“मला प्रत्येत मडकं साधारणपणे ३००० वेळा लाकडानं थापटावं लागतं,” असं सांगून मीनाक्षी ते काम पुढे सुरु ठेवतात . ‘हे कच्चं  मडकं’ (भट्टीत न भाजलेलं ) स्वंयपाकाच्या इतर कुठल्याही भांड्यांसारखंच दिसतं . पण ह्या मडक्यापासून त्या एक वाद्य बनवणार आहेत. मातीपासून बनलेलं ताल वाद्य. त्या ते मडकं मांडीवर ठेवतात आणि एका थापटण्यानं त्याच्या बाहेरच्या बाजूवर हळूहळू थापटायला लागतात. हे काम पूर्ण झालं की या मडक्याचं ‘घटम’मधे रूपान्तर होईल. कर्नाटकी संगीताच्या मैफलीत नेहमी वाजवलं जाणारं एक अव्वल दर्जाचं संगीत वाद्य. मीनाक्षी केसवन घटम बनवणाऱ्या एक तज्ज्ञ कारागीर आहेत. ६३ वर्षांच्या मीनाक्षी आणि त्यांचं कुटुंब ‘मनमदुराई ‘ नावाचं खास घटम बनवणारं एकमेव कुटुंब असावं.

मनमदुराई हे मीनाक्षींचं गाव तमिळनाडूमध्ये मदुराईपासून गाडीने एक तासाच्या अंतरावर आहे. त्या सांगतात की पंधराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यांच्या सासरचं कुटुंब गेल्या चार पिढ्या घटम बनवण्याचं काम करत होतं . हे कसब त्या आपला नवरा आणि सासरे यांच्याकडून शिकल्या. त्यांचा मुलगा रमेश सांगतो, “ या कामावर प्रभुत्व मिळवायला सहा वर्ष लागतात.” पण ते सुद्धा जलद शिकणाऱ्यासाठी . “ तुम्ही कुंभारकाम केलं नसेल तर तुम्हाला त्याहून जास्त काळ लागतो.”

“ घटममधून निघणारा नाद सुधारणं हे सर्वात कौशल्याचं काम आहे,” मीनाक्षी उजव्या हातानं घटमवर थापट्या मारत आम्हाला समजावून सांगतात. त्याच वेळी त्या डाव्या हातानं घटमच्या आतल्या बाजूला एक गोल दगड फिरवत असतात. “ (थापटताना ) घटमच्या भिंती कोसळू नयेत म्हणून हे करायला लागतं.” असं सांगत त्या क्षणभर विश्रांती घेतात. गेली चार दशकं चिखलाला आकार देऊन देऊन त्यांचे हात सारखे दुखत असतात. ही वेदना त्यांच्या थकलेल्या खांद्यांपासून बोटांपर्यंत कशी पोहोचते वर्णन करता करताच त्या परत लाकडाचा घोटा उचलतात. आपल्या मांडीवर घटम नीट ठेवतात आणि घटम थापटण्याचा आवाज सुरु होतो.

PHOTO • Aparna Karthikeyan

मीनाक्षी घटमवर आघात करताना. (डावीकडे ) मडक्याच्या आतली बाजू गुळगुळीत करायसाठी वापरण्याचा गोल दगड त्यांनी हातात धरला आहे

आम्ही मनमदुराईमधल्या ‘पुरस्कार मिळालेल्या कुंभार’ मीनाक्षींना भेटायला तिथे  गेलो होतो. आजकाल त्यांची अशी ख्याती झाली आहे. हा पुरस्कार प्रतिष्ठित अशा संगीत नाटक अकादमीकडून मिळाला होता. भारताच्या राष्ट्र्पतींकडून मीनाक्षी हे पारितोषिक घेत असतानाचा त्यांचा एक फोटो आहे. तो त्यांना फ्रेम करून बक्षीस मिळाला आहे. बैठकीच्या खोलीत या  फोटोच्या शेजारीच त्यांच्या दिवंगत नवऱ्याचा हार घातलेला फोटो लावला आहे. दिल्लीची ती भेट अगदी लक्षात रहावी अशीच झाली असं रमेश सांगतो. “माझी आई तेव्हा पहिल्यांदाच विमानात बसली होती. एकीकडे उत्तेजितही झाली होती आणि घाबरलीही होती. ११ एप्रिल २०१४. “आम्हाला ए. सी. बस मधून राष्ट्रपती भवनात नेलं होतं . आणि कदाचित त्या संध्याकाळी वाद्य बनवणाऱ्या कारागिरांपैकी पुरस्कार मिळालेली ती पहिली कारागीर ठरली.”

रमेशला त्याच्या आईचा अभिमान वाटतो. तो स्वतःसुद्धा एक निष्णात कारागीर आहे. तो आम्हाला अकादमीनं दिलेलं  प्रशस्तिपत्रक वाचून दाखवतो. त्यात लिहिलं आहे - अव्वल दर्जाचं घटम करायला लागणारं संपूर्ण ज्ञान असलेली ही बहुदा एकमेव कारागीर आहे.  त्यांनी तयार केलेली शेकडो घटम वादकांबरोबर प्रवास करून जगभर पोहोचली आहेत.

या मडक्यांसाठी वापरलेली माती सुद्धा काही अंतर प्रवास करून त्यांच्याकडे पोचते. “आम्ही ती पाच ते सहा तळ्यांमधून गोळा करतो,”  रमेश सांगतो. माती एक दिवस सुकवतात आणि मग वैगयी नदीतली बारीक रेती त्या मातीत मिसळतात. “आम्ही चांगला नाद निघावा म्हणून त्यात ग्रॅफाईट आणि शिसं घालतो. मग ती माती पायांनी सहा तास तुडवतो. मग दोन दिवस तसीच ठेवून देतो. जेव्हा ती माती चांगली मजबून होते तेव्हा आम्ही त्यापासून मडकं घडवतो.”

PHOTO • Aparna Karthikeyan

मीनाक्षी आणि त्यांचं ‘अकॅडमी अवॉर्ड’( उजवीकडे) त्या राष्ट्र्पतींकडून पारितोषक घेतानाच फोटो फ्रेम केला आहे

रमेश त्याचं काम अगदी सहजतेनं  करतो. तो विजेवर चालणाऱ्या चाकासमोर बसतो. कालवलेल्या मातीचा एक गोळा तो हातात घेऊन थापटतो आणि चाकावर मध्यभागी ठेवतो. चाक गरागरा फिरत असतानाच त्या गोळ्याला आपल्या हातांनी भरभर आकार देतो. मडकं तयार झालं की त्याच्या बाजूंवर थोड्या चापट्या मारून ते ‘पूर्ण’ करतात.  मीनाक्षी या कच्च्या मडक्यांवर काम करतात. प्रत्येकाचं वजन चांगलं सोळा किलो असतं. पुढचे दोन आठवडे , घटम सावलीत वाळवतात. नंतर चार तास कडकडीत उन्हात ठेवतात. यानंतर त्यांचं कुटुंब त्या मडक्याला पिवळं आणि लाल पॉलिश लावतात. आणि ते घरच्या भट्टीत बारा तासापर्यंत भाजलं जातं . भाजल्यानंतर त्याचं वजन निम्मं होतं . या सगळ्या प्रक्रियेतून तयार झालेली ही आठ किलो माती आता सुंदर संगीत निर्माण करू शकते.

घटम बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक वर्षांपासून बरेच बदल होत गेले आहेत. हल्ली घटम वादकांना जसं घटम हवं असतं तसं ते बनतं - हलकं, लहान, जास्त सुबक. “इकडून तिकडे न्यायला सोपं पडतं,” रमेश सांगतो. मनमदुराई घटम मात्र आजही सर्वात जड असतात. स्वयंपाकाच्या भांड्यांपेक्षा घटमचं वजन तिपटीने जास्त असतं. चेन्नई आणि बंगळुरूमधे तयार होणारी घटम पातळ आणि हलकी असतात.

बनवण्याचं कौशल्य आहेच, पण मनमदुराईच्या मातीलाही थोडं श्रेय द्यायला पाहिजे. घटमचा नाद एकदम स्पष्ट येतो ते या मातीमुळे. दुर्दैवानं तिथली सर्वात उत्तम माती विटांसाठी वापरतात. त्याचा ह्या कारागिरांच्या उपजिविकेवर परिणाम झाला आहे . पण अजूनही रमेशला त्याच्या मुली आणि भाडेमंडळींना हे कसब अगदी आनंदाने शिकवतो. घटम बनवणारी ही कुटुंबातली पाचवी पिढी आहे. पैसे महत्वाचे नाहीत. एका घटमचे त्यांना “सहाशे रुपये मिळतात आता. ” आता तुलना करा की एखादा बोनचायनाचा छोटासा ब्रँडेड वाडगासुद्धा काही हजार रुपयांना मिळतो.

PHOTO • Aparna Karthikeyan

विजेवरचं चाक फिरवताना रमेश (डावीकडे ); मातीचा गोळा घेऊन त्याला आकार देताना (उजवीकडे)

ह्या कुटुंबाला त्यांची १६० वर्षांची जुनी परंपरा सुरु ठेवायची आहे. रमेश सांगतो,  “मी दहा वर्षांचा असताना आमच्या घरी एक अमेरिकन पत्रकार आली होती. आम्ही या कामातून किती पैसे कमावतो हे कळल्यावर तिला धक्काच बसला. तिनं मला आणि माझ्या बहिणीला उटीमधल्या कॉन्व्हेंट शाळेत पाठवायची तयारी दाखवली. आमच्या बाबांनी याला नकार दिला. आम्ही कुंभारकामाटं कसब शिकावं अशी त्यांची इच्छा होती. तरुण रमेश त्याच्या ९० वर्षांच्या आजोबांच्या हाताखाली हे काम शिकला . “ते मृत्यूच्या अगदी दोन दिवस आधीपर्यंत काम करत होते.” मीनाक्षींच्या मते त्यांचे सासरे इतके जगले कारण त्यांनी कोणालाही आपला फोटो काढू दिला नव्हता. त्यांचं हे मत ऐकताच. अपराधी वाटून मी माझा कॅमेरा बाजूला ठेवते.

कामाचा मोबदला कमी असला तरी त्यांची तक्रार नाही. या कामातून आपण संगीताची सेवा करत असल्याची त्यांची भावना आहे. घटम हे वाद्य बराच काळ फक्त साथीला असले तरी आता त्याच्या एकल वादनाचे कार्यक्रमही व्हायला लागले आहेत. मीनाक्षींनी असा  एखाददुसरा कार्यक्रम पहिला आहे. रमेश मला त्याबद्दल सांगतो. त्याची आई खूप बोलणाऱ्यांतली नाही. ‘अकॅडमी अवॉर्ड’ म्हणजेच  संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या तेव्हा त्या स्वतःबद्दल बोलण्यात अगदी मागे असायच्या. “तिनं दिलेला पहिला मोठा इंटरव्यू हा गेल्या वर्षी आकाशवाणीसाठी होता. त्यात तिनं माझ्या वडिलांना कोणतं कोळंबु (एक प्रकारची आमटी) आवडायचं हेसुद्धा सांगितलं,” असं सांगून तो हसतो.

त्यांच्या उपजिविकेबद्दलही त्या अगदी मोजकं बोलतात.. घटम बनवून मिळणारं उत्पन्न हे काही त्यांचं मुख्य उत्पन्न नाही. इतर अनेक प्रकारची मातीची भांडी तयार करून ते कमाई करतात. उदाहरणार्थ सिद्ध औषधी करायला लागणारी भांडी. एका संपूर्ण वर्षभरात मीनाक्षी, रमेश, त्याची बायको मोहना आणि त्याची बहीण के. परमेश्वरी हे सगळेजण हाताखाली काही माणसं घेऊन साधारण ४०० घटम बनवतात. त्यापैकी निम्मे विकले जातात.उत्तम नादनिर्मितीच्या कसोटीवर बाकीचे नापास होतात. घटम भट्टीत भाजल्यानंतरच ते लक्षात येतं. कधी चांगले दिसणारे घटम संगीतासाठी चांगले नसतात.

PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः रमेश चाकावरून कच्चं मडकं उचलून घरात घेऊन जाताना. उजवीकडे : घरात टेराकोटाचे उंच उंच ढिगारे रचले आहेत. फक्त घटम प्लास्टिकच्या खुर्चीवर ठेवलं आहे

“ह्या धंद्यात आर्थिक मदत काहीच मिळत नाही. या कलेला राजाश्रय नाही. आणि वादकांना जसे पुरस्कार मिळतात तसे आम्हाला काही मिळत नाहीत,” रमेश खंतावतो. पण सगळ्या अडचणी असूनही आपलं कुटुंब अनेक लोकांना रोजगार पुरवतं याचा त्याला अभिमान वाटतो.

आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो, त्या दिवशी त्यांच्या हाताखालची माणसं अर्धवट सुकलेली मडकी रिमझिमत्या पावसात भिजू नयेत म्हणून घरात नेत होते. आतल्या खोलीभर टेराकोटाच्या वस्तू भरल्या होत्या. ढगाळलेलं, कुंद वातावरण, गडगडाट सुरूच. दुपारही ओलीचिंबच असणार याची खात्री होती. पावसाळा म्हणजे वैताग आहे, सगळे कुरकुरतात. रमेशचं काम थांबल्यानं तो सहज म्हणून एक घटम वाजवतो. मातीचा ताजा लेप लागलेले त्याचे हात आणि पाय चंदनाच्या रंगाचे दिसतात. घटमच्या तोंडाजवळ बोटं आपटून तो एक तीव्र धातूसारखा आवाज काढतो. तो म्हणतो, “मी काही घटम वाजवायला शिकलो नाही.” पण त्याला ताल आणि लयीची चांगलीच जण असल्याचं दिसतं.

बऱ्यात तालवाद्यात प्राण्याचं कातडं वापरतात. “फक्त हेच वाद्य पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे.” पृथ्वीपासून माती मिळते, वायू आणि सूर्य ती वाळवतात, पाणी त्याला आकार देतं आणि अग्नी त्याला भाजून पक्कं करतो. रमेश माणसाच्या कष्टांबद्दल काही म्हणत नाही. त्याला त्याची गरजच नाही. कारण घराच्या आतून आम्हाला आवाज ऐकू येत असतो - घटमच्या बाजू गुळगुळीत होईपर्यंत आणि त्याचा नाद उत्कृष्ट होईपर्यंत मीनाक्षी घटम थापटत राहतात.

अनुवादः सोनिया वीरकर

Aparna Karthikeyan

Aparna Karthikeyan is an independent journalist, author and Senior Fellow, PARI. Her non-fiction book 'Nine Rupees an Hour' documents the disappearing livelihoods of Tamil Nadu. She has written five books for children. Aparna lives in Chennai with her family and dogs.

Other stories by Aparna Karthikeyan
Translator : Sonia Virkar

Sonia Virkar is based in Mumbai and translates from English and Hindi into Marathi. Her areas of interest are environment, education and psychology.

Other stories by Sonia Virkar