“लोकांना आजही असं वाटतं की ज्या व्यक्तीला ६० वर्षांपूर्वी कुष्ठरोग झाला होता त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर आपल्यालाही याचा संसर्ग होईल.”
वयाच्या सत्तरीत असलेले नियामत उल्लाह खान गेली सहा दशकं कुष्ठरोगापासून मुक्त आहेत, पण तरीही हा कलंक कायम असल्याचं ते सांगतात. “माझ्या कुटुंबाकडून मला आदर मिळतो, पण माझ्या या स्थितीमुळे मी इतरांकडून तशाच आदराची अपेक्षा नाही करू शकत," ते स्पष्ट करतात.
किळस आणि सहानुभूतीने भरलेल्या नजरा सहन न झाल्यानं शेवटी त्यांनी कुपवाडा इथलं आपलं घर आणि कुटुंब सोडलं आणि २०२५ मध्ये श्रीनगरमधील बहरार या कुष्ठरोग वसाहतीत ते राहायला आले.
"मी इथे आलो कारण इथे सगळे समान आहेत. गावात मला जसं वाळीत टाकल्यासारखं वाटायचं, तसं इथे वाटत नाही," ७६ वर्षांचे नियामत म्हणतात. "ही जागा घरासारखी वाटते. मी मरेपर्यंत इथेच राहण्याचा निर्णय घेतलाय."
















