दुर्गा दुर्गा बोले आमार
दग्ध होलो काया,
एकबार दे गो मा,
चोरोणेरी छाया

दुर्गा दुर्गा नाम घेता
जळे माझी काया
एक वेळ दे आई
चरणांची छाया

दुर्गादेवीचं गान गाताना विजय चित्रकार यांचा आवाज चढतो. त्यांच्यासारखे पैटकार चित्रकार आधी गाणं लिहितात आणि त्यानंतर चित्र साकारतात. चित्र अगदी १४ फूट लांब असू शकतं आणि ते प्रेक्षकांना दाखवताना त्यासोबत असते एक गोष्ट आणि संगीत.

विजय चित्रकार झारखंडच्या पूर्बी सिंघभूम जिल्ह्याच्या आमाडोबी गावी राहतात. ते सांगतात की पैटकार चित्रं स्थानिक संथाली कथा, गावाकडचं जीवन, निसर्ग आणि मिथकांवर आधारित असतात. “आमच्या चित्रांचा मुख्य विषय म्हणजे ग्रामीण संस्कृती. आम्ही आमच्या सभोवताली पाहतो ते सगळं काही आमच्या कलेत उतरतं,” ते सांगतात. वयाच्या १० व्या वर्षापासून ते ही कला जोपासत आहेत. “कर्मा नाच, बहा नाच किंवा रामायण, महाभारतातला एखादा प्रसंग, गावातलं एखादं दृश्य...” चित्रात काय काय असतं त्याची यादीच ते समोर मांडतात. या संथाली चित्रांमध्ये आणखी काय काय असतं बरं? “बाया रोजची कामं करतायत, गडी शेतात बैलं धरून निघालेत आणि आभाळात विहरणारे पक्षी.”

“मी माझ्या आजोबांककडून ही कला शिकलो. ते फार विख्यात चित्रकार होते आणि त्या काळी कलकत्त्याहून लोक त्यांना ऐकायला इथे यायचे.” त्यांच्या अनेक पिढ्या पैटकार चित्रं काढतायत. ते म्हणतात, “पट युक्त आकार, माने पैटीकार, इसी लिये पैटकार पेंटिंग आया.”

PHOTO • Ashwini Kumar Shukla
PHOTO • Ashwini Kumar Shukla

डावीकडेः विजय चित्रकार पूर्बी सिंघभूम जिल्ह्याच्या आमाडोबी गावात आपल्या घराबाहे पैटकार चित्रावर काम करतायत. उजवीकडेः पैटकार चित्रकार आधी गाणं लिहितात आणि नंतर त्यावर आधारित चित्र काढतात

PHOTO • Ashwini Kumar Shukla

कर्मा नाच दाखवणारं पैटकार चित्र. करम देवता म्हणजे नशिबाची देवता, तिच्या आराधनेत हा नाच केला जातो

पैटकार चित्रकलेचा उगम पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये झाला. पूर्वी राजघराण्यांमध्ये पांडुलिपी म्हणजे हाताने लिहिलेल्या कापडाच्या-कागदाच्या गुंडाळ्या असायच्या त्याचा प्रभाव या चित्रप्रकारावर आहे. अनेक बारकावे असलेली चित्रं आणि त्यासोबत कथाकथन असा हा कलाप्रकार आहे. “ही कला किती जुनी आहे हे सांगणं तसं अवघडच आहे कारण ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करण्यात आली आहे आणि त्याचा कसलाही लेखी पुरावा आपल्याला सापडत नाही,” प्रा. पुरुषोत्तम शर्मा सांगतात. ते रांची केंद्रीय विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक असून आदिवासी लोककथांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे

आमाडोबीमध्ये अनेक पैटकार कलाकार आहेत. ७१ वर्षीय अनिल चित्रकार हे गावातले सगळ्यात बुजुर्ग चित्रकार. “माझ्या प्रत्येक चित्रामध्ये एक गाणं आहे. आणि आम्ही ते गाणं गातो,” ते सांगतात. एका मोठ्या सणसोहळ्यातल्या कर्मा नाचाचं एक चित्र ते आम्हाला दाखवतात आणि सांगतात, “एकदा का डोक्यात एखादी गोष्ट आली की आम्ही त्याचं चित्र रेखाटतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते गाणं लिहिणं. त्यानंतर त्याचं चित्र काढणं. आणि अखेर ते चित्र गाणं गात लोकांपुढे सादर करणं.”

पैटकार चित्रं काढण्यासाठी आवश्यक असणारं गाण्याचं ज्ञान अनिल चित्रकार आणि विजय चित्रकार या दोघांकडेही आहे. अनिल काका सांगतात की संगीत ही अशी गोष्ट आहे की त्यात प्रत्येक भावनेसाठी गाणी आहेत. आनंद, दुःख, खुशी आणि उत्साह. “गावाकडे आम्ही आमच्या सणांची, महाकाव्यांमधली आणि देवी-देवतांची गाणी गातो – दुर्गा, काली, दाता कर्ण, नौका विलाश, मानसा मंगल आणि किती तरी,” ते सांगतात.

अनिल काका त्यांच्या वडलांकडून गाणं शिकले. पैटकार चित्रांशी संबंधित गाण्यांचा सगळ्यात मोठा साठा आज त्यांच्यापाशी आहे. “आम्ही [संथाली आणि हिंदू] सण सुरू असले की आमची चित्रं दाखवण्यासाठी गावोगावी फिरतो. एकतारा आणि पेटीवर आमची गाणी गातो. लोक आमची चित्रं विकत घ्यायचे. त्या बदल्यात पैसे किंवा ध्यान द्यायचे,” ते सांगतात.

व्हिडिओ पहाः चित्रं आणि गाण्यांचा संगम

पैटकार चित्रकला म्हणजे अनेक बारकावे असलेली चित्रं आणि कथाकथन असा कलाप्रकार. राजघराण्यातल्या पांडुलिपींचा प्रभाव या चित्रकलेवर आहे

अलिकडच्या काळात पैटकार चित्रांचा आकार कमी कमी होत गेला आहे. पूर्वी संथाल लोकांचा उगम कसा आणि कुठून झाला याची कथा सांगणारी चित्रं १२ ते १४ फूट लांबीची असायची. आता मात्र त्यांचा आकार ए४ कागदाइतका झालाय. २०० ते २००० रुपयांना ती विकली जातायत. “मोठी चित्रं विकली जात नाहीयेत, त्यामुळे आम्ही छोटी चित्रं काढायला सुरुवात केलीये. गावात जर चित्र विकत घ्यायला कुणी आलं तर आम्ही ४००-५०० रुपयांना आम्ही एक चित्र विकतो.”

अनिल काकांनी आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतला आहे. ते सांगतात की ही कला आज अगदी देशा-परदेशात माहीत झाली आहे पण त्या कलेच्या आधारे पोट भरणं मात्र शक्य नाही. “मोबाइल फोन आले आणि प्रत्यक्षात गाणं ऐकण्याच्या अनेक परंपरांना उतरती कळा लागली. आजकाल इतके मोबाइल फोन झालेत की गाण्याची, वादनाची परंपराच लोप पावत चालली आहे. जुनी परंपरा होती ती आता दिसेनाशी झालीये. आजकाल गाणी तरी कशी आहेत? फुलका फुलका चुल, उड्डी उड्डी जाये, ” ओले केस हवेत उडतायत अशा अर्थाच्या एका लोकप्रिय गाण्याची नक्कल करत अनिल काका सांगतात.

अनिल काका सांगतात की पूर्वी आमाडोबीमध्ये पैटकार चित्रं काढणारी किमान ४० घरं होती, आता मात्र अगदी बोटावर मोजण्याइतकी लोकं राहिली आहेत. “मी माझ्या किती तरी विद्यार्थ्यांना ही कला शिकवली होती पण त्यांना त्यात पैसा मिळाला नाही त्यामुळे त्यांनी ते सोडलं आणि आज ते मजुरी करतायत,” अनिल काका सांगतात. “मी माझ्या मुलांना सुद्धा ही कला शिकवली, पण त्यांचीही त्यातून पुरेशी कमाई होत नव्हती त्यामुळे त्यांनी ते काम सोडलं.” त्यांचा थोरला मुलगा राजमिस्त्री म्हणून जमशेदपूरला काम करतो आणि धाकटा मजुरी. अनिल काका आणि त्यांच्या पत्नी गावात एका छोट्या झोपडीत राहतात. त्यांची काही शेरडं आणि कोंबड्या आहेत. घराबाहेरच्या पिंजऱ्यात एक पोपट छान आराम करत बसलाय.

२०१३ साली झारखंड सरकारने आमाडोबी पर्यटन ग्राम म्हणून जाहीर केलं मात्र त्यानंतर अगदी मोजकेच पर्यटक इथे आले आहेत. “एखादा पर्यटक किंवा साहेब आला तर आम्ही त्यांच्यापुढे गाणी गातो आणि ते आम्हाला काही पैसे देतात. गेल्या वर्षी मी दोन चित्रं विकली,” ते सांगतात.

PHOTO • Ashwini Kumar Shukla
PHOTO • Ashwini Kumar Shukla

आमाडोबीमधले सर्वात ज्येष्ठ पैटकार कलावंत असलेले अनिल चित्रकार आपल्या चित्रांसह

PHOTO • Ashwini Kumar Shukla

बांदना पर्व हा सण आणि झारखंड मधल्या आदिवासी समूहांच्या विविध सणांमध्ये घडत असलेल्या गोष्टींवरची पैटकार चित्रं

कर्मा पूजा, बांदना पर्व या संथाली सणांमध्ये तसंच इतर काही हिंदू सणांमध्ये देखील हे कलाकार गावोगावी जाऊन आपली चित्रं विकतात. “पूर्वी आम्ही चित्रं विकण्यासाठी गावोगावी जायचो. खूप दूरवर जायचो आम्ही. अगदी बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगडपर्यंत,” अनिल काका सांगतात.

*****

विजय बाबू आम्हाला पैटकार चित्रं कशी काढतात ते सगळं दाखवतात. सुरुवातीला ते एका दगडावर थोडं पाणी टाकतात आणि दुसरा एक दगड त्यावर घासतात. त्यातून विटकरी रंग तयार होतो. त्यानंतर एक कुंचला हातात घेऊन त्या रंगाचा वापर करून ते चित्र रंगवायला सुरुवात करतात.

पैटकार चित्रांमध्ये वापरले जाणारे रंग नदीकाठचे दगड आणि पाना-फुलांपासून तयार केले जातात. दगड शोधणं हे सगळ्यात अवघड काम. “आम्हाला डोंगरात किंवा नदीकाठी जावं लागतं. चुनखडीचा दगड मिळायला कधी कधी तीन ते चार दिवस लागतात,” विजय बाबू सांगतात.

पिवळ्या रंगासाठी हळद, हिरव्या रंगासाठी शेंगा किंवा मिरची आणि जांभळ्या रंगासाठी टणटणीची फुलं. काळा रंगा तयार करण्यासाठी रॉकेलच्या चिमणीची काजळी गोळा करतात. लाल, पांढरा आणि विटकरी रंग दगडांपासून तयार केला जातो.

PHOTO • Ashwini Kumar Shukla
PHOTO • Ashwini Kumar Shukla

पैटकार चित्रांमध्ये वापरले जाणारे रंग नदीकाठचे दगड आणि पाना-फुलांपासून तयार केले जातात. उजवीकडेः विजय चित्रकार आपल्या घराबाहेर बसून चित्रं काढतायत

PHOTO • Ashwini Kumar Shukla
PHOTO • Ashwini Kumar Shukla

डावीकडेः विजय चित्रकार आपल्या घरी चहा बनवतायत. उजवीकडेः आमाडोबी गावातलं एक मातीचं संथाली घर

चित्रं कापडावर आणि कागदावर काढली जातात पण आज बहुतेक चित्रं कागदावर काढले जातात. त्यासाठी सत्तर किलोमीटरवरच्या जमशेदपूरहून कागद आणावा लागतो. “एक कागद ७० ते १२० रुपयांना मिळतो आणि त्यातून आम्ही छोट्या आकाराची चार चित्रं सहज काढू शकतो,” विजय बाबू सांगतात.

हे नैसर्गिक रंग कडुनिंबाच्या किंवा बाभळीच्या डिंकामध्ये मिसळले जातात. त्यामुळे चित्र टिकाऊ होतात. “तसं केल्यामुळे चित्रावर किडे येत नाहीत आणि ती आहेत तशी टिकून राहतात,” विजय बाबू म्हणतात. नैसर्गिक रंगांचा वापर ही या चित्रांची खासियत असल्याचं ते सांगतात.

*****

आठ वर्षांपूर्वी अनिल काकांना दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू झाला. दृष्टी अधू झाली आणि त्यांनी चित्रं काढणं थांबवलं. “मला नीटसं दिसत नाही. मी रेखाटनं करतो, गाणी गातो पण मला रंग भरता येत नाहीत,” आपलं एक चित्र दाखवत ते म्हणतात. या चित्रावर दोन नावं आहेत. अनिल काकांचं कारण त्यांनी रेषाकाम केलंय आणि त्यांच्या विद्यार्थ्याने रंग भरले म्हणून ते दुसरं नाव.

PHOTO • Ashwini Kumar Shukla
PHOTO • Ashwini Kumar Shukla

अंजना पटेकर निष्णात पैटकार चित्रकार आहेत. आमाडोबीतल्या मोजक्यात स्त्रियांना ही चित्रकला येते. पण त्या आताशा ही चित्रं काढत नाहीत

PHOTO • Ashwini Kumar Shukla
PHOTO • Ashwini Kumar Shukla

संथाली जगणं दाखवणारी पैटकार चित्रं. ‘आमच्या चित्रांचा मुख्य विषय म्हणजे ग्रामीण संस्कृती. आम्ही आमच्या सभोवताली पाहतो ते सगळं काही आमच्या कलेत उतरतं,’ विजय बाबू सांगतात

अंजना पटेकर, वय ३६ निष्णात पैटकर कलाकार आहेत. “मी हे काम आता थांबवलंय. माझ्या नवऱ्याला आवडत नाही. घरातलं काम असतं त्यात मी ही चित्रं कशाला काढत बसते त्याला समजतच नाही. त्यात खूप मेहनत आहे. बदल्यात काही मिळत पण नाही, मग कशासाठी हे करायचं?” त्या म्हणतात. अंजनाताईंची ५० चित्रं तयार आहेत पण ती विकलीच गेली नाहीयेत. आपल्या मुलांना ही कला शिकण्यात कसलाच रस नसल्याचं त्या सांगतात.

अंजना ताईसारखीच २४ वर्षीय गणेश गयानची कहाणी. कधी काळी अगदी उत्तम पैटकार चित्रं काढणारा गणेश आज किराणा मालाच्या दुकानात काम करतोय आणि कधी कधी मजुरीला जातो. “गेल्या वर्षभरात मी फक्त तीन चित्रं विकू शकलो. कमाईसाठी आम्ही या कामावर विसंबून राहिलो तर आम्ही घर तरी कसं चालवायचं?” तो विचारतो.

“या नव्या पिढीला गाणी गाता येत नाहीत. कुणी गाणं आणि गोष्टी सांगण्याची कला शिकलं तर पैटकार चित्रकला टिकेल. नाही तर तिचं मरण पक्कं आहे,” अनिल काका म्हणतात.

या गोष्टीतली पैटकार गाणी जोशुआ बोधिनेत्र याने भाषांतरित केली आहेत. त्यासाठी त्यांना सीताराम बास्के आणि रोनित हेम्ब्रोम यांची मदत झाली आहे.

या वार्तांकनासाठी मृणालिनी मुखर्जी फौडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.

Ashwini Kumar Shukla

Ashwini Kumar Shukla is a freelance journalist based in Jharkhand and a graduate of the Indian Institute of Mass Communication (2018-2019), New Delhi. He is a PARI-MMF fellow for 2023.

Other stories by Ashwini Kumar Shukla
Editor : Sreya Urs

Sreya Urs is an independent writer and editor based in Bangalore. She has over 30 years of experience in print and television media.

Other stories by Sreya Urs
Editor : PARI Desk

PARI Desk is the nerve centre of our editorial work. The team works with reporters, researchers, photographers, filmmakers and translators located across the country. The Desk supports and manages the production and publication of text, video, audio and research reports published by PARI.

Other stories by PARI Desk
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale