तिर्रा कलाकार, एम. के. केळुकुट्टी, यांनी एकदा देवराईत सादरीकरण करताना झाडाचं पान उपटलं. “त्यावेळी ती जागा अपवित्र केली म्हणून त्यांना चार आणे दंड भरावा लागला होता. ज्यावेळी हे घडलं तेव्हा ते देवाच्या भूमिकेत होते, पण त्यावेळी त्यांचं पात्र महत्त्वाचं नव्हतं,” त्यांचे नातू एम. के. कुंजीरमण हे त्या घटनेची आठवण सांगत होते.
तिर्रा कलाकार अनुसूचित जातीतून येतात आणि त्यांना या उच्चवर्णीयांच्या मंदिरांमध्ये कलाकार म्हणून प्रवेश असला तरी, तरीही त्यात एक विशिष्ट अंतर राखावं लागतं. हे धार्मिक नृत्य कावू किंवा देवराईमध्ये तसेच मंदिर परिसरात सादर केलं जातं. पण देवता असलेल्या ठिकाणी प्रवेश करणं किंवा नृत्य करणं निषिद्ध आहे.
कुंजीरमण हे वण्णन समुदायातले आहेत, जो उच्च जातीतील लोकांचे कपडे धुण्याचं काम करतो. केरळमध्ये त्यांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला गेला आहे. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही तिर्रा कलाकार होते. अगदी लहानपणापासून ते त्यांच्यासोबत सादरीकरणाला जायचे. वयाच्या चाळीशीत त्यांनी स्वतः तिर्रा सादरीकरण सुरू केलं.
“तलाचिलोन, करियथन, कुट्टीचथन, वेट्टोकोरुमाकन, कान्निकाकरुवों,” ही ८७ वर्षे जुनी गाणी त्यांनी साकारलेल्या हिंदू देवतांच्या नावांवर आधारित आहे.
कुंजीरमण ‘अंजडी’ आणि ‘टोट्टम पट्टू’ गायला सुरुवात करतात. पहिलं गीत नर्तकाच्या शरीरात अवतरणाऱ्या देवाला आवाहन करण्यासाठी गायलं जातं आणि दुसरं कुट्टीचथनची कथा सांगणारं असतं. काही विद्वानांचं म्हणणं आहे की, टोट्टूम पट्टू संरक्षण आणि समृद्धीसाठी पूजल्या जाणाऱ्या कुट्टीचथनला नव्हे तर देवी भगवतीला आवाहन करतो. त्याच्या छातीवर आठ बिंदूंनी त्याचं चित्र काढलं जातं.
त्यांच्या मधूर आवाजानं वातावरण भारावून जातं. “कुट्टीचथनचा जन्म एका वल्लुवा (खालच्या जातीच्या) आई आणि एका नम्बूदिरी (ब्राह्मण) वडिलांच्या पोटी झाला. तो लहान असताना एकदा त्याला खूप भूक लागली होती. तो बराच वेळ उपाशी होता. त्यानंतर त्याने त्याच्या कळपातील एक म्हैस मारली आणि तिचं रक्त प्यायला. त्याच्या संतापलेल्या वडिलांनी त्याला ठार मारलं आणि त्याचे ३९९ तुकडे केले,” कुंजीरमण सांगतात.
ते कोळिकोडमध्ये शिवपुरम गावात त्याच्या दोन मजली घराच्या व्हरांड्यावर बसलेत. आता आमच्याकडे असे अनेक कुट्टीचथन आहेत, ‘पुकूट्टी’, ‘तिकुट्टी’, ‘करिकुट्टी’ ते रिपोर्टरला सांगतात.


























