“माझ्याकडचा धागा संपलाय. होता तो पैसाही संपायला लागलाय. पण या टाळेबंदीमुळे मी शेठला [तयार] साड्या पण देऊ शकत नाहीये,” बुडवार गावचा चंदेरी कापडाचा विणकर असणारा सुरेश कोळी सांगतो.
कोविड-१९ मुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीला आठवडाही झालेला नाही, आणि ३१ वर्षीय सुरेश यांच्याकडे जो काही धागा होता त्याच्या साड्या विणून झाल्या आहेत. तीन विणलेल्या साड्या प्राणपूर गावचे चंदेरी कापडाचे व्यापारी आनंदी लाल यांना द्यायच्या होत्या.
कोळींचं गाव उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात, बेतवा नदीवरच्या राजघाट धरणाजवळ आहे. नदीच्या पल्याडच्या तीरावर मध्य प्रदेशातल्या अशोकनगर जिल्ह्यात चंदेरी हे नगर आहे. याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुतासाठी प्रसिद्ध. शेठचं गाव प्राणपूर तिथे जवळच आहे.
बुडवार आणि चंदेरीची वाट पोलिसांनी आडकाठ्या लावून बंद केलीये. ३२ किलोमीटरचा हा रस्ता पण सुरेश काही आनंदी लाल यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीयेत. “काय चाललंय तेच कळत नाहीये. जे दिल्लीहून घरी परततायत त्यांना पोलिस पकडून नेतायत,” सुरेश सांगतो. “आमच्या गावात ही बिमारी येईल तरी कशी? पण सरकारने आमचा जिल्हा पण बंद करून टाकलाय आणि आमचं सगळ्या जगण्याचीच उलथापालथ झालीये.”
सुरेशने आनंदी लाल यांच्याकडे तीन साड्यांचे ५,००० रुपये मागितले होते. “त्यांनी फक्त ५०० रुपये पाठवलेत, बाजारपेठा सुरू होत नाहीत तोपर्यंत पूर्ण पैसे देता येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे,” तो सांगतो.
टाळेबंदीच्या आधी शेठ सुरेशला कच्चा माल – सुत, रेशमाच्या लडी आणि जर – आणि साड्या, ओढण्या, स्टोल, काही मऊसूत अभ्र्यासारखे प्रकार किंवा नुसतं कापड विणण्यासाठी काही कमिशन द्यायचे. दर ठरलेला असायचा आणि आणि पैसे माल देताना आणि नेहमीच रोकड स्वरुपात केलं जायचं.
टाळेबंदीमुळे विणकर आणि त्यांच्या व्यापाऱ्यांमधली ही व्यवस्थाच बिघडून गेलीये. एप्रिलचा पहिला आठवडा उजाडला तेव्हा काम चालू ठेवण्यासाठी सुरेशला आणखी धागा आणि जर गरजेची होती, आणि कुटुंब चालवण्यासाठी पैसाही. तो हतबल होऊन रोज आनंदी लाल यांना फोन करत होता. शेवटी शेठनी २७ एप्रिल रोजी सुरेश यांना आडकाठ्यांपाशी भेटायचं कबूल केलं. त्यांनी त्याला धाग्याची रिळं आणि मेच्या अखेरीपर्यंत चार साड्या विणण्यासाठी ४,००० रुपयांची उचल दिली. बाकी पैसे नंतर मिळतील असं ते म्हणाले.
सुरेश आणि त्याचं कुटुंब परंपरागत विणकर असलेल्या कोळी (किंवा ‘कोरी’) समाजाचे आहेत, त्यांची गणना अनुसूचित जातींमध्ये केली जाते. सुरेश त्याच्या वडलांकडून सुमारे १४ वर्षांपूर्वी विणकाम शिकला. चंदेरी नगरीतल्या विणकरांमध्ये प्रामुख्याने कोळी आणि इतर मागासवर्गीयांमध्ये येणारे मुस्लिम अन्सारी समाजाचे लोक आहेत.
आम्ही २०१९च्या डिसेंबरमध्ये भेटलो होतो तेव्हा सुरेशचा हात असा चालत होता जसा एखाद्या पियानोवादकाचा चालतो. खटके दाबत, लाकडी धाव वर खाली आणि डावीकडून उजवीकडे अशी तालात फिरत होती, त्याचा नाद त्या खोलीत भरून राहिला होता. सुती बाणा आखीवपणे रेशमी ताण्यात विणला जाता होता. टाळेबंदी लागायच्या आधी तो दिवसाचे जवळ जवळ १० तास, आणि जास्त काम असलं तर कधी कधी १४ तास मागावर बसलेला असायचा.
चंदेरी विणकामामध्ये प्रक्रिया न केलेलं रेशीम वापरलं जातं आणि त्यामुळेच हे सुत इतकं तलम दिसतं. चंदेरी सुताच्या सगळ्या प्रकारांमध्ये सगळ्यात जास्त मागणी आहे ती चंदेरी साडीला. तिचे हलके रंग, रेशमी झळाळी आणि जरीचे काठ आणि बुट्ट्या यामुळे ही साडी ओळखली जाते. गेली ५०० वर्षं चंदेरी मुलुखात या साड्या विणल्या जातायत आणि २००५ साली या साडीला भौगोलिक चिन्हांकन मिळालं.
चंदेरीच्या व्यापारात सगळीच उलथापालथ झालीये. थोड्याफार पैशासाठी विणकरांना व्यापाऱ्यांशी सौदे करावे लागतायत. किरकोळ बाजारात उठावच नाही, त्याचा जबर फटका त्यांनाच बसलाय
एखादी साधी साडी विणण्यासाठी तीन ते चार दिवस लागू शकतात. पण जरीची बुट्टी असणाऱ्या साडीचं काम तिच्यावर किती नाजूक काम आहे त्यानुसार अगदी ८ ते ३० दिवस चालू शकतं. विणकामातली लय आणि एकतानता आणि संपूर्ण एकाग्रता यातूनच एकमेव अशी चंदेरी साडी विणली जाते.
टाळेबंदी लागण्याआधी सुरेशकडे वर्षभर नियमित काम असायचं, जून अखेर ते ऑगस्ट अखेर एवढे पावसाळ्याचे दोन महिने सोडून. कारण तेव्हा दमटपणामुळे सुत फुगतं. “खूप बारीक काम तेही तासंतास. पण मला विणायला आवडतं. माझं पोट आणि माझा चरितार्थ त्यावर आहे. याशिवाय दुसरं काहीच मला माहित नाहीये. आमच्याकडे ना जमीन ना गाठीला पैसा, ज्याच्या आधारे आम्ही या संकटावर मात करू शकू,” सुरेश म्हणतो.
चंदेरी विणकरांना ठोक बाजारात ज्या किमतीला माल विकला जातो त्याच्या २५-३० टक्के इतकी रक्कम मिळते. साधी, साधा पदर असणारी साडी शेठ किरकोळ व्यापाऱ्याला २,००० रुपयाला विकत असले तर त्यातले ६०० रुपये सुरेशला मिळतात. त्यामागे चार दिवसांची मेहनत असते. तो विणतो त्यातल्या बऱ्याच साड्या ठोक बाजारात ५,००० रुपयांच्या आसपास विकल्या जातात, आणि प्रत्येक साडीला किमान आठ दिवस तरी लागतात. खूप नाजूक बुट्टीकाम असणाऱ्या साड्या अगदी २०,००० रुपयांपुढे जातात आणि एकेक साडी विणायला महिनाही लागू शकतो. त्याहूनही नाजूक कलाकुसर असणाऱ्या साडीतून विणकर अगदी १२,००० रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.
बुडवार गावातल्या सुरेशच्या तीन खोल्यांच्या घरातली एक खोली दोन मागांनी व्यापलेली आहे. सुरेश आपली पत्नी श्यामबाई, पाच वर्षांची मुलगी आणि आई चामुबाई असे सगळे एकत्र राहतात.
नियमित काम असतं तेव्हा हे दोन माग तालात सुरू असतात, आणि रोज साड्या तयार होत असतात. वडलांनी विकत घेतलेल्या मागावर सुरेश विणकाम करतो. श्यामबाई दुसऱ्या मागावर विणते. दोघं मिळून महिन्याला १०,००० ते १५,००० रुपये कमाई करतात.
श्यामबाई चंदेरीच्याच एका विणकर कुटुंबात लहानाच्या मोठ्या झाल्या. वडील आणि भावाकडून त्या विणकाम शिकल्या. “माझं सुरेशशी लग्न झालं तेव्हा खोलीत एकच माग होता. मी थोडी फार मदत करायचे पण आमची कमाई काही वाढत नव्हती. दोन वर्षांपूर्वी आम्ही ५०,००० रुपये कर्ज काढलं आणि माझ्यासाठी नवा माग घेतला. त्यामुळे आता आम्ही जास्त साड्या आणि कापड विणू शकतोय,” श्यामबाई म्हणाली. विणकरांसाठीच्या विशेष कर्ज योजनेत बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे महिना १,१०० रुपयांचे हप्ते ते आता भरतायत.
जेव्हा शेठकडून जास्त काम येत नाही, तेव्हा श्यामबाई चामुबाईंबरोबर तेंदूपत्ता गोळा करायला जाते. चामुबाई बिड्या वळतात, त्यांना १००० बिड्यांमागे ११० रुपये मिळतात. टाळेबंदीत त्यांची कमाई पूर्ण थांबली आहे.
चंदेरीमध्ये व्यापारात सगळीच उलथापालथ झालीये. काही तरी पैसा मिळण्यासाठी विणकरांना व्यापाऱ्यांबरोबर सौदे करावे लागतायत. किरकोळ बाजारात मागणीच नाहीये त्याचा त्यांना जबर फटका बसलाय. बहुतेक विणकर व्यापारी किंवा बुजुर्ग विणकरांबरोबर - जे व्यापारीदेखील आहेत - काम करतात.
एप्रिलच्या मध्यावर चंदेरी नगरात राहणाऱ्या ३३ वर्षीय प्रदीप कोळीला शेठनी सांगितलं की मजुरीचे दर कमी करण्यात येणार आहेत – आठवड्याला रु. १,५०० वरून थेट रु. १,००० – जोपर्यंत “माहौल बदलत नाही.” “आम्ही त्याच्याशी वाद घातल्यावर त्याने केवळ नव्या कामाला नवा दर लावण्याचं मान्य केलं. जुनी कामं जुन्या दराने. पण हा माहौल लवकर बदलला नाही, तर मात्र आम्ही फार मोठ्या संकटात सापडणार आहोत,” प्रदीप म्हणतो.
चंदेरीतल्या विणकरांना टाळेबंदीमध्ये मोफत रेशन कबूल करण्यात आलं होतं, पण एप्रिलमध्ये त्यांना फक्त १० किलो तांदूळ मिळालाय. “नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या भागात सर्वे केला आणि आम्हाला डाळ, तांदूळ आणि आटा द्यायचं कबूल केलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र आम्हाला केवळ तांदूळच मिळालाय,” गेली २४ वर्षं विणकाम करणारे ४२ वर्षीय दीप कुमार सांगतात. सध्या ते त्यांच्या सहा जणांच्या कुटुंबात अन्नधान्याचा तोलून मापून वापर करतायत. “चहात साखर घालायची का नाही असा विचार देखील आजवर माझ्या मनात आला नसेल. किंवा रोजच्या जेवणात गव्हाची चपाती नसणार हाही.”
दीप कुमारच्या घरातला माग – दुसरा त्यांचे बंधू वापरतात - थोड्याच दिवसात शांत होणारे कारण त्यांच्याकडचा धागाच संपलाय. या कुटुंबाची आठवड्याची कमाई ५०० रुपयांवर आलीये. हीच टाळेबंदीआधी सरासरी ४,५०० इतकी होती, “मी [दर आठवड्यात] शनिवारी शेठकडे पैसे आणायला जातो. बुधवार उजाडेपर्यंत खिसे खाली झालेले असतात,” कुमार सांगतात.
“जेव्हा यंत्रमाग लोकप्रिय व्हायला लागले तेव्हा चंदेरी साड्यांची मागणी कमी झाली होती, तो काळ आम्ही तरून आलोय. कसंबसं आम्ही तगून राहिलो. पण हे असं संकट मला कळतच नाहीये. पुरवठा नाही, मागणी नाही, पैसा नाही,” ७३ वर्षांचे तुलसीराम कोळी सांगतात. ते गेल्या ५० वर्षांपासून विणकाम करतायत आणि १९८५ साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. चंदेरीतल्या त्यांच्या घरात सहा माग आहेत. ते, त्यांच्या पत्नी, दोन मुलं आणि सुना त्यावर विणतात.
अशोकनगर जिल्ह्यात कोविड-१९ चा आतापर्यंत एकही रुग्ण सापडलेला नसला तरी टाळेबंदी उठल्यानंतरही सगळं पूर्वपदावर यायला फार मोठा काळ लागणार आहे.
“मला नाही वाटत पुढचे ६-७ महिने आम्हाला नव्या ऑर्डर मिळतील. आणि त्यानंतरही धंद्यात मंदीच येणार आहे कारण लोकांकडे हातमागावरच्या साड्यांवर उडवण्याची क्षमताच राहणार नाही. ते [स्वस्तातल्या] यंत्रमागावरच्या साड्याच घेणार,” अमिनुद्दिन अन्सारी सांगतात. ते चंदेरीतले एक व्यापारी असून तब्बल १०० विणकरांबरोबर व्यवसाय करतात.
टाळेबंदीआधी, अमिनुद्दिन यांच्याकडे दर महिन्याला ८-९ लाखाएवढ्या ऑर्डर असायच्या. दिल्लीतली मोठी दालनं तसंच नामांकित व्यावसायिक त्यांना कच्च्या मालासाठी आगाऊ रक्कम द्यायचे.
कपड्यांची दालनं आणि नामांकित कंपन्यांनी मागणी रद्द करायला सुरुवात केली आहे. सुरेशचे शेठ, आनंदी लाल १२० विणकरांबरोबर व्यवसाय करतात, त्यांच्या सांगण्यानुसार मोठ्या नामांकित दालनांचे लोक एरवी चंदेरीमध्ये ऑर्डर द्यायला येतात. “या वर्षी जानेवारीमध्ये आमच्याकडे [एका नावाजलेल्या ब्रँडच्या] एक कोटीची ऑर्डर होती. मी विणकरांना देण्यासाठी १०-१५ लाखांचा माल विकत घेतलाय. टाळेबंदी जाहीर झाल्यावर पाच दिवसातच त्यांच्याकडून फोन यायला लागले की किती काम झालं आहे त्याचा अंदाज घ्या,” ते सांगतात. त्यानंतर सुमारे १० दिवसांनी, झालेलं काम वगळता बाकी ऑर्डर रद्द करण्यात आली.
टाळेबंदीच्या आधी देखील विणकर कायम सांगायचे की साडीतून मिळणारा नफा कायम व्यापाऱ्याच्या खिशात जातो. खर्च आणि विणकराचा मोबदला वगळला तर नफा व्यापाऱ्याचा ४० टक्के इतका असतो. व्यापाऱ्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मोहम्मद दिलसाद अन्सारी, वय ३४ आणि त्यांच्या गणगोतातल्या १२-१३ जणांनी मिळून एक अनौपचारिक संघटना सुरू केली. त्यांनी हातमाग महामंडळाकडे स्वतंत्ररित्या नोंदणी केली आणि मिळणारं काम एकत्रित पद्धतीने करायला सुरुवात केली. “आम्ही व्हॉट्सॲप आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवरून ऑर्डर कशा घ्यायच्या ते शिकलो,” तो सांगतो. या संघटनेत आता ७४ विणकर आहेत.
पण मग कोविड-१९ अवतरला. मार्चमध्ये दस्तकार या हस्तकला आणि कारागिरांना प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या प्रदर्शनासाठी दिलशाद दिल्लीला गेला होता. १२-१५ लाखांचा सगळा माल विकून येऊ अशी त्याला आशा होती. पण १३ मार्च रोजी दिल्ली शासनाने मोठ्या संख्येने जमावाला बंदी घातली. “फक्त ७५,००० रुपयांचा माल विकून आम्ही घरी परत आलो,” तो म्हणतो.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, ज्या ग्राहकांनी ऑर्डर दिल्या होत्या, त्यांनी त्या रद्द करायला सुरुवात केली. आता मात्र दिलशाद हातघाईवर आले आहेत. “मला रात्री झोप लागत नाही. या साड्या आता कधी विकल्या जातील, काही कळत नाहीये. आणि तोपर्यंत, आम्ही काय करायचं?”
आता बाजारपेठा परत सुरू होतील तेव्हा व्यापाऱ्यांकडे कच्चा माल घेण्यासाठी काही तरी संसाधनं हाती असतील, त्यानंतर ते मोठी कामं हाती घेऊ शकतील. “परत एकदा आम्हाला शेठजींच्या चक्रात अडकावं लागेल. किंवा मग आमच्यासारखे अनेक विणकर चंदेरीच्या बाहेर कुठे तरी रोजंदारीवर कामाला जायला लागतील.”
अनुवादः मेधा काळे