कांता भिसेंची मुलगी जग सोडून गेली त्याला पाच वर्षं होऊन गेलीयेत. आज त्या तिच्याबद्दल बोलतायत कारण त्यांच्या मनात संताप आहे. “आमच्या गरिबीने आमची लेक नेली,” कांता म्हणतात. २० जानेवारी २०१६ रोजी त्यांच्या मुलीने, मोहिनी भिसे हिने आपलं आयुष्यं संपवलं होतं.

मृत्यूसमयी मोहिनी १८ वर्षांची होती, बारावीची विद्यार्थिनी. “बारावीनंतर तिला शिकविण्याची काही आमची ऐपत नव्हती. म्हणून तिचं लग्न लावून द्यावं म्हणून आम्ही पाहुणे हुडकायलो होतो,” ४२ वर्षीय कांता सांगतात. त्या लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली गावच्या रहिवासी आहेत.

लग्न म्हणजे खर्च आला. त्यामुळे कांता आणि त्यांचे पती पांडुरंग, वय ४५, काळजीत होते. “आम्ही दोघं शेतात मजुरीला जाताव. मोहिनीच्या लग्नासाठी पैसा उभा करणं काही आमच्याच्याने हुईल असं काही वाटेना गेलतं. त्या टायमाला १ लाख हुंडा सुरू होता.”

या दोघांवर आधीच एका खाजगी सावकाराचं अडीच लाखांचं कर्ज होतं, महिना ५ टक्के व्याजाने घेतलेलं. २०१३ साली त्यांच्या थोरल्या मुलीच्या, अश्विनीच्या लग्नासाठी हे कर्ज काढलेलं होतं. मोहिनीच्या लग्नासाठी जमीन विकण्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नव्हता – जमिनीचे २ लाख तरी आले असते.

भिसे वाघोलीत त्यांची एकरभर पडक जमीन होती. “पाणी नाही अन् आमच्या भागात कायमचाच दुष्काळ,” कांता सांगतात. २०१६ साली दुसऱ्याच्या रानात मजुरीला गेलं तर कांतांना १५० तर पांडुरंग यांना ३०० रुपये रोज मिळत होता. दोघांत मिळून महिन्याला दोन-अडीच हजारांची कमाई होत होती.

व्हिडिओ पहाः ‘आमच्या गरिबीने आमची लेक नेली’

एका रात्री आई-वडलांची जमीन विकण्याची चर्चा मोहिनीच्या कानावर पडली. काही दिवसांनी तिने जीव दिला. “आम्ही रानात कामाला गेलतो, तेव्हाच तिने घरी फाशी घेतली,” कांता सांगतात.

मोहिनीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लिहिलं होतं की आपल्या कर्जबाजारी पित्यावरचा लग्नाच्या खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी ती जीव देत आहे. हुंड्याच्या प्रथेबद्दलही तिने तक्रार केली होती आणि ती लवकरात लवकर बंद व्हावी अशी याचनाही. आपल्या अंत्यसंस्कारावर पैसा खर्च करू नका अशी विनंती करून उलट तो पैसा आपल्या भावंडांच्या शिक्षणावर खर्च करा असं ती सांगून गेली होती. तिची भावंडं निकिता आणि अनिकेत तेव्हा सातवी आणि नववीत शिक्षण घेत होते.

तिच्या मृत्यूनंतर किती तरी राजकीय नेते, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि नटनट्या त्यांना भेटून गेल्या, कांता सांगतात. “सगळे म्हणालते की पोरांच्या शिक्षणाची काळजी करू नका. आम्ही पाहतो. सरकारी अधिकारी म्हटले की सरकारी योजनेखाली [प्रधानमंत्री आवास योजना] तुम्हाला लवकरच घरकुल भेटेल.” फक्त घरकुल नाही, “सरकारी योजनेखाली आम्हाला विजेचं कनेक्शन आणि गॅस भेटेल असं सुद्धा ते बोलले होते तेव्हा. यातलं काही बी आजपातुर भेटलेलं नाही.”

भिसे वाघोलीच्या वेशीवर असलेलं त्यांचं घर नुसत्या विटा रचून उभं केलंय. “धड फरशी नाही. साप सरडे घरात घुसतात. पोरं बिनघोर झोपावी म्हणून आमचा डोळ्याला डोळा लागत नाही,” कांता म्हणतात. “एवढे सगळे लोक तेव्हा आलते, त्यांना नंतर भेटावं म्हटलं तर पुन्हा काही ते आमच्याशी बोलले सुदिक नाहीत.”

Mohini Bhise was only 18 when she died by suicide
PHOTO • Ira Deulgaonkar

मोहिनी भिसेने आत्महत्या करून जीवन संपवलं तेव्हा ती केवळ १८ वर्षांची होती

मोहिनीने चिठ्ठीत लिहिलं होतं की आपल्या कर्जबाजारी पित्यावरचा लग्नाच्या खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी ती जीव देत आहे. हुंड्याच्या प्रथेबद्दलही तक्रार करून ती लवकरात लवकर बंद व्हावी अशी याचनाही तिने केली होती

त्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. “आमचं रोजचं दुःख तुम्हाला काय आणि किती सांगायचं? सगळ्या बाजूने निस्ती कोंडी झालीये,” कांता म्हणतात. २०१६ सालापासून दुष्काळामुळे त्यांना गावात फारसा काही रोजगार मिळालेला नाही. “रोजची मजुरी तवा २०१४ साली होती तितकीच हाय, पण गरजेच्या वस्तूंच्या किंमती तेवढ्याच आहेत का?”

जी काही तुटपुंजी कमाई होते, त्यातले ६०० रुपये कांता बाजूला काढून ठेवतात, त्यांच्या मधुमेहावरच्या औषधांसाठी. २०१७ पासून त्यांना आणि पांडुरंग यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झालाय. “आमच्या तब्येतीची काळजी सरकार का घेईना झालंय?” कांता संतापून विचारतात. “साध्या तापीच्या गोळ्यासुद्धा ९० रुपयाखाली येत नाहीत. आमच्यासारख्या लोकावाला काही सवलत मिळावी का नाही?”

रेशनवर त्यांना मिळणारं धान्य देखील निकृष्ट दर्जाचं आहे, त्या सांगतात. “आम्हाला [शिधापत्रिका धारकांना] मिळणारा गहू आणि तांदूळ इतका खराब राहतो की किती तरी लोक बाजारातून धान्य खरेदी करालेत. पण आमच्यासारख्याला परवडत नाही, त्यांचं काय?” एक तर कल्याणकारी योजना त्यांच्यापासून लांबच आहेत आणि त्यातली एखादी योजना आलीच तर त्याचा लोकांना फायदा मिळतच नाही, त्या म्हणतात.

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या लातूरमधल्या जनतेला अशा सगळ्या मदतीची फार गरज आहे. वर्षानुवर्षं शेतीवरच्या अरिष्टामुळे लोक गरिबी आणि कर्जाच्या विळख्यात ढकलले जात आहेत. मदतीच्या योजनांनी त्यांच्या अडचणी काही दूर केलेल्या नाहीत. आणि त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. मोहिनीने आत्महत्या केली त्याच्या आधीच्या वर्षी, २०१५ साली, मराठवाड्यात १,१३३ शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं, २०२० साली ६९३ आत्महत्यांची नोंद झाली आहे.

आपल्या भविष्याबद्दल काही कांता फारशा आशावादी नाहीत. “आमच्या लेकीने आयुष्य संपवलं, तिला वाटलं आमचं आयुष्य जरा सुधरंल. आता तिला कसं सांगावं की या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची जिंदगी कधीच सुधरायची नाही म्हणून.”

Ira Deulgaonkar

Ira Deulgaonkar is a 2020 PARI intern. She is a Bachelor of Economics student at Symbiosis School of Economics, Pune.

Other stories by Ira Deulgaonkar
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale