नोव्हेंबर महिना. आश्विन-कार्तिकच्या मौसमात वाऱ्याच्या अखंड झुळकांनी आसमंत थरथरत असतो. अशा काळात अंबिया खातून आपल्या कामात मग्न आहे. वाऱ्यावर उडणारा साडीचा पदर सावरत त्या काम करताहेत. त्यांच्या जीर्ण साडीवरील नक्षीदार फुलं जणू वाऱ्यानं डोलताहेत असा भास होतो. बेकी नदीच्या तीरावर नेहमीसारखीच दलदल आहे. त्या चिखलातच अंबिया खातूनचं घर उभंय. अंबिया खातूनचे हात कधी तागाच्या दोऱ्यांचे गुंते सोडवतात, तर कधी त्या दोऱ्यांत मणी ओवून, गाठी मारतात. समोर दरवर्षी पूरानं बेकी नदीच्या किनाऱ्याची धूप होते, नि ही बाई वर्षानुवर्षे तिथंच पोटापाण्यासाठी आपली कारीगरीही करत राहते.
अंबिया तागापासून तयार करतात, त्या वस्तूला कुणी ‘सिका’ म्हणतं कुणी ‘सिगा’. ही वस्तू घराघरात हँगर अर्थात लटकावणं म्हणून वापरात येते. हे सिके दिसायला शोभेची वस्तू वाटतात, पण त्यांना या भागात सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची कलाकृतीही मानलं जातं. आसाममधील ‘मिया’ मुस्लीम व बांगलादेशातील शेतकऱ्यांच्या घराघरात हे सिके दिसतात. हा भाग पूरप्रवण. त्यामुळं घरातल्या वस्तू कोरड्या करण्याकरता ‘वलाणी’सारखा या सिक्यांचा उपयोग होतो.
अंबिया खातूननं जिंदगीभर सिके बनवलेत. त्या आता ७१ वर्षाच्या आहेत. त्या पहाटेच उठतात, गवताचं छप्पर नि टिनच्या भिंती असलेलं त्यांचं घर, खंडीभर कामांची यादी घेऊन सज्जच असतं. अंबिया, स्वैपाक नि झाडलवण उरकून घेतात. मग सिके बनवू लागतात. त्यांच्या अंगणातच भोपळ्याच्या वेलीचा मांडव आहे. या मांडवाखालीच त्या आपली कलाकुसर करू लागतात. अंबिया खातूनच्या समोर तागाचा ढिग असतो, नि दोऱ्यांत ओवण्यासाठी ठेवलेले रंगीबेरंगी मणी. सूर्य वरवर चढत जातो तसतसं त्यांच्या डोईवरील वेलींच्या मांडवातून सूर्यप्रकाश झिरपू लागतो. त्या प्रकाशात अंबिया खातूनच्या पुढ्यातील मणी लकाकतात. या किरमीजी प्रकाशात जणू या बाईचं कष्टप्रद जगणंच चमकू लागतं.
















