भगौली साहू जवळ जवळ रोज जो हंगाम असेल त्यानुसार गवताचे किंवा तनिसाचे दोन भारे घेऊन शंकरदा गावाहून धमतरी शहरात चालत जातात. ते हे गवत किंवा तनिसाचा भारा बांधून त्याची कावड खांद्यावर तोलतात. छत्तीसगडच्या रायपूरहून ७० किलोमीटरवर असणाऱ्या धमतरीमध्ये ते हा चारा पशुपालन करणाऱ्यांना विकतात.

धमतरीची त्यांची ही वारी गेली अनेक वर्षं चालू आहे – आठवड्यातले चार दिवस, कधी कधी सहा, सगळ्या ऋतूत. सकाळी सायकलवर शाळेत जाणारी मुलं, शहरात कामाच्या शोधात निघालेले मजूर, कारागीर आणि बांधकाम मजुरांच्या बाजूने रस्त्याच्या कडेने भागौली चालत असतात.

भागौली ७० वर्षांचे आहेत. अंदाजे ४.५ किमी अंतरावर असणाऱ्या धमतरीला पोचायला त्यांना तासभर लागतो. कधी कधी तर अशा दोन खेपा करतात – म्हणजे एकूण १८ किलोमीटर. यामध्ये शेतकऱ्यांकडून तनीस विकत घेण्यासाठी किंवा ओढ्याशेजारी, भाताच्या खाचराच्या किंवा रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत कापण्यासाठी लागणारा वेळ धरलेला नाही.

PHOTO • Purusottam Thakur
 Dhaniram cycles
PHOTO • Purusottam Thakur

भागौली म्हणतातः ‘आम्ही खूप गरीब आहोत आणि थोडं काही तरी कमवून भागवतो झालं.’ उजवीकडेः त्यांचा मुलगा धनीराम रोज बिगारीने काम करण्यासाठी धमतरीच्या मजूर अड्ड्यावर सायकलने जातो

मी त्यांना कायम या रस्त्यावरून जाताना पाहिलंय आणि माझ्या मनात कायम हा विचार यायचाः या वयात ते इतकं कष्टाचं काम का करतायत? “आम्ही खूप गरीब आहोत आणि थोडं काही तरी करून आम्ही भागवतो झालं. धमतरीहून परतताना मी घरच्यासाठी बाजारातून थोडा भाजीपाला विकत आणतो,” ते मला सांगतात. मी त्यांच्याबरोबर काही अंतर चालत जातो आणि मग त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या घरी पोचतो. वाटेत ते म्हणतात, “मी शेतकऱ्यांकडून ४०-५० रुपयांना तनीस विकत घेतो आणि धमतरीत विकतो.” दिवसाच्या शेवटी भागौलींची ८० ते १०० रुपयांची कमाई होते.

तुम्हाला वृद्धापकाळ पेन्शन मिळतं का, मी विचारतो. “हो, मला आणि माझ्या बायकोला महिन्याला रु. ३५० पेन्शन मिळते. पण वेळेवारी मिळत नाही. कधी कधी तर दोन-चार महिने उशीरा पेन्शन येते.” तेही गेल्या चार वर्षांपासूनच मिळायला लागलंय.

PHOTO • Purusottam Thakur
 Bhagauli walks to sell the fodder in town
PHOTO • Purusottam Thakur

डावीकडेः माती आणि विटा वापरून भागौली यांनी शंकरदामधलं त्यांच्या वडलांनी बांधलेलं घर जरा व्यवस्थित करून घेतलंय. उजवीकडेः गेली कित्येक वर्षं ते चारा विकण्यासाठी धमतरीची वाट तुडवतायत

आम्ही भागौलींच्या घरी पोचलो तेव्हा त्यांचा मुलगा धनीराम बिगारीने काही काम मिळतंय का ते पाहण्यासाठी सायकलवर निघाला होता. तो धमतरीच्या मध्यावर असणाऱ्या ­‘क्लॉक सर्कल’ जाईल, तिथेच मुकादम आणि कंत्राटदार येतात आणि रु. २५० रोज देऊन कामासाठी मजुरांना घेऊन जातात. मी जेव्हा त्याला त्याचं वय विचारलं तेव्हा त्याचं उत्तर त्याच्या वडलांसारखंच होतं. “मी निरक्षर आहे आणि मला काही माझं वय माहित नाही. तुम्हीच काय ते अंदाज लावा,” बहुतेक करून तिशीत असलेला धनीराम म्हणतो. तो किती दिवस कामाला जातो? “मला आठवड्यात दोन किंवा तीन दिवस काम मिळालं, तर भारीच!” वडीलच बहुधा मुलापेक्षा जास्त आणि जास्त मेहनतीचं काम करतायत.

भागौलींच्या पत्नी, खेडीन साहू घरकामात व्यस्त आहेत आणि धनीरामच्या दोन्ही मुलांना शाळेत पाठवायची तयारी करतायत – दोघं पहिली आणि दुसरीत आहेत. त्यांचं हे राहतं घर त्यांनी बांधलं का त्यांच्या आई-वडलांनी, मी भागौलींना विचारतो. “मी. आमचं जुनं मातीचं घर माझ्या वडलांनी बांधलं होतं. मी हे घर मात्र माती आणि विटा वापरून बांधलय.” त्यांचे वडील, भागौली सांगतात, एका शेतकऱ्याकडे गुराखी म्हणून काम करायचे आणि त्यांची मुलगी आता लग्न होऊन सासरी नांदतीये.

School girls riding their cycles in town
PHOTO • Purusottam Thakur
hawkers and labourers going to town
PHOTO • Purusottam Thakur
Labourers travelling to town for work
PHOTO • Purusottam Thakur

सकाळी सकाळी शंकरदा-धमतरी रस्त्यावर रोजगारासाठी धमतरीला जाणाऱ्या मजुरांची आणि फेरीवाल्यांती लगबग सुरू असते

त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळू शकतं का? “आम्ही अर्ज भरलाय. आम्ही पंचायतीला किती खेटे मारले असतील, सरपंच आणि इतर सदस्यांना विनंती करूनही ते काही झालं नाहीये. त्यामुळे सध्या तरी मी त्याचा नाद सोडून दिलाय.”

पण, “बडा अकाल” (१९६५-६६ मध्ये पडलेला भीषण दुष्काळ) आला तेव्हा मात्र सरकार गावकऱ्यांच्या मदतीला धावून आलं, राज्य शासनाकडून त्यांना गहू आणि तांदूळ मिळाले होते असं ते सांगतात. त्यामुळे, भागौली म्हणतात, ते जगू शकले. सोबत सावान (एक प्रकारचं तृणधान्य) आणि जंगलात वाढणारी मच्छरिया भाजीचा पोटाला आधार होता.

या कुटुंबाकडे कधीच स्वतःच्या मालकीची जमीन नव्हती – ना भागौलीच्या वडलांच्या पिढीत, त्यांच्या स्वतःच्या पिढीत ना त्यांच्या मुलाच्या. “आमच्याकडे हे हात आणि पाय सोडले तर दुसरं काही नाही. माझे वडील काय आणि आम्ही काय, एवढीच आमची साधन संपत्ती आहे.”

अनुवादः मेधा काळे

Purusottam Thakur

Purusottam Thakur is a 2015 PARI Fellow. He is a journalist and documentary filmmaker and is working with the Azim Premji Foundation, writing stories for social change.

Other stories by Purusottam Thakur
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale