“समाजातील उपेक्षित घटकांचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणारी मोठमोठ्या दालनांमधली ही प्रदर्शनं ज्यांच्या जीवनावर आधारित असतात त्या लोकांना फारशी आपलीशी वाटत नाही. अभ्यासाचा भाग म्हणून मी दिल्लीतल्या एका कला प्रदर्शनात गेले होते. त्या दालनात वंचित लोकांच्या जीवनावर आधारित फोटो, शिल्पं आणि चित्रे होती. पण त्या सर्व वातावरणात एक उच्चभ्रू भाव होता. मला तिथं खूप परकेपणा जाणवला,” २२ वर्षांची हैरुनिशा कळकळीनं बोलत होती.
“समाजाच्या मुख्य प्रवाहातून वगळलेल्या समुदायातल्या एखाद्या व्यक्तीला तिथं गेल्यावर काय वाटत असावं बरं? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला तरी नाही वाटत की त्या व्यक्तीला ती जागा आपलीशी वाटेल. मी कधी प्रदर्शन भरवलं, तर ते मी वेगळ्या पद्धतीनं मांडेन. तिथं फक्त भिंतीवर लावलेले फोटो आणि त्यावर कुणीतरी येऊन बोलेल असं तरी ते नसेल. मी त्या लोकांना प्रत्यक्ष तिथं आणेन आणि ते इतरांशी संवाद साधू शकतील. प्रदर्शनाच्या त्या जागेला त्या परिसराशी जोडेन जिथली दृश्यं त्या फोटोंमध्ये टिपलेली आहेत,” ती तिचे विचार वेगाने मांडत होती. हैरुनिशाकडे बोलायला फक्त २० मिनिटं होती. त्यानंतर तिला कॉलेजच्या एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी परत जायचं होतं.
हैरुनिशा नवी दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात मास कम्युनिकेशनमध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेतेय. उत्तर चेन्नईतल्या एका मुस्लिम कुटुंबातील ही तरुणी उच्च शिक्षण घेणारी पहिलीच व्यक्ती आहे. “शिक्षणासाठी इतक्या दूर येणारी मी त्या भागातील पहिलीच मुलगी आहे. आमच्या समाजात स्त्रियांना घरीच राहण्यासाठी आणि पदवीपर्यंतचं शिक्षण न घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. मी १८ वर्षांची झाले तेव्हा माझ्यावरही लग्नासाठी दबाव आला होता. पण मी घर सोडून बाहेर पडले अन् फोटोग्राफीनं मला दाखवून दिलं की बाहेर एक जग खूप मोठं आहे,” ती सांगत होती.
















