपाशी पंचासारखं एक कापड. चांदी किंवा चमकत्या शुभ्र धातूचे दागिने घातलेले. काही जणींनी बाळांना झोळीत घेतलं होतं. बहुतेक पुरुष शर्ट घालतात आणि कमरेवर लुंगी नेसतात. शर्टपँट घातलेले इतर लोक एक तर स्थानिक सरकारी अधिकारी, बाहेरगावचे, व्यापारी किंवा साध्या वेशातले सुरक्षा कर्मचारी आहेत.  

PHOTO • Purusottam Thakur

अबुज माडिया महिला सहसा बाळांना झोळीत घेऊन फिरतात; पुरुषांचा वेश सहसा शर्ट आणि लुंगी असा असतो

या महिला आमच्याशी, सुरुवातीला लाजत लाजत, गोंडीमध्ये बोलल्या. आमच्या सोबतीला असलेल्या दोन गोंड मुलांनी आम्हाला या संवादाचं हिंदी भाषांतर करण्यात मदत केली. महिला म्हणाल्या की त्या आपल्या घराजवळील वनोपज बाजारात विकायला आणतात – ज्यात बांबूचे फडे, चारोळी, चिंच, देशी वाणाची केळी व टोमॅटोंच्या – सगळ्यांचे छोटे वाटे.

PHOTO • Purusottam Thakur

एका झोळीत बाजारात विकायला लहानसहान वस्तू आणि आपल्या मुलांना घेऊन असलेली एक अबुज माडिया महिला

त्या रेशमाचे कोषदेखील विकायला आणतात. अबुज माडमध्ये मुबलक प्रमाणात कोष मिळतात; हा छत्तीसगढच्या उत्तरी पठारांवर असलेल्या बिलासपूर, रायगढ आणि कोर्बा येथे तयार होणाऱ्या प्रसिद्ध रेशमी कोसा साड्यांसाठी लागणारा कच्चा माल आहे.

ह्या वस्तू विकून मिळणाऱ्या पन्नासेक रुपयांत त्या तेल, साबण, मीठ-मिरची, कांदे-बटाटे आणि इतर आवश्यक वस्तू विकत घेतात. विकायला आणलेल्या वस्तूंप्रमाणे खरेदीही थोडकीच असते, जेणेकरून त्यांच्या लहानग्या झोळीत ती मावू शकेल.

वेळप्रसंगी लागणारं छोटं इन्व्हर्टरसुद्धा इथे विकण्यात येतं, कारण माडाच्या बऱ्याच गावांमध्ये वीज नाही.

PHOTO • Purusottam Thakur

आवश्यक सामग्रीच्या शोधात ग्राहक अनवाणी या बाजारात चकरा मारत असतात. आणि इथे मिळणाऱ्या गोष्टी पाहून तुम्ही थक्क व्हाल

आणि या दुर्गम डोंगरांमध्ये नेटवर्क उपलब्ध नसल्याने, एका स्थानिक विक्रेत्याच्या मते, आदिवासी मोबाईलचा वापर गाणी ऐकणं, फोटो आणि व्हिडिओ काढणं आणि टॉर्च म्हणून करतात.

अबुज माड - म्हणजे अज्ञात किंवा रहस्यमय डोंगर -  पश्चिमेस महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यापासून ते दक्षिणेस छत्तीसगढमधील बिजापूर तर पूर्वेस बस्तर जिल्ह्यांपर्यंत पसरला आहे. हा भाग गोंड, मुडिया, अबुज माडिया आणि हलबा यांसारख्या बऱ्याच आदिवासी जमातींचं वसतिस्थान आहे. यांपैकी, अबुज माडिया जमातीची लोकसंख्या, अधिकृत तसेच स्वतंत्र अंदाजानुसार कमी होत चालली आहे.

हा बहुतांशी डोंगराळ भाग आहे, येथे पुष्कळ झरे आणि झुडपांची दाटी आहे. लोकांमध्ये जिव्हाळा आणि आतिथ्य आहे. पण ह्या सुखी भागात राहणं किंवा प्रवास करणं मात्र सुखाचं नाही. बीबीसी करिता बरेचदा अबुज माड येथून विशेष संवाददाता म्हणून काम केलेले सुवोजित बागची म्हणतात, "वर्षातून चार महिने पावसामुळे ह्या भागाचा संपर्क बंद होतो, आणि त्या कालावधीत जुलाब होऊन किती जण मरण पावतात, त्याची आपल्याला काही कल्पना नाही.. वर्षभर दर दुसऱ्या व्यक्तीला मलेरियाची लागण होते. शिक्षक शिकवतात अशी एकही चालू असलेली शाळा मी पाहिलेली नाही, आरोग्य केंद्र नावालाही नाहीत आणि प्राथमिक उपचार एखाद वेळी फिरत्या माओवादी गटांद्वारे किंवा स्थानिक भोंदू वैद्यांकडून पुरवले जातात.”

PHOTO • Purusottam Thakur

काही महिला आपल्या बाळांची बाजारात येणाऱ्या भोंदू वैद्यांकडून चाचणी करून घेतात  

सीमावर्ती भागात पोलिसांच्या कारवायांचं सर्वांनाच भय आहे, आणि जर गावकऱ्यांचं चित्रण सुखी म्हणून करण्यात येत असेल, तर ते मानववंशशास्त्रज्ञांच्या जुन्या नोंदवह्यांमध्ये, खऱ्या आयुष्यात नव्हे," बागची म्हणतात.

अबुज माडकडे जाणारे रस्ते ओरछामध्ये येऊन संपतात. बाजारात जाण्यासाठी स्थानिक लोक नेहमीच जवळपास ७० किमी प्रवास करतात. या विस्तृत पट्ट्यातला हा एकमेव बाजार. आदिवासींना या बाजारात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून रेशनदेखील मिळतं - आणि शाळेत जाणारी मुलं स्वतः येऊन आपल्या पोषण आहारासाठी तांदूळ व डाळ घेऊन जातात.

PHOTO • Purusottam Thakur

या विस्तृत पट्ट्यातला एकमेव बाजार असणाऱ्या ओरछाच्या वाटेवर, डोक्यावर बोजा घेऊन एका रांगेत 

काही काळ रामकृष्ण मिशनच्या स्वयंसेवकांना या भागात प्रवेश होता. मात्र सरकारने त्यांना आदिवासींना अन्नधान्य वाटण्यास बंदी घातली आहे.

बाजारात आलेली बहुतांश मुलं कुपोषित दिसतात. आम्हाला स्थानिक आदिवासी आश्रम शाळेतील लहान मुलीदेखील भाज्या विकत घेताना दिसल्या. अबुज माड सारख्या दूरवरच्या पाड्यावरून आपल्या पालकांसोबत आलेल्या मुलांसोबत युनिसेफचे स्वयंसेवक दिसून येतात. महिला, खासकरून मातादेखील कुपोषित आहेत. युनिसेफचे कार्यकर्ते म्हणतात की आठवडी बाजाराच्या निमित्ताने त्यांना स्वास्थ्य चाचणीची मोहीम राबवता येते, नाही तर या दुर्गम गावांमध्ये हे काम करणं अवघडच.

PHOTO • Purusottam Thakur

आपल्याला काय हवंय ते त्या मुलाला ठाऊक आहे, पण तो बोट दाखवत असलेले कुरमुरे अन् मिठाई घेण्याचं काही त्याच्या आईचं मन नाहीये

ओरछाच्या बाजारातील आणखी एक आकर्षण म्हणजे: तांदळापासून बनवलेली दारू (लोंडा), सुलफी, ताडी, महुआ आणि इतर स्थानिक मादक पेयं. इथल्या लोंडा बाजाराच्या भागात ही विकली जातात.  

गावकऱ्यांना दिवसाअखेरीस एकत्र बसून आरामात एक पेय घेण्यासाठी पण या बाजारात एक अवकाश असतो. लहानमोठे सगळे सारख्या प्रमाणात आपल्या कुटुंबीयांसोबत पेय पितात आणि आपल्या कडू गोड आठवणी वाटून घेतात. 

PHOTO • Purusottam Thakur

गावकऱ्यांना दिवसाअखेरीस एकत्र बसून आरामात एक पेय घेण्यासाठीचा अवकाश या बाजारात मिळतो

माझ्यासारख्या पत्रकारासाठी हा बाजार म्हणजे बातम्या गोळा करण्याचं एक ठिकाण आहे. अशा बातम्या ज्या सहसा प्रत्येक गावातून मिळवणं अवघड असतं - शेतमालाची माहिती, बाहेरून आलेल्या गोष्टी, आणि लोकांची खरेदी, विक्री, देवाण घेवाण आणि तगून राहण्याची बदलत जाणारी क्षमता.

मूळ हिंदीतून इंग्रजी अनुवाद: रुची वार्ष्णेय

मराठी अनुवादः कौशल काळू

कौशल काळू रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.

Purusottam Thakur

पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.

Other stories by Purusottam Thakur