बासष्ट वय झालं जनाबाई सोनवणेंचं. ही बाई समंजस जगलीय. कधी ना कुणाशी भांडली ना तंडली.
पण हे वर्ष आक्रीत निघालं. “जरा कुठं खुट्ट झालं का माझं टाळकं सटाकतंय. कंधी कुण्णाचं मनावर न घेणारी मी, यवढ्यात्येवढ्यावरून वसवस् कराय लागल्येय.” भादोळे गावातील आपल्या दुपाखी घराच्या अंगणात बसून जनाबाई सांगतात.
२०२५ मधील उन्हाळ्यात कोल्हापूरमध्ये रात्रीचं तापमान एरवीपेक्षा जास्त होतं. प्रचंड उकाड्यामुळं जनाबाईंची झोप उडालेली. आधी त्यांना वाटलं, दोनचार दिवसांत होईल सवय. कधी ना कधी लागेलच डोळा. पण उष्म्यानं असं हैराण केलं की जनाबाईला तासदोनतासाची झोपही मिळेना. दिवसांमागून आठवडे उलटले न् महिना गेला तरी जनाबाईची झोप उडाली ती उडालीच. झोपेअभावी म्हातारी वैतागली, विनाकारण तणतण करू लागली.
जनाबाई भुमिहीन. त्या रोजमजुरीवर दुसऱ्याच्या रानांत काबाडकष्ट करतात. पेरणी, निंदणी, काढणी पासून गवताचे भारे वाहून या बाईचा जीव थकून जातो. संध्याकाळी तिची हाडं कडाकडा वाजतात. आखडलेले खांदे-मान नको नको करतात. दिवसभर शरीराचं ओझं पेलून थकलेले गुडघे-पोटऱ्या ठणकू लागतात. अशावेळी जनाबाई उंबऱ्यावर बसून राहते नि कष्टाला जणू घराबाहेर जा म्हणते. होता होता रात्रीचे दहा वाजतात. मग जनाबाई अंथरूणावर अंग लोटून डोळे मिटते. यथावकाश आंबलेल्या शरीरात हळूहळू साखरझोप पाझरते. हाच तिचा वर्षानुवर्षांचा शिरस्ता.
पण अशा गाढ झोपेच्या रात्री अचानक हरवल्या. अलीकडे तापमानाचा पारा चढतच गेला. रात्री चंद्रप्रकाशातही जनाबाईच्या घराचं टिनचं छप्पर आग ओकू लागलं. घामानं झंपर भिजू लागलं. या कुशीहून त्या कुशीवर होत जनाबाई निद्रादेवीची आराधना करू लागली. घडीभर डोळा लागला तर लागला.
एखादी डुलकी उसवली की रात्रभर आढ्याकडं पाहत जनाबाई जागू लागली.












