“खाट विणणं माझ्या रक्तातच आहे,” स्मितहास्य करणाऱ्या कृष्णावती सांगतात; त्या सुतळीपासून खाट विणणाऱ्या तिसऱ्या पिढीतील कारागीर आहेत. “माझंलग्नही अशाच माणसाशी झालं ज्याला या कलेची आवड होती,” थारू आदिवासी समुदायातील ४५ वर्षीय कृष्णावती सांगतात.
गेल्या तीस वर्षांपासून कृष्णावती आणि त्यांचे पती चंद्रपाल सिंग राणा सुतळीच्या खाटा विणतात. हे पलंग लाकडी फळ्यांऐवजी असे सुतळीनं विणले जातात. ते लाकूड कापून खाटेचे पाय बनवतात अन् त्यानंतर सुतळीनं त्याचा तळ विणतात.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे लोक पलंगांपेक्षा खाट वापरणं पसंत करतात, त्यामुळे कारागीर मे ते सप्टेंबर या कालावधीत खाटा विणतात अन् इतर महिन्यांमध्ये शेतमजूर म्हणून काम करतात. कृष्णावतीला एक दिवसाला ३५० रुपये मजुरी मिळते तर चंद्रपाल यांना त्यापेक्षा शंभर रुपये जास्त मिळतात. त्यांना वर्षातून साधारण १२० ते १५० दिवस काम मिळतं.















