साठी उलटून गेलेल्या कमलाबाई गुढे शक्य होईल तेव्हा मजुरीला जातात, मोबदला धान्यात. पैशात नाही. त्यांना तेवढंच मिळतं. त्यामुळे मग त्या कधी कधी १२ तास श्रम करतात, मोबदला मिळतो, २५ रुपयांत येईल तेवढी ज्वारी. आपल्या साडे चार एकरात गाळलेला घाम वेगळाच. आणि जर का कधी चांगलं पिकलं तर त्यातलं बरंचसं तर जंगली जनावरं खाऊन जातात कारण त्यांचं रान जंगलाच्या काठावर आहे. कपास आणि सोयाबीन जितकी जास्त पिकेल तितकी रानडुकरं आणि नीलगायी त्यांच्या रानात येणार. रानाला कुंपण करायचं तर लाखभराचा खर्च येणार. इतक्या पैशाचा त्या स्वप्नातही विचार करू शकत नाहीत.

१९९० च्या दशकापासून शेतीवरील अरिष्टामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि देशातल्या लाखभर स्त्रिया विधवा झाल्या, त्यातल्याच एक कमलाबाई. या संकटाचा सगळ्यात वाईट फटका बसलेल्या भागात त्या राहतातः विदर्भ. त्यांचं गाव लोणसावळा, वर्धा जिल्ह्यात आहे. २००१ पासून वर्धेसह इतर सहा जिल्ह्यात मिळून ६,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

त्यांचे पती पळसराम कर्जाचा बोजा सहन करू शकले नाहीत आणि वर्षभरापूर्वी त्यांनी जीव दिला. त्या मात्र तगून आहेत, शेती कसायचा प्रयत्न करत, निम्मं छत उडालेल्या, दोन भिंती कधीही ढासळतील अशा घरात आयुष्य कंठत. या छोट्या, दिनवाण्या घरात पाच माणसं राहतात. त्यांचा मुलगा, सून आणि दोन नातवंडं. समाजाच्या नजरेत कमलाबाई ‘विधवा’ आहेत. त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने, कसं तरी करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणाऱ्या त्या एक छोट्या शेतकरी आहेत.

PHOTO • P. Sainath

कमलाबाई गुढे त्यांच्या लोणसावळा गावातल्या घरी. त्यांना काम मिळालंच तरी मोबदला फक्त धान्यात मिळतो. सहसा, दिवसभराच्या श्रमासाठी २५ रुपयांत येईल तेवढी ज्वारी

मुळात एका भूमीहीन दलित माणसाकडे जमीन कशी काय आली बुवा? जशी त्या करतायत, तशी. कमलाबाईंच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण म्हणजे संघर्ष आहे. त्यांनी सुरुवातीला शेतमजूर म्हणून काम केलं, मजुरी रु. १०-१२. “त्या काळी तेवढ्या पैशातसुद्धा चिकार गोष्टी यायच्या,” चाळीस वर्षांपूर्वीचा काळ त्यांना आठवतो. भरीस भर, त्या चारा गोळा करून शेतकऱ्यांना विकून चार पैसे कमवायच्या.

“मला आठवतंय ना, माझी आई चारा गोळा करण्यासाठी तासंतास खपायची आणि कवडीमोल भावात विकायची,” त्यांचा मुलगा भास्कर सांगतो. आपली शेती वाचवण्याच्या सगळ्या धडपडीचा तो मुख्य केंद्रबिंदू. “एका पेंडीला १० पैशे यायचे,” त्या हसतात. “पण मी इतक्या खेपा करायचे की चाऱ्याचे मला दिवसाला दहा रुपये मिळायचे.” म्हणजेच, दिवसाला चाऱ्यांच्या १०० पेंड्या विकण्यासाठी त्या किती किलोमीटर चालायच्या याची मोजदाद नाही. मात्र १६-१८ तासांचे त्यांचे कष्ट सार्थ व्हायचे. या त्यांच्या फुटकळ कमाईतून पैसे मागे टाकत त्यांनी आणि त्यांच्या पतीने जंगलाच्या बाजूची कुणीच विकत घेत नव्हते अशी जमीन घेतली. हे झालं तब्बल ४० वर्षांमागे. साडेचार एकर रानासाठी त्यांनी रु. १२,००० मोजले होते. मग ही अत्यंत निबर जमीन वाहिताखाली आणण्यासाठी या कुटुंबाने ढोरमेहनत केली. “माझा आणखी एक लेक होता,” त्या सांगतात. “पण, तो वारला.”

आजही, साठी उलटली तरी कमलाबाई खूप अंतर पायी तुडवतात. “काय करायचं? गावापासून रान सहा किलोमीटरवर. मला मजुरी मिळाली तर काही तरी पदरी पडतं. नंतर मी भास्कर आणि वनिताला मदत करायला रानात जाते.” सरकारच्या कामांवर जाण्याचं त्यांचं वय राहिलेलं नाही. आणि तिथेही एकट्या बायांबद्दल आणि खास करून विधवा बायांबद्दल लोकांच्या मनात अजूनही आकस आहेत. त्यामुळे मग त्या मिळेल ते काम पत्करतात.

PHOTO • P. Sainath

कमलाबाई आपल्या सुनेसोबत, मु.पो. लोणसावळा, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र

सगळ्यांनी मेहनत करून रान वापराजोगं केलंय. आता ते चांगलं सुपीक दिसायला लागलंय. “ही विहीर पाहिली?” घरच्यांनी आपल्याच मेहनतीने खोदलेली भली मोठी विहीर दाखवत त्या विचारतात. “जरा गाळ काढला, डागडुजी केली तर किती तरी जास्त पाणी साठेल नं.” पण त्यासाठी किमान १५,००० रुपये पाहिजेत. रानाला कुंपण करायचं तर लाखभर लागतील ते वेगळेच. त्यांच्या रानात उताराला शेततळं करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी लागणारा पैसा वेगळाच. बँकेतून कर्जाची बातच सोडा. मोडकळीला आलेल्या घराची दुरुस्ती करायची तर २५,००० रुपये गाठीशी पाहिजेत. “पिकं हातची गेली, दीड लाखांचं कर्ज झालं म्हणून माझ्या नवऱ्यानं जीव दिला,” त्या सांगतात. त्यातलं काही कर्ज त्यांनी फेडलंय आणि सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मिळालेले १ लाख रुपये आता जवळपास खर्चून गेले आहेत. तरी ज्यांच्याकडनं पैसे घेतले होते त्यांचा तगादा संपलेला नाही. “आमचं बरं चाललं होतं. पण सलग किती तरी वर्षं शेतीच पिकली नाही आणि मग मोठा घाटा झाला.”

गेल्या अनेक दशकांतल्या सगळ्यात मोठ्या कृषी संकटाचा घाला इतर लाखो लोकांप्रमाणे या कुटुंबावरही पडला. शेतीचा खर्च वाढलाय, मालाला भाव मिळेनासा झालाय आणि सरकारने अंग काढून घेतलंय. “गावात सगळ्यांची हीच गत आहे,” त्या सांगतात. गेल्या वर्षीही पिकं वाया गेली. त्यांना जबरी तोटा सहन करावा लागला. भास्करने बीटी कपाशीवर विश्वास ठेवला. “सगळा मिळून दोन क्विंटल कापूस झाला,” त्या सांगतात.

सरकारने या नुकसानीत अजून भर टाकली. गेलं वर्षं संपता संपता सरकारने त्यांची “रिलीफ पॅकेज” च्या “लाभार्थी” म्हणून गणना केली. त्या अंतर्गत त्यांना नको असलेली एक महागडी “आधा जर्सी” गाय विकत घ्यायला लागली. भरपूर अनुदान असलं तरी त्यांना त्यांचा साडेपाच हजारांचा हिस्सा द्यावाच लागला. “आम्ही सगळे मिळून खात नाही तेवढं त्या भुताच्या पोटाला लागतं,” त्या आम्हाला सांगतात. (द हिंदू, २३ नोव्हेंबर २००६) आणि “दूध पण टिचभर.”

उफराटा भाडेकरार

तेव्हापासून, “मी दोनदा ती देऊन टाकली, पण ते फिरून तिला माझ्यापाशीच आणून देतात,” हताश होऊन त्या सांगतात. ज्यांना त्या ही गाय देऊ पाहतात, त्यांचं म्हणणं काय तर “आम्हाला काही तिला खाऊ घालणं परवडत नाही.” त्यामुळे आता “मी माझ्या शेजाऱ्याला त्या गाईला चारायला महिना पन्नास रुपये देते.” उफराटाच भाडेकरार. सौदा काय तर गाय जेव्हा कधी दूध द्यायला सुरुवात करेल कमलाबाईंना निम्मं दूध मिळेल. हे सगळं भविष्यात होईल अशी आशा उरात ठेवायची. सध्या तरी जी गाय कमलाबाईंना आधार ठरणार होती तिच्या राखणीसाठी त्यांना पदरचा पैसा खर्च करावा लागत आहे.

पण त्या मोडून पडल्या नाहीयेत. ज्या दिवशी त्यांना काम मिळत नाही त्या दिवशी त्या आपल्या दूरवरच्या रानात पायी जातात. आज त्यांची उत्साही नातवंडं त्यांच्यासोबत गंमती करत दुडदुडत असतात. त्यांच्या आयुष्याचा आणि भविष्याचा विचारच त्यांना बळ देतो. नेहमीप्रमाणे, त्यांची मान ताठ आहे. पण नातवंडांकडे पाहिलं की डोळ्याला धारा लागतात. कमलाबाईंनी निश्चय केलाय, आत्महत्या गेलेल्यांचा नाही, तर मागे राहिलेल्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांच्यासाठीच त्या कंबर कसून सज्ज आहेत.

पूर्वप्रसिद्धीः द हिंदू २१ मे २००७

https://www.thehindu.com/todays-paper/tp-opinion/Suicides-are-about-the-living-not-the-dead/article14766288.ece

अनुवादः मेधा काळे

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale